Monday, February 16, 2026
Homeसाहित्यवर्धा साहित्य संमेलन ( १ )

वर्धा साहित्य संमेलन ( १ )

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
नुकतेच वर्धा येथे झाले.
या संमेलनाविषयी श्री प्रवीण देशमुख यांची लेखमाला आपण आजपासून प्रसिध्द करीत आहोत.
श्री प्रवीण देशमुख, हे गेली अनेक वर्षे कविता लेखन करीत असून विविध साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यांची २ पुस्तके आणि १ काव्य संग्रह प्रसिद्ध झाला असून १०० हून व्याख्याने दिली आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत.

श्री प्रवीण देशमुख यांचे ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाहिका मा.उज्वलाताई मेहंदळे यांचा १५ डिसेंबरला, ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून आपण उपस्थित राहू शकाल का ? असा फोन आल्यानंतर कवी म्हणून मला झालेला आनंद मी वर्णन करू शकत नाही.

सध्या कल्याणच्या काव्यकिरण मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना मंडळाचा सुवर्ण महोत्सवही आहे, त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य परिषद या संस्थेचा कोकण प्रांत कार्याध्यक्ष म्हणूनही काम करतांना हा सुवर्णकांचन योग आला. मी त्यांना त्वरित होकार देऊन माझी आवश्यक ती माहिती कळवली व संमेलनाच्या तयारीला लागलो.

या संमेलनाच्या निमित्ताने आपल्या निवडक कवितांचे एक पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी इच्छा मनात धरून मी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मा. विजयराव चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला व त्यांना माझी कल्पना सांगितली. योग्य कवितांची निवड त्यांनी करावी तसेच संग्रहाला प्रस्तावना लिहावी अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी त्याला आनंदाने होकार दिला. मी त्यांना ४० एक कविता पाठवल्या. त्यातून त्यांनी ३० कवितांची निवड केली व प्रास्ताविकासह त्या मजकडे वेळेत पाठवल्या. त्यामुळे माझ्या मनोगतासह मी वर्ध्याला जाण्याच्या अगोदर “सांजवात” हा काव्यसंग्रह माझे मित्र श्री ऋषिकेश जोशी यांनी छापून तयार करून दिला.

३ जानेवारीला अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. प्रदीप दाते यांचा मी संमेलनात सहभागी व्हावे व ४ फेब्रूवारीच्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात आपण कविता वाचन करावे असा फोन आला. काही काळानंतर निमंत्रण पत्रिकाही आल्या. त्यात माझे नाव छापलेले होते.
मा. प्रा.नरेंद्र पाठक, मा. श्री. प्रमोद बापट यांनी व ज्यांना समजले अशा सर्वांनी माझे अभिनंदन केले. रेल्वेचे यायचे जायचे आरक्षण करून मी वर्धा येथे जाण्यासाठी सिद्ध झालो.
क्रमशः

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11