Homeलेखअसाही योगायोग !

असाही योगायोग !

सोशल मिडिया, ए आय मुळे केव्हा काय हाती लागेल, काय जुने गवसेल सांगता येत नाही. मोबाईलवर स्क्रोल करता करता अचानक फेसबुक वर माझा फार जुना फोटो आढळला. हा फोटो माझ्याजवळ नव्हता. किंबहुना या घटनेचा एकही फोटो माझ्याकडे नव्हता .पण ही घटना लक्षणीय अशीच होती.
माझा एकमेव, पहिला वहिला काव्यसंग्रह मुक्तछंद नागपूरच्या विदर्भ लेखक संघाने प्रकाशित केला. नागपूरचे प्रकाशक
श्री मामा गंधे यांनी तेव्हा एक जागतिक विक्रम केला होता. एकच व्यासपीठावर एकाच वेळी शंभर कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचा! हा रेकॉर्ड कदाचित आजही अबाधित असेल. त्यांनी वृत्तपत्रातून आवाहन करून सगळ्या महाराष्ट्रातून कविता मागवल्या. त्यातील निवडक १०० कवींचे संग्रह प्रकाशित केले. तारीख होती १० फेब्रुवारी १९९७. त्याला नाव दिले काव्योत्सव १९९६- ९७. प्रमुख पाहुणे होते प्रसिद्ध गझलकार सुरेश भट. सांस्कृतिक मंत्री श्री देशमुख प्रमुख पाहुणे होते. पहिल्या पाच संग्रहाना रोख पारितोषक दिल्या गेली. त्यात माझा काव्यसंग्रह होता !
नागपूरच्या वसंतराव देशपांडे नाट्यगृहात हा भव्य अभूतपूर्व सोहळा पार पडला. महाराष्ट्रातून अनेक कवी एकत्र जमलेले. (त्यात श्री फ मु शिंदे देखील होते हे आठवते.)

या समारंभाची एक विचित्र आठवण आहे. सुरेश भट आपल्या भाषणात कवितेबद्दल फार थोडे बोलले. त्यांचा सगळा रोष सांस्कृतिक मंत्री देशमुख यांच्यावर होता. त्यांच्या कसल्यातरी कार्यक्रमाचे मानधन सरकारने देणे होते. पाठपुरावा करूनही ते मिळत नाही म्हणून ते वैतागले होते. अन मंत्री महोदयाकडे बघून सारखे ते तीच ती मागणी करीत होते. प्रसंग काय, बोलायचे काय याचेही भान ते विसरले. हे सगळे शेवटी इतके कंटाळवाणे झाले, हाताबाहेर गेले की आयोजकांना त्यांना चिठ्ठी पाठवावी लागली,
हे थांबवा, आटोपते घ्या म्हणून ! पण तरीही ते बधले नाहीत. त्यांचे तेच ते दळण चालू राहिले. शेवटी दोनतीन चिठ्ठ्या आल्यावर ते संतापून मंच सोडून निघून गेले ! एव्हढा मोठा कवी, महान गझलकार पण त्यांचे त्यावेळचे सर्वांसमोर भर समारंभातील तसे वागणे प्रत्येकाला खटकले. कलाकार हा सामान्य माणूस म्हणून किती वेगळा असतो त्याचे त्या प्रसंगी दर्शन झाले.

या कार्यक्रमाला मला एक शक्कल सुचली. मी आयोजकांना एक मोठा कागद मागितला. तो बाहेर फलकावर लावला. अन् ज्या कवीचे काव्यसंग्रह त्या दिवशी प्रसिद्ध झाले त्या सर्वांना नावासह त्या कागदावर सही करायला विनंती केली. कितीही झाले तरी तो एक जागतिक विक्रम होता. तोही माझ्या गावी नागपूर शहरी घडलेला. अन् त्या विक्रमाचा मी एक भाग असलेला!

या अविस्मरणीय फोटोत आणखीन एक योगायोग घडला. त्यातील डावीकडून दुसरे असलेली व्यक्ती म्हणजे प्रा गणेश सोनाळे. त्यांचाही संग्रह त्या दिवशी प्रसिद्ध झाला. पुढे कुलगुरू झाल्यानंतर ते मला पुन्हा भेटले. विद्यापीठाच्या हिंदी विभागात ते प्राध्यापक होते. आता इतकी वर्षे झाली मी निवृत्त होऊन पण त्यांच्याशी संपर्क आहे. त्यांचे फोन येत राहतात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्री फ मु शिंदे यांनी मी कुलगुरू असलेल्या विद्यापीठाचे गीत लिहिले !

अशा योगायोगाची खरच गंमत वाटते. हा माझा प्रकाशित झालेला पहिला अन् शेवटचा कविता संग्रह. त्यानंतर काही कविता २६@७५ या पंचाहत्तर व्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात संग्रहित झाल्यात. तेव्हढेच.एरवी कविताचे पुस्तक कोण काढतो ? मामा गंधे नावाच्या एक वेड घेतलेल्या प्रकाशकामुळे ते शक्य झाले. त्यांच्या जागतिक विक्रमाची नोंद कुणी घेतली की नाही कोण जाणे? मराठी साहित्यात तरी या विक्रमाची नोंद झाली की नाही , माहिती नाही. साहित्य संमेलनाने तरी या कार्यक्रमाची नोंद घेतली का माहिती नाही. केवळ सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साहित्य संमेलनाकडून ती अपेक्षा करणेही चुकच.

मूळचे धूसर झालेले छायाचित्र..
ए आय ची कमाल…

हा मूळ मिडियावरचा फोटो अत्यंत धूसर होता. पण ए आय मुळे त्याच्यात जान आली. तो फ्रेश नवीन झाला! या सोशल मिडियाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच. उगाच त्याला नावे ठेवण्यात अर्थ नाही.

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन’: विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments