Sunday, February 1, 2026
Homeसाहित्यकरुणा की अरुणा? शेवटी झाले शुभदा!

करुणा की अरुणा? शेवटी झाले शुभदा!

माझा जन्म दिवस, मी याला जन्म सोहोळाच म्हणेन.

माझ्या जन्मावरून आई आणि वडिलांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. आई बोलायची अहो गुढीपाडवा होता त्या दिवशी, आम्हाला दवाखान्यात गुलाबजामुन खायला मिळाले होते. तर वडील बोलायचे अगं, नाही ज्या वर्षी आपली बकरी हरवली होती त्या दिवशी म्हणे माझा जन्म झाला असं त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे आमच्याकडे एक बकरी पाळली होती, ती त्या दिवशी गायब झालेली म्हणजे ती पळून गेली असं…

पुढे कळायला लागल्यावर मला माझ्या हा जन्म सोहोळा खूप गमतीदार वाटायचा. तशी मी माझ्या आईला झालेली पाचवी मुलगी होती म्हणून माझ्या जन्माचं एवढं कौतुक त्यांना नसावं. कारण लागोपाठ पाच मुली म्हणजे ते कौतुकास्पद निश्चित नसावं.

तर झालं असं, कुणीतरी वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी वारली, अर्थात त्यांना वाईट नक्की वाटलं असणार त्या वेळेस. कारण त्या काळी पैश्या पेक्षा घरात किती गोकुळ आहे या वर कुटुंबाची श्रीमंती तोलली जायची.
झाले माझी पुढची तय्यारी करण्यासाठी साहित्य आणले गेले, आणि अचानक नर्स बाई बोलल्या मुलगी जिवंत आहे! तर असा हा माझा प्रगट दिन.

पुढे माझ्या पाठीवर अजुन दोन मुलगे जन्माला आल्यावर शेजारी पाजारी आणि नातेवाईक बोलायचे मुलगी नशीबवान आहे पाठीवर दोन भावंडे आली.

आत्ता माझी शाळेत जायची वेळ आली म्हणजे वय वर्ष ६ पूर्ण झाली, तर तो पण एक किस्सा….  माझं पाळण्यातलं नाव करुणा जे माझ्या आत्याने आवडीने ठेवलेलं पण शाळेत गुरुजीनी अरुणा ठेवलं! तर त्यावर वडील म्हणायचे की त्या गुरुजीना नीट ऐकू आल नसावं, त्यांनी क चा अ केला असावा. अर्थात कधी कधी मी रडायचे. पण शाळेत मग गुरुजी बोलायचे मला तुझं अरुणा, नाव आवडलं बस मग ते कायम अरुणाच झालं. पण व्हायचं काय घरी सगळे करुणा बोलायचे आणि शाळेत अरुणा. आहे की नाही मज्जा.

कधी कधी तर शाळेतल्या मैत्रिणी आल्या की विचारायच्या अरुणा आहे का तर माझी आई गोंधळून जायची बिच्चारी. कारण आम्ही सगळी नऊ भावंडं. ती कुणा कुणाच्या नावांचे किस्से लक्ष्यात ठेवणार आणि अशीही आई दिवसभर आमचं जेवण आणि पै पाहुण्यांची ऊठबस करण्यात गर्क असायची. तिला हे पण ठाऊक नसायचं की आम्ही कितवीत आहोत?

अजून एक गंमतीदार आठवण…. मी शाळेत असताना वडिलांचा खूप मार खाल्ला. कारण मला शाळा तितकीशी आवडायची नाही. शाळेत नाव घातल्यानंतर मी पहिले सहा महिने शाळेत गेलीच नाही.

माझे वडील रेल्वेत पोलिस होते ते ड्युटीवर जाताना मला शाळेत सोडायचे आणि त्यांची पाठ वळताच मी पुन्हा पाटी घेऊन घरी रडत रडत धूम ठोकायची. आई बिच्चारी पाठीशी घालायची. त्या वेळेस ती बोलायची, असू दे जाईल पुढल्या वर्षी. पण काही काळाने वडिलांना याचा सुगावा लागलाच आणि त्यांनी एके दिवशी अक्षरशः माझं शाळेच्या नळावर डोकं आपटलं, पण ते माझं मार खाण अखेरचच ठरलं हं. कारण नंतर मला शाळेवाचून करमेनासं झालं. खूप गोडी निर्माण झाली आणि नंतर सहा महिन्यात माझा पहिला नंबर आला. आणि तो मी पुढे कधीच सोडला नाही.

त्या वेळेस शाळेचे शिक्षक आणि पालक यांच्यात खूप जवळीक असायची. माझ्या गुरुजींनी सांगितलं की मुलगी अभ्यासात बरी वाटते तुम्ही हिला कर्जतला शाळेत घाला, आणि असंही आमची कर्जतला, चाळीत एक खोली होतीच कारण वडिलांची बदली होत असे सारखी, त्यामुळे ती त्यांनी आधीच घेतलेली होती. तिचे भाडे त्या काळी २ रुपये होते.

चवथीला माझं कर्जतला कन्या शाळेत नाव घातलं आणि त्या वर्षी मी स्कॉलरशिप परीक्षेला बसले. आमचं कर्जत केंद्र नसल्याने ती परीक्षा पनवेलला व्हायची. आमच्या एक बाई होत्या त्यांचं पनवेल माहेर होतं. आदल्या दिवशी आम्हा सर्व मुलींना त्यांनी आपल्या घरी राहायला नेलं. दुसऱ्या दिवशी परीक्षा झाल्यावर एसटीने घरी आलो.

मे महिन्यात आमचा निकाल लागला आणि मी रायगड जिल्ह्यात ३४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आमच्या वर्गात असणारी स्कॉलर वंदना नावाची मुलगी होती ती खूप हुशार होती. पण तिला त्या परीक्षेत अपयश मिळालं. अर्थात ती माझी पण चांगली मैत्रीण होती. माझं पेपरमध्ये नाव आलं, तो पेपर माझे माथेरानचे गुरुजी फडकवत माझ्या वडिलांना बोलले, ‘बघा मी सांगितलं होतं ना त्याचा फायदा झाला ना?’

माझी वंदना ही मैत्रीण पण आमच्याच चाळीत राहायची आणि आमच्या अख्या चाळीला ती हुशार आहे माहिती होतंच, तर दुसऱ्या दिवशी विहिरी वर पाणी भरताना सगळे चर्चा करत होते वंदू कशी नापास झाली? एक तर बाई बोलली की करुणाचे मार्क वंदूला गेले असतील आणि वंदूचे करुणाला. म्हणजे तुम्हाला कळलं असेलच. पण पुढे सातवीला वंदनाला स्कॉलरशिपला घवघवीत यश मिळालं.

त्या काळी आम्हाला सहा रुपये महिना स्कॉलरशिप मिळायची. दर तीन महिन्यांनी स्कॉलरशिप मिळायची आणि जेव्हा ती येत असे तेव्हा शाळेचा शिपाई आमच्या नावाची लिस्ट घेऊन यायचा. आणि अहाहा काय भारी वाटायचं! तास सुरू असताना ताडकन उठून ते पैसे घ्यायला ऑफिस मध्ये जाताना जणू काही मोठा तीर मारल्याचा फील यायचा. आत्ता ते सारं आठवलं की खूपच हसू येत.

दहावीला गेल्यावर माझी मैत्रीण वंदू पूर्ण शाळेत सर्व तुकड्यानमधुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आणि मी पूर्ण शाळेत मराठी या विषयात पहिली आली. ह्याचा पण फार अभिमान वाटला माझ्या पालकांना.

मैत्रिणी समवेत.

आज माझी ती मैत्रीण खूप उच्च पदावर कार्यरत आहे आणि ह्याचा मलाही खूप अभिमान वाटतो. अजूनही आम्ही संपर्कात आहोत.

आम्ही माथेरानला राहायचो ते निसर्गरम्य असं ठिकाण होतं. तिसरी पर्यंत माझं शिक्षण तिथे झालं. त्या काळी मे महिन्यात आमच्याकडे खूप पाहुणे यायचे राहायला.आई सगळ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आवडीने करायची. आम्हाला पण पाहुणे आले की मज्जा वाटायची. पाहुण्यांना घेऊन फिरायला जायचं, त्यांना पॉईंट दाखवायचे. मग काही दिवस राहून पाहुणे गेले की आम्हाला त्यांना निरोप देताना रडू यायचं. खूप छान दिवस होते ते. आपल्या घरी किती पाहुणे येतात हीच त्या वेळेची खरी श्रीमंती असायची.

शेवटी सांगायचं तात्पर्य असं की ज्या माझ्या जन्माच्या वेळेस मी गेले म्हणून कफन न्यायची वेळ माझ्या वडिलांवर आलेली तेच माझे वडील खूप अभिमानाने सांगायचे ‘ही माझी मुलगी नाही तर मुलाला पण लाजवेल असा हा माझा मुलगा आहे!’ याचे कारण, मी पण माझ्या कुटुंबाकरता जमेल तसा हातभार लावला. माझ्या बहिणीचं लग्न, पुढे भावांची शिक्षण, लग्न, वडिलांचं आजारपण… अर्थात ते सर्व मी कर्तव्य भावनेतूनच केलं. पण तरीही त्यांना सगळ्या भावंडामध्ये माझं खूप कौतुक वाटायचं.

आणि हो पुढे माझं लग्न ठरल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले,  ‘तुझं ते करुणा अरुणा राहु देत’ आणि त्यांनी माझं नावं शुभदा ठेवलं…..

– लेखन: शुभदा रामधरणे.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9