“रेखा दिवेकर”
असं म्हणतात की निवृत्तीनंतरच “आपलं” मनासारखं जगणं सुरू होतं ! वेळ असतो, अनुभव असतो, ज्ञान असतं, पैसा असतो आणि शारिरीक तक्रारी सुरु झालेल्या नसतात, त्यामुळे नवीन इनिंगसाठी उत्साह असतो. रेखाताई दिवेकरांच्या बाबतीत मला हे अगदी पटतं !
रेखाताई ॲारगॅनिक केमिस्ट्री घेऊन एम.एससी झाल्या. त्यानंतर त्यांनी ३५ वर्ष पार्ला कॅालेज मध्ये त्यांनी तो विषय शिकवला. तिथून त्या २०१० मध्ये निवृत्त झाल्या.
निवृत्त झाल्यानंतर रेखाताईंनी आपल्या ज्ञानाचा उपयोग वेगळ्या पध्दतीने समाजासाठी करायला सुरवात केली. त्यांनी उच्च शिक्षणात पदविका प्राप्त केली होतीच. शिवाय सुप्रसिध्द आहारतज्ञ मालती कारवारकर ह्यांच्याकडे आहारशास्त्र विषयक विशेष प्रशिक्षण घेतले. त्यामुळे रसायनशास्त्र, पोषक आहार आणि जीवनशैली यांचा सुंदर संगम साधून त्यांनी एक कार्यक्रम तयार केला. विविध ठिकाणी व्याख्यानं दिलीत. तसेच विविध संस्थेत, विविध विषयांवर बोलायला त्या जायला लागल्या. त्यांचे विषय खूप वेगवेगळे असतात.
पाकशास्त्र हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. काय खावं, कसं खावं, कुठली भांडी वापरावीत, कुठली वापरू नयेत, काय खाऊ नये, त्या मागचे शास्त्रीय कारण या सर्व गोष्टी, रेखाताई अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगतात. ज्या ठिकाणी त्या जाणार असतील, तिथले श्रोते पाहून त्या विषय ठरवतात. “चिरतारुण्याचा आरसा”, सुंदर मी होणार”, “शुध्द बीजापोटी फळं गोमटी”, “मुलांचे भरण पोषण”, “योग आणि आहार” , “गुरुजनांचे स्वास्थ्य अशा असेच अनेक विषयांवर त्यांची महाराष्ट्रातील कितीतरी शाळा, महाविद्यालये, महिला मंडळं, टिव्हि, रेडिओ , पॅाडकास्ट, ॲानलाईन अशी जवळपास २५० पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिली आहेत.
इतकेच नाही तर त्यांना अमेरिका, नैरोबी, केनिया, इंग्लंड आदी देशातील परिषदांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.
आहार विषयक जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पसरवल्याबद्दल रेखा ताईना जानेवारी 2025 मध्ये ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
लोकमत पुरस्कार, अजय पोहनकर फाऊंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी साठी पुरस्कार, सुत्रधार संस्थेतर्फे मातृशक्ती पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
रेखाताई उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. “आरोग्य संवाद” हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याची इंग्रजी आवृत्ती आणि विविध पाककृतींवर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
११ वी १२ वी च्या क्रमिक अभ्यासक्रमात त्यांचे रसायनशास्त्राचे पुस्तक होते. कालनिर्णय, आम्ही पार्लेकर, विविध दिवाळी अंक, मुख्याध्यापकाची डायरी, पोलिसांचे आरोग्य अशा अनेक ठिकाणी त्यांचे लेख प्रसिध्द झाले आहेत.” संतुर” च्या जाहिरातीसाठी आई आणि मुलीच्या नात्यावर कविता मागवल्या होत्या. त्यात भारतातून मराठी भाषेसाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले होते. हे बक्षिस म्हणजे चक्क सोन्याचे कानातले मिळाले होते!

रेखाताईंनी अनेक पुस्तकं अनुवादित केली आहेत. डॅा. फिरोझाबाद पारेख ह्यांचे “द कंपलिट गाईड टू बिकमींग प्रेग्नंट” रूजुता दिवेकरचे “प्रेग्नन्सी नोट्स” गौरव पुंज ह्यांचे “उडणाऱ्या लामांचा देश”, “चंद्रप्रकाशित हिमशिखरे”, “वुमेन ॲन्ड नेट समास तमाशा”, “व्यायामाशी मैत्री, आरोग्याची खात्री” “इंडियन सुपरफूड्स” “किडस् न्युट्रीशन” अशी ही त्यांनी अनुवाद केलेली पुस्तके आहेत.

रेखाताईंनी ३ वर्षे ऋषिकेश येथे योग फेस्टिव्हल मध्ये भाग घेऊन योगाचे शिक्षण घेतले आहे. त्या संगीत विशारद असून, अर्चना कान्हेरे यांच्याकडे नाट्यसंगीत व विकास भाटवडेकर यांच्याकडे सुगमसंगीताचे शिक्षण घेतले आहे. गायनासाठी ब्राह्मण सभा गिरगाव, सावरकर संघ, चित्पावन संघ आदी ठिकाणी त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत.“राग एक, रंग अनेक” या दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त केला आहे. सध्या त्या सुगम संगीताचे वर्ग घेत असून २५/३० महिला त्यांच्याकडे संगीत शिकत आहेत. २०२३ साली त्यांनी ‘स्वरप्रसन्न’ हा ग्रुप स्थापन केला. रीतसर संगीत शिक्षण घेतलेल्या कलाकारांना सोबत घेऊन, वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित संगीत कार्यक्रम त्या सादर करतात.आत्तापर्यंत 33 कार्यक्रम सादर केले आहेत.
अनोखी संकल्पना, “सुरेल गाणी, पौष्टिक खाणी… आरोग्यवाणी”, आजच्या सोशल मीडियाच्या ‘रील्स’च्या वर्षावात लोक अन्न पदार्थांबद्दल संभ्रमित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रेखाताईंनी गाण्यांच्या सोबतीने सजग आहार आणि उत्तम आरोग्य या विषयावर संवाद साधण्यासाठी ही संकल्पना मांडली.
हा कार्यक्रम आहार जागृकतेवर आधारित असून, नवनवीन आहार पद्धतीच्या लाटेत बदनाम झालेल्या रोजच्या जेवणाच्या ताटातील अन्नपदार्थातील पोषण मूल्यांबाबतची शास्त्रशुद्ध माहिती गप्पांच्या ओघात या कार्यक्रमात दिली जाते. जोडीला म्हणी, वाक्यप्रचार, कहाण्या आणि मराठी हिंदी गाण्यांचे सुरेल सादरीकरण त्या करतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होत असतो. मुंबईतील लोकप्रिय काला घोडा फेस्टिवल मध्ये त्यांना 2026 मध्ये संधी मिळाली होती .

निवृत्तीनंतर रेखा ताई इतक्या विविध गोष्टी करताहेत की त्यांना दिवसाचे २४ तास कमी पडताहेत. त्यांचे गावाकडे घर, शेती आहे. त्यांनी तिथे भरपूर भाज्या लावल्या आहेत. तिथेही त्यांचा मैत्रिणी, शिष्या,अन्य गोतावळा घेऊन नियमित फेरफटका असतो. त्या तिथे जाऊन आल्या कि ताज्यातवान्या होऊन परत नव्या दमाने कामाला लागतात.

रेखाताईंच्या ऋजुता ह्या थोरल्या कन्येने बी एससी झाल्यानंतर क्रिडा आणि आहारशास्त्र यातील अभ्यासक्रम पूर्ण केला.ती आहार मार्गदर्शक म्हणुन खुप लोकप्रिय झाली आहे. तर धाकट्या अंकिताने संगणक शास्त्रातील पदवी घेतली. त्यानंतर प्रख्यात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मधून मास्टर्स पदवी प्राप्त केली. आता तिची आणि तिच्या पतीची मिळून मोठी शिक्षण संस्था आहे.
एका अर्थाने बघायला गेले तर एका मुलीने त्यांच्या आहार शास्त्राचा वारसा तर दुसरीने उच्च शिक्षणाचा वारसा पुढे चालविला आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
रेखाताई सदा अशाच सदा कार्यरत राहो आणि आपल्याला त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळो यासाठी त्यांना शुभेच्छा.

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
