१. “तुझा माझा पाऊस”
तुझा माझा पाऊस…
शहाणा असून वेडा होतो,
तुझ्या मिठीतून माझ्या मुठीत…
थेंबाहून थोडा होतो !
तुझा माझा पाऊस…
तुझ्या माझ्यातच थांबलेला ,
देता देता, घेता घेता…
पहाटेपर्यंत लांबलेला !
तुझा माझा पाऊस…
छत्रीला ‘पाण्यात पहातो’,
उडवून तीला वा-यावर…
अंगोपांगी वहात रहातो !
तुझ्या माझ्या पावसाला…
तुझा माझा लागला लळा,
मातीत मुरून, कोंबात रूजून…
बघता बघता फुलला मळा !
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
२. मेघ दाटूनी…..
मेघ दाटूनीऽऽ कोसळती त्या जलधाराऽऽऽ
वीज कडाडूनीऽऽऽ चमके तो इंद्रधनुचा किनारा ऽऽऽ
मेघ दाटूनी कोसळती त्या जलधाराऽऽ त्या जलधाराऽऽऽ।।धृ।।
पाहुनी मन कसे हर्षित झाले
निसर्गाचे ते सप्तरंग फुलले
फुलले फुलले फुलले
सप्तरंग फुलले निसर्गाचे
वीज कडाडती मेघ गडगडती
कोसळते त्या जलधारा कोसळती त्या जलधारा
मेघ दाटूनी कोसळती त्या जलधारा
वीज कडाडूनी चमके तो इंद्रधनुचा किनारा।।१।।
काहूर झाले भरुनी मेघ
गेले गर्जुनी गेले पडूनी
एक अलौकिक हळवा स्पर्श
निसर्ग राजा गेला देवूनी
गेला देवूनी निसर्ग राजाऽऽऽ
वीज कडाडती मे गडगडती
कोसळती त्या जलधारा ।।२।।
वादळ वारा पाऊस धारा
टप टप पडतो गारा
सृष्टीची ही विविध रूपे
निसर्ग राजा गेला देवूनी
वीज कडाडती मेघ गडगडती
कोसळती त्या जलधारा
मेघ दाटूनी कोसळती त्या जलधारा।।३।।
— रचना : शांतीलाल ननावरे. बारामती
३. वेडा पाऊस
मागच्या पावसाला
सारे कळले होते
आजच्या पावसाने
मजला छळले होते
त्याचे स्वागत करण्या
तनमन आसुसलेले
याच्या आगमनाने
डोळे झाले ओले
त्याच्या जलधारांनी
देह चिंब भिजलेला
याच्या शिडकाव्याने
रंग मनाचा उडला
पाऊस नेहमीचा
परि नाही ओढ मना
पहिला पाऊस येता
ये पूर भावनांना
आल्यावर हा घाली
साद जुन्या जखमांना
निघते हळवी खपली
ठसठसती वेदना
पाऊस असा वेडा
शिरतो अंतर्यामी
बघता बघता हृदयी
वादळाची सुनामी
— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
४. पेरते व्हा
दिवस आले पेरणीचे
आरोळी ठोकतो पक्षी
वर्दी देतो पावसाची
ठेवून निसर्गाला साक्षी !१!
वादळी वारे सुरू जाहले
अवकाळी पडला पाऊस
शेतकऱ्यांची लगबग सुरू
काय करू नी काय पेरू !२!
नांगरणी वखरणी करूनी
आता शेती केली तयार
ढगांकडे पाहून विचार करतो
कधी पडेल पाऊस जोरदार !३!
चिंता मनात बी- बियाण्याची
कशी लावावी सोय
उसन उधारी करून त्याने
केली पेरणीची सोय !४!
मृगाच्या पावसाची हजेरी
मनात लावून गेली आस
यावर्षी तरी मेघराजा
देणार नाही ना गळ्याला फास ? !५!
पावसा अभावी कधी
संकट दुबार पेरणीचे
हीच धास्ती मनात येते
मग हाल पहावेना त्यांचे !६!
मृग गेला, आरधडा आला
तरी डोळे फिरवले पावसाने
मग कुठे रिपरिप सुरू झाली
डोळे भरले आनंदाने !७!
डोळे भरले आनंदाने !!
— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
५. पाऊस पाऊस…..
आला गडे बरसत पाऊस
ओले चिंब झाले तनमन
नियंत्या जोडीले दो बाहूस
धारेत गाते लयीत गुणगान
रंगीबेरंगी फुल वेलींचा
सुगंध आसमंती पसरे
आनंदासवे ग बागडती
लता वेलीवर फुलपाखरे
पर्ण पोपटी शालू नेसूनी
पक्षीगणं हो किलबिलती
मोर मोदे नाचे रांनीवनी
हर्षभरे त्यावरी ग डोलती
तबकात सुबक घेऊनी
आरास चैतन्य फुलांची
वसुंधरा सजली धजली
उधळण करी सप्तरंगाची
कवेत सर्व सहज घेऊनी
दाखवी रम्य निसर्ग शोभा
दिव्यत्वाची उजळते आभा
कोण फुलवी अगम्य प्रतिभा ?
— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व कविता छान