Saturday, June 14, 2025
Homeलेखनेत्रदान नव्हे "नेत्रभेट" !

नेत्रदान नव्हे “नेत्रभेट” !

आज नेत्रदानदिन आहे. पण मुळातच नेत्रदान या शब्दाला, संकल्पनेला नेत्रदान न म्हणता “नेत्रभेट” हा सुंदर प्रतिशब्द सुचविल्याबद्दल अमरावती येथील लेखिका कल्याणी धनंजय बापट यांचे आपण अभिनंदन केले पाहिजे. आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर पहिल्यांदाच लेख लिहिणाऱ्या कल्याणी बापट या बीएससी, बिपिएड झाल्या असून सध्या त्या अभिनंदन अर्बन सहकारी बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना साहित्याची आवड असून त्या गेली ६ वर्षे अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान मध्ये “सहज सुचल म्हणून” नावाचे दैनंदिन सदर लिहित आहेत.न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

आज 10 जून, दृष्टीदिन. मला एकदम कुमार वयात बघितलेल्या “धनवान” सिनेमातील त्या सगळ्यांना आवडणा-या गाण्याची आणि त्या कथेची आठवण आली. गाण्याचे बोल होते,
“ये आँखे देखकर हम सारी दुनियाँ भूल जाते है”…
आपले डोळे ही आपली ओळख पटविण्याचा एक मार्गच असतो.

खरंच, सगळ्या जगाची ओळख पटवून देण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुध्दा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करत अवतीभवतीचे जग बघायला सुरवात करतं. मग हळूहळू हे डोळे आपल्याला नुसतीच दृष्टी देतात असं नाही तर अवतीभवती चे ज्ञान मिळवीत एक नवा दृष्टिकोन पण देतात.

हे डोळेच आपल्याला नवीननवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात.
हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात. हे डोळेच आपल्याला आणाभाका, कस्मेवादे करायला शिकवितात.
हे डोळेच आपल्याला परस्परांना ओळखायला शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया, ममता, प्रेम दिसून हे जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते. तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग संताप दिसून आपलं कायं चुकलं हे आपण शोधायला लागतो.ह्या डोळ्यांमध्येच वासनेची झलक दिसल्याने आपण सतर्क पण होऊ शकतो.खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळख पटवून जगात सक्षमतेने जगणे शिकवितात.

हे लिहीतांनाच मला एकदम प्रांजल पाटील ह्या IAS परिक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्तबगार तरुणीची आठवण आली. IAS ची परिक्षा पास होणं हेच मुळात खूप अवघड आणि म्हणूनच खरचं खूप कौतुकास्पद. त्यात ही अतिशय कठीण परिक्षा एका अंध मुलीने उत्तीर्ण केली हे तर खूपच कौतुकास्पद. जे काम डोळसं व्यक्ती पण करू शकेलच असे नाही ते काम एका अंध मुलीने आपल्या चिकाटीने, मेहनतीने यशस्वीरीत्या पार पाडले ह्या साठी तिचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.

आपल्याला निसर्गाने मोफत दिलेल्या निरामय, अव्यंग अवयवांच्या किमतीचा, शरीराचा अंदाज लागत नाही. ज्या कुणा जवळ अवयवाचा अभाव असेल त्याला त्याची खरी किंमत कळते. तरी बरीच जनजागृती झाल्यानं, त्याचं महत्व पटल्यानं लोकं आजकाल अवयवदानाचा त्यातल्या त्यात जास्त नेत्रदानाचा संकल्प सोडतात.

मी नेत्रदानाची व्याख्या माझ्यापुरती तरी बदलली आहे. मी नेत्रदान न म्हणता नेत्रभेट असे म्हणते आणि समजते. दान दिले ह्या पेक्षा भेट म्हणून दिली असे म्हंटले म्हणजे माझ्यामते माणसासाठी सगळ्यात जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अहं”चा स्पर्श होत नाही. शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुध्दा तुम्ही ते दुस-याला दिले तर या त्यागाला आपण दान म्हणू शकतो. पण नेत्रदान तर आपण शेवटचा श्वास सोडल्यावर , आपणाला कुठल्याही अवयवांची गरज उरत नाही तेव्हा आपण ते दुस-याला देतो. त्यामुळे मला नेत्रभेट हा शब्द जास्त भावतो.

त्या ईश्वराची लीला पण अगाध असते बरं का, एखादा अवयव नसलेल्या व्यक्तींमधे त्या अवयवाची कमतरता, उणीव तर असते परंतू त्याच बरोबर दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या अवयवांमधे जास्त शक्ती एकवटलेली आपल्याला त्या व्यक्तीमध्ये आढळते. त्या अवयवाच्या कमतरतेची कसर दुस-या एखाद्या अवयवामध्ये सामान्य कुवतीपेक्षाही जास्त ताकद ह्यांच्यामध्ये दिसते. नुसते डोळे नसून सुध्दा दया, प्रेम, कणव, संस्कार, कृतज्ञता, समजूतदारपणा, माया आणि सुस्ंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या ब-याच अंध व्यक्ती आपल्या सभोवताली आढळतात. तेव्हा शक्य असल्यास जास्तीत जास्त लोकांनी नेत्रभेट देण्याचा डोळस निर्णय घ्यावा हीच सदिच्छा.

कल्याणी बापट

— लेखन : कल्याणी बापट. बडनेरा, अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments