उंच, खोल या दोन मितीतिल
अजब तयाचे निर्मिति- कौशल
गगनचुंबि गिरिशिखरे वरती
खाली गर्ता- गूढ गुहातळ
डोळां दिसते ते मोहविते
जागी होते आत प्रेरणा
भवतालाच्या खुजेपणाची
सल बोचे, ती देइ वेदना
स्वाभाविक मन बघू लागते
उंच उंच जाण्याची स्वप्ने,
कवेत नभ घेण्याची कांक्षा …
मोहवशाला दिसति न विघ्ने
घसरनिसरत्या चढत्या मार्गी
पाउल पडते पुढती पुढती
अपुल्या स्वकीय गोतवळ्याची
सौहार्दाची तुटती नाती
अविचारी मन जिद्द न सोडी
हव्यासाची भूक अनावर
दमछाकीने प्राण काढता
वस्ती होई ती अर्ध्यावर
कुणा मिळाले ध्रुवपद सांगा
असे तिथेहि न स्थिरतो शाश्वत
थपडा काळाच्या बसल्यावर
घरंगळीने ये कोलांटत
प्रबुद्धास हे कळते सारे
चढणारा पडतोच कधितरी
गर्तेमध्ये जाता जाता
भुईच त्याला अखेर तारी
कवी : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
भुईच तारी’ – एक सुंदर जीवनचिंतन !
प्रा. सू. द. वैद्य यांची ‘भुईच तारी’ ही कविता म्हणजे नव्वदीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका अनुभवसमृद्ध मनाने जीवनाकडे पाहून केलेले परिपक्व चिंतन आहे.
गदिमांनी ज्यांना ‘ सत्कवी’ म्हणून गौरविले, त्या कवीच्या लेखणीतून उतरलेली ही कविता केवळ सत्य प्रतिपादन किंवा शब्दांचे सौंदर्य नाही, तर मानवी जीवनाचा अर्थ उलगडणारे तत्त्वज्ञान आहे.
आकाशाला भिडणारी पर्वतशिखरे आणि खोल गर्ता यांच्या प्रतिमांतून कवी मानवी महत्त्वाकांक्षा, यश, हव्यास आणि अधःपतन यांचे वास्तव मांडतात.
उंची गाठण्याची स्वप्ने पाहणे गैर नाही; परंतु त्या धडपडीत आपली माणसे, जिव्हाळ्याची नाती आणि जीवनातील साधा आनंद हरवू नये, ही जाणीव कवी अत्यंत संवेदनशीलतेने व्यक्त करतात.
विशेषतः ‘अपुल्या स्वकीय गोतवळ्याची सौहार्दाची तुटती नाती’
या ओळी अंतर्मुख करतात. यशाच्या शिखरावर पोहोचताना माणूस आपल्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान गोष्ट गमावत तर नाही ना, असा प्रश्न त्यांतून ते उपस्थित करतात.
कवितेचा खरा तात्त्विक उत्कर्ष शेवटच्या चार ओळींत आहे :
‘प्रबुद्धास हे कळते सारे
चढणारा पडतोच कधितरी
गर्तेमध्ये जाता जाता
भुईच त्याला अखेर तारी’
किती सुंदर जीवनसत्य !
सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि यश यांची उंची कायमस्वरूपी नसते. काळाच्या प्रवाहात प्रत्येकाला कधी ना कधी खाली यावे लागते. अशा वेळी आधार देते ती आपली मुळे, आपली माणसे, आपले संस्कार आणि वास्तवाचे भान.
‘भुई’ ही केवळ जमीन नसून स्थैर्य, नम्रता, आपलेपणा आणि जीवनाचा मूलाधार आहे.
या कवितेत निराशा नाही, कटुता नाही; आहे ती आयुष्याच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेली शांत प्रगल्भता.
आकाशाला गवसणी घालताना जमिनीचा विसर पडू देऊ नका; कारण उंचीवर नेणारे स्वप्न असते, पण पडल्यावर सावरणारी भुईच असते!
या कवितेत कवी मानवी महत्त्वाकांक्षेचे मानसशास्त्र उलगडतात .स्वतःच्या परिस्थितीबद्दलची असमाधानी भावना हीच अनेकदा प्रगतीची प्रेरणा ठरते. परंतु हीच भावना अतिरेकाला गेली तर ती वेदनेचे कारण बनू शकते.
ही कविता केवळ नव्वदीतील कवींचे आत्मचिंतन नाही, तर आजच्या स्पर्धात्मक, महत्त्वाकांक्षी आणि यशाच्या मागे धावणाऱ्या समाजालाही दिलेला एक मोलाचा संदेश आहे.
वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर अशी जीवनस्पर्शी कविता निर्माण करणाऱ्या प्रा. सू. द. वैद्य यांना मनःपूर्वक अभिवादन आणि त्यांच्या प्रतिभेला सादर प्रणाम!
— लेखन : सुहास शाळिग्राम
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800
