ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. भिवंडी-वाडा या महामार्गावरून अंबाडी नाक्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात पोहोचता येते. वज्रेश्वरी म्हणजे जगतजननी माता पार्वतीच होय. हे मंदिर अत्यंत पुरातन व पारंपारिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. मंदिर पूर्णतः पुरातन व दगडी बांधकाम केलेले आहे. अगदी थोड्याच पायऱ्या चढून जावे लागते. देवीच्या मंदिरात भव्य गाभारा आहे, सभामंडप आहे. मुख्य मंदिरात शेंदुरी रंगाची मातेची तेजोमय मूर्ती आहे. वज्रेश्वरी मातेच्या हातात खड्ग आणि गदा आहे. त्याच प्रमाणे एका बाजूस रेणुकामाता तर दुसऱ्या बाजूला कालिकामाता आहे. मंदिराजवळ दत्त मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर देखील आहेत.
चिमाजी अप्पा पेशवे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात वसई किल्ला जिंकला . हा किल्ला जिंकण्यापूर्वी त्यांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला आणि त्यांचा नवस पूर्ण होताच त्यांनी लगेचच वज्रेश्वरी मातेचे किल्ल्यासारखे मंदिर बांधून आपला नवस फेडला. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला वर्षभर लोक दूरवरून येतात . नवरात्रात या देवीचा उत्सव असतो. त्याच प्रमाणे दसऱ्याला पालखी शोभा यात्रा निघते. वज्रेश्वरी माता मंदिराजवळ गरम पाण्याचे २१ कुंड आहेत व तानसा नदी देखील आहे.
अशी आख्यायिका सांगितली जाते की, वसिष्ठ ऋषींनी स्त्री चंडी यज्ञ केला होता. यज्ञाच्या वेळी देवी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. वज्रेश्वरी देवी खूप सामर्थ्यवान आहे. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. श्रीरामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. तेथे जवळच रामाने बांधलेलं प्रसिद्ध मंदिर आहे. अकलोली गावाजवळ रामेश्वर महादेव मंदिर आहे. येथे गरम पण्याचे दोन कुंड हे रामकुंड या नावाने प्रसिद्ध आहे. तेथून जवळच गणेशपुरी आहे. गणेशपुरी अकलोली येथे नित्यानंद महाराजांचे मठ आहे. मठाजवळ देखील गरम पाण्याचे एक कुंड आहे.
त्याचप्रमाणं इथे अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी जवळच केलठन गावाजवळ शिर्डीचे प्रतिरूप मंदिर बांधले आहे. मंदिरात शिरल्यावर जणू शिर्डीला आल्यासारखेच वाटते. येथे शिर्डी सारखीच साईंची मूर्ती आहे. मंदिरा बाहेर महादेवाची सुंदर मूर्ती आहे. तेथून जवळच निंबोळी गावाजवळ अनुसूया मातेचे मंदिर आहे. मंदिराजवळ ही गरम पाण्याचे दोन कुंड आहे. तेथून आम्ही दर्शन घेऊन पुढे जीवदानी मंदिराकडे निघालो. तेथून गाडीने आम्ही अर्धा तासात वसई विरार जवळील जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. सुंदर अशा जीवदानी मातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी आता रेल्वेची सोय करण्यात आली आहे. आम्ही रेल्वेत बसून क्षणार्धात मंदिरात प्रवेश केला. उंच डोंगरावर अशा पवित्र जागेत मंदिरात देवीची अनुभूती होते. मनास शांती मिळते.
– लेखन: वर्षा वासुदेव भावसार.
– संपादन: देवेंद्र भुजबळ.9869484800.
खूप आभारी आहोत.
मॅडम खूप आहोत.तुम्ही खूप छान परिपूर्ण माहिती लिहितात. प्रत्येक जागेच महत्व ,सखोल माहिती देतात. प्रत्येक्षात जाण्याची त्या जागेवर इच्छा व्यक्त होते. तुमचे आणखी आर्टिकल वाचायला आवडेल. मला तुमचे आर्टिकल फार आवडत .
खुप छान लेख आमची मैत्रिणी ची सहल गेलेली
अगदी सगळे दृश्य परत डोळ्यासमोरून गेली. पुन्हा देवीचे दशॅन झाले 🙏
छान माहिती धन्यवाद.