Sunday, June 15, 2025
Homeसाहित्यवट पौर्णिमा आणि नेत्रदान दिन : काही कविता

वट पौर्णिमा आणि नेत्रदान दिन : काही कविता

नमस्कार मंडळी.
आज वट पौर्णिमा आणि नेत्रदानदिन अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही विषयांवर प्राप्त झालेल्या कविता पुढे देत आहे.
— संपादक

१. वट पौर्णिमा

अखंड सौभाग्य लाभू दे ग मला
मनोभावे पूजिते आज मी वडाला l

धनी माझा आहे मनाने ग निर्मळ
स्वभावाने गोडगोड अतिशय प्रेमळ
माझेही आयुष्य लाभू दे ग त्याला
मनोभावे पूजिते आज मी वडाला l

वट पौर्णिमेला करीते ग उपवास
सत्यवान सावित्रीला आठवून खास
सुती धागा गुंडाळते बाई त्याला
मनोभावे पूजिते आज मी वडाला l

सात फेरे भोवती स्त्रीत्वाचे प्रतिक
व्रत हे शुभंकर स्त्रियांसाठी
एक वाण वाटते मी
सौभाग्य रक्षणाला
मनोभावे पूजिते आज मी वडाला l

— रचना : विलास कुलकर्णी. मीरा रोड

२. वटवृक्ष घनदाट

वटवृक्ष घनदाट सावली, आयुष्यही प्रचंड,
म्हणुनी पूजला आहे, संस्कृती ही धन्य धन्य,
खोल मुळे, खूप पारंब्या, झुले खेळती मुले मुक्त,
पाने मोठी, पत्रावळी, फांद्या, खोड उपयुक्त,

प्राणवायू सतत वाही, ताजेपणा भरून राही,
ऊन वारा पावसाला, माणसा आधार होई,
विस्तीर्ण सावली, सहज सहस्र भोजन होते,
अचूक महत्व जाणून, सावित्री वड पुजिते,

मनी जाणून करते, संसार हा विस्तीर्ण होवो,
माझ्या वटवृक्षाखाली, अनेकांचा प्रेमठावों,
गजबजू दे, वाढू दे, हिरवे वैभव हे तुझे,
रुजवीन हजारो वटवृक्ष, प्रेमळ आव्हान हे माझे….!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव

३. वट पौर्णिमा
(मुक्तछंद काव्यरचना)

सात जन्म मिळण्यासाठी
आनंदे सुहासिनी पूजती
आहे याच पतीराजा साठी
वट वृक्षास दोरे, फेरे घालती .1

पूर्वजांनी पाळली परंपरा
महिलांसी घालुनी बंधने
पतीराज दिर्घायुष्यासाठी
सुहासिनी पुजूनी मागणे.. 2

मनोभावे उपवास करुनी
व्रतवैकल्याचे पालन करी
सौभाग्य लेणे स जपूनी
उद्धार करी जन्म संसारी… 3

वट वृक्षाच्या सावली खाली
शुद्ध हवा मिळे सकल जनासी
पूर्वज परंपरेला जतन  करूनी
सर्वांनीच पूजावे वट वृक्षासी….4

— रचना : सौ. मीना म.घोडविंदे. ठाणे

४. आधुनिक सावित्री (अष्टाक्षरी)

सावित्रीच्या साहसाची,
पुरातन आहे कथा !
अजूनही सुरू आहे,
वटपूजनाची प्रथा !

सत्यवान तिचा पती,
प्राण हारले यमाने !
हरविले तिने त्याला,
पतिव्रता पुण्याईने !

वटवृक्ष डेरेदार,
प्राणवायू त्याच्यापाशी !
स्वामी समर्थांचे स्थान,
नाते याचे भावनांशी !

सात जन्म हाच पती,
लाभावया आराधना !
फेरे मारीत वडाला,
बांधी नात्यांच्या धाग्यांना !

अशी भाबडी भावना,
आहे आज अस्तित्वात !
महिलांनो पहा जरा,
डोकावून वास्तवात !

पुनर्जन्म, सात-जन्म,
आहे सारा मिथ्या भ्रम!
“रोज जगावे आनंदे”
हेच विवाहाचे मर्म !

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे

५. वडपौर्णिमा !

वडपौर्णिमेचे व्रत
केले सावित्रीने,
सत्यवानाचे प्राण,
वाचविले वडाने

नाव झाले यमाचे
बंधन घातले व्रताचे.

जरी आख्यायिकेचे
झाले प्रमाण,
आरोग्यदायी वडाचे,
महत्व जाणू

वडाला पुजून निसर्गाचे,
ऋण फेडावे.
वृक्षारोपण करून,
पर्यावरणाचे भान राखावे.

संस्कारांच्या रूढींना
नवी दिशा द्यावी.
सात पिढ्यांच्या
उद्धाराची प्रार्थना करावी

व्रत वैकल्ये सण, समारंभ,
वैज्ञानिक दृष्टिकोन, ठेवावा.
जगण्यातला आनंद,
द्विगुणित करावा.

रचना : मीरा जोशी.

नेत्रदान….

दानात श्रेष्ठ नेत्रदान
पुण्याचा तो यज्ञ महान

दृष्टी सारखे भाग्य नाही
खऱ्या जगाची ओळख नाही

दृष्टीहीनाना दृष्टी देऊन,
माणूस पणाचे ऋण फेडावे

विचाराना कृतीत आणून
माणुसकीचे कर्तव्य जाणावे
थोडे तरी संचित जमा करावे

शाश्वत समाधानाचे कर्म करूनी
समाजासमोर, उदाहरण व्हावे

— रचना : मीरा जोशी.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण