Wednesday, June 18, 2025
Homeकलाओठावरलं गाणं ( ७९ )

ओठावरलं गाणं ( ७९ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. गाणं किती चांगलं आहे, गाण्याचा अर्थ, गाण्यामधून काय सांगितलं आहे हे सगळं गाण्याच्या संगीतामधून, गाण्याच्या शब्दांमधून हा रेडिओ आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि रसिक श्रोत्यांचं फक्त मनोरंजन करण्याचं काम करत असतो. म्हणूनच रेडिओ नावाच्या हया मनोरंजनाच्या साधनाने क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा आवाजही गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवला आहे. मित्र हो, आज आपण पहाणार आहोत ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक गाणं ज्याचे शब्द आहेत –

“या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला

जीवनाचं परखड परीक्षण कवीनं ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत केलं आहे‌. आपापल्या आयुष्यातील क्रिकेट मधले चेंडू टोलवत असताना आम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याच्या क्रिकेटचा खेळ बघायला अजिबात वेळ नसतो. आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे असं जर म्हंटलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा चेंडू दैवगती आणि काळ नावाचे दोन गोलंदाज सातत्याने टाकून आपल्याला भेडसावत असतात. अशा वेळेस आत्मविश्वास नावाची बॅट हातात घट्ट धरून ठेवावी लागते. मनाचा जराही गोंधळ होऊ न देता कुठला चेंडू पडतो आहे त्याकडे नीट लक्ष देऊन जर ही बॅट फिरवली तरच यशाची धाव मिळण्याची शक्यता असते. ही चोरटी धाव घेतानाही अविश्वास नावाचा खेळाडू आपल्याला बाद तर करणार नाही ना इकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी या खेळात आपण बाद होण्याची शक्यता असते.

अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी
डाव तुझा येताच जमविशी जपून अपुली खेळी
काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टिरक्षक तुझा उधळण्या डाव
या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला

आयुष्याच्या क्रिकेटचं हे मैदान किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे याची काहीही कल्पना नसली तरी आपण आपली खेळी सुरूवातीला जपूनच करायची अशी मनाशी खूणगाठ बांधून तू या मैदानावर खेळायला येतोस. काळ नावाच्या गोलंदाजानं संकट नावाचा चेंडू टाकल्यावर घाबरून जाऊ नकोस. आत्मविश्वासाच्या बॅटने तो चेंडू टोलवायचा प्रयत्न कर. आत्मविश्वासाच्या बॅटवरची तुझी पकड सैल पडू देऊ नकोस. ती पकड सैल झाली तर अविश्वास नावाचा यष्टिरक्षक तुझ्या पाठीमागे तुझा झेल घेऊन तुला आऊट करायला टपलेलाच आहे. अविश्वास, संशय, शंका हे सारे खेळाडू तुझ्या भोवती उभे राहून तुला घाबरवून सोडतील आणि तू खेळताना थोडीशी जरी चूक केलीस कि ते तुझा झेल घेऊन तुला बाद ठरवतील. लक्षात ठेव, या सर्व खेळाडूंना चकवून तुला यशाची चोरटी धाव घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं चातुर्य आणि सावधानता ही दोन पॅडस् जर तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर जीवनाच्या क्रिकेटचा हा सामना खेळताना तुम्ही नक्कीच रंगून जाल.

तू ऐकत असता जयघोषाचे नारे
या कालगतीचे नकोस विसरू वारे
फटकार अचूक तू चेंडू या काळाचा
आयुष्य असे रे डोंगर या धावांचा
राहील निरंतर तुझी आठवण इथल्या कणाकणाला

आयुष्याच्या खेळपट्टीवर आणि जीवनाच्या क्रिकेट मध्ये काळाकडून येणाऱ्या संकटं, आपदांचा प्रत्येक चेंडू जर तू आत्मविश्वासाने टोलवत राहिलास तर यशाच्या आणि समाधानाच्या वाढत्या स्कोअर बोर्ड मुळे बाकीच्या लोकांचं लक्ष साहजिकच तुझ्या खेळाकडे जाईल आणि अर्थातच तुझ्या नावाची वाहव्वा होत राहील. पण मित्रा, बेसावध राहू नकोस किंवा लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. कारण अशा बेसावध क्षणाचा फायदा घेऊन काळ नावाचा गोलंदाज एखाद्या संकटाचा असा काही यॉर्कर तुझ्यावर टाकेल की त्या चेंडुची गती पाहून क्षणभरासाठी तू ही बावचळशील. पण मन शांत ठेवून असा काही सणसणीत फटका मार की संकटाचा यॉर्कर आयुष्याचा मैदानावरून उसळी घेऊन थेट यशाच्या षटकारात बदलेल. अशा रीतीने नेट लावून न थकता, शांत मनाने आणि संयमाने तू जीवनाच्या क्रिकेटचा हा खेळ खेळलास तर यशाच्या आणि मानमरातबाच्या धावांचा असा काही डोंगर उभा राहिल की तुझ्या जीवनरूपी क्रिकेटचा खेळ एक आदर्श म्हणून वाखाणला जाईल यात शंका नाही.

विकास भावे

सुनील गावसकर हे काही पट्टीचे गायक नाहीत पण क्रिकेट हा खेळ त्यांचा आत्मा असल्यामुळे, संगीतकार गौतम गिरीश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी हे गाणं अतिशय समरसून गायलं आहे आणि त्यामुळेच रेडिओवर त्या काळात वरचेवर हे गाणं लागत असे इतकं ते फेमस झालं होतं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. क्रिकेट मध्ये फारसा रस नसुन सुद्धा क्रिकेट वरच्या गाण्याच्या परिक्षणात मात्र काहीच कसुर केली नाहिये. सुंदर परिक्षण….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?