Homeसेवाभगवान महावीर : आदर्श विचार

भगवान महावीर : आदर्श विचार

भगवान महावीर जयंती हा जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा दिवस जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महावीर जयंती हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. यंदा मंगळवारी म्हणजेच ३१ मार्च २०२६ रोजी महावीर जयंती आहे.

भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला. त्यांना ७२ वर्षे जगल्यानंतर ५२७ ई.स. पूर्व मध्ये पावापुरी (बिहार) येथे कार्तिक कृष्ण अमावस्येला मोक्ष प्राप्त झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ आणि आई त्रिशला होते. त्यांचे बालपणाचे नाव ‘वर्धमान’ होते. त्याना ‘वीर’, ‘अतिवीर ‘, ‘सन्मति’ या नावानी सुद्धा ओळखले जात असे.

भगवान महावीरांचा जन्म राजघराण्यात झाला. सर्व सुखसोयी त्यांच्या पायाशी होत्या. पण त्यांनी हे जाणले की खरे सुख बाह्य वैभवात नसून अंतर्मनाच्या शांततेत आहे. म्हणूनच वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी राजसुख, संपत्ती आणि कुटुंबाचा त्याग करून वैराग्याचा मार्ग स्वीकारला. १२ वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली, अनेक संकटांना तोंड दिले, अपमान सहन केला. त्यांना ऐश्वर्यापेक्षा साधेपणा आणि शांत जीवन अधिक आवडत असे.
काही परंपरांनुसार, त्यांचा विवाह यशोदा नावाच्या स्त्रीशी झाला होता आणि त्यांना प्रियदर्शना नावाची मुलगी होती. मात्र, काही जैन परंपरा त्यांना अविवाहित मानतात. असा, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडासा मतभेद दिसतो.

वयाच्या सुमारे ३० व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग केला.आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजसुख, संपत्ती आणि कुटुंब सोडून संन्यास (वैराग्य) स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी १२ वर्षे कठोर तप केले.
कमी अन्न घेणे, मौन पाळणे, ध्यानधारणा करणे, सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग. अशा प्रकारे त्यांनी स्वतःला पूर्णपणे शिस्तीत ठेवले. अत्यंत साधे जीवन ते जगले.
ते नग्न साधू म्हणून (दिगंबर परंपरेनुसार) जगले, म्हणजेच त्यांनी कोणतीही भौतिक वस्तू जवळ ठेवली नाही. त्यांचे जीवन पूर्णपणे अपरिग्रह (काहीही न साठवणे) या तत्त्वावर आधारित होते. सर्वांबद्दल समान भावना त्यांच्या मनात होती. ते कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करत नसत. गरीब असो किंवा श्रीमंत, माणूस असो किंवा प्राणी ! ते सर्वांशी समान प्रेमाने वागत.भगवान महावीरांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून, आत्मशांती, संयम आणि साधेपणात असते. आधी स्वतः केले आणि मग जगाला सांगितले अशी त्यांची खरी थोरवी होती. नाहीतर पुस्तकी ज्ञान, भाषणे, उपदेश तर कित्येकदा केले जातात. पण त्यांनी ते स्वतः आधी करून मग उपदेश केल्यामुळे ते लोकांच्या मनाला पटतात.

भगवान महावीरांनी मानवाला शांत, संयमी आणि नैतिक जीवन जगण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे दिली. ही तत्त्वे आजही अत्यंत उपयुक्त आहेत.महावीर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो आहे अहिंसा, सत्य आणि मानवतेचा जिवंत संदेश !
जैन मंदिरांमध्ये भगवान महावीरांची पूजा केली जाते. त्यांच्या शोभायात्रा म्हणजेच मिरवणुकाकाढल्या जातात. ठिकठिकाणी दानधर्म आणि सेवा कार्य केले जाते. गरीबांना अन्न व वस्त्र वाटप केले जाते. त्यांच्या शिकवणीचे प्रवचन दिले जाते.

महावीर जयंती आपल्याला शांतता, अहिंसा आणि साधे जीवन जगण्याचा संदेश देते. आजच्या काळातही त्यांचे विचार खूप उपयोगी आहेत.
भगवान महावीर जयंती हा केवळ सण नसून, तो मानवतेचा आणि चांगल्या जीवनमूल्यांचा उत्सव आहे. त्यांच्या शिकवणीनुसार वागलो तर समाज अधिक शांत आणि सुखी होईल.
भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित काही प्रेरणादायी किस्से खाली दिले आहेत.

एकदा भगवान महावीर ध्यान करत असताना एक विषारी साप त्यांच्या जवळ आला. लोक घाबरले, पण महावीर शांतच राहिले. त्यांनी सापाला प्रेमाने सांगितले, “तूही जीव आहेस, राग सोड.”
महावीरांच्या शांततेने सापही शांत झाला आणि निघून गेला. या कृतीतून त्यांनी अहिंसा हाच खरा धर्म आहे, ही शिकवण साऱ्यांना दिली.अपमान सहन करण्यासाठी खूप संयम, आणि मनाच्या ताकदीची गरज असते. ती त्यांनी आत्मासात केली होती.

महावीर स्वामी तप करत असताना काही लोकांनी त्यांची थट्टा केली, अपमान केला, पण त्यांनी कधीही राग व्यक्त केला नाही.ते नेहमी शांत राहिले आणि सहनशीलतेने सर्व सहन केले. त्यांच्यातील दया आणि करुणेचा प्रसंग सांगितला जातो.एकदा त्यांनी पाहिले की एक माणूस प्राण्यांना त्रास देत होता. महावीरांनी त्याला समजावले की सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे. त्या व्यक्तीला आपली चूक कळली आणि त्याने हिंसा सोडली.

हे सर्व किस्से आपल्याला शिकवतात की अहिंसा, सत्य, संयम, दया आणि साधेपणा या गुणांनी जीवन अधिक सुंदर आणि शांत बनते. यातूनच त्यांनी जगाला दिला एक अमूल्य संदेश,“स्वतःवर विजय मिळवणे हाच खरा पराक्रम आहे.”

भगवान महावीरांनी दिलेली पाच तत्त्वे म्हणजे जीवनाचा खरा मार्गदर्शक आहेत.
ती अशी आहेत..
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
१) अहिंसा : म्हणजे फक्त कोणाला मारू नये एवढेच नाही, तर कोणालाही मनाने, वाणीने किंवा कृतीने दुखावू नये.
२) सत्य : म्हणजे केवळ खरे बोलणे नाही, तर सत्याने जगणे.
३) अपरिग्रह : म्हणजे अनावश्यक गोष्टींचा त्याग करून साधे जीवन जगणे. जास्त संपत्ती, वस्तू किंवा लोभ यापासून दूर राहावे.
४) अस्तेय : इतरांची वस्तू परवानगीशिवाय घेऊ नये. प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक जीवनावर भर देण्याचा प्रयत्न करावा असा याचा अर्थ आहे.
५) ब्रह्मचर्य : इंद्रियांचे नियंत्रण ठेवून शुद्ध आणि संयमी जीवन जगावे. मन, वाणी आणि शरीर यांवर नियंत्रण ठेवणे. मनाचा संयम हा सर्वांत महत्वाचा असतो. असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे. ही पाच तत्त्वे जैन धर्माचे मुख्य आधार आहेत.
या पाच तत्वांसोबतच त्यांनी आणखीही काही छान तत्वे अंगीकरण्यास सांगितली आहेत. त्यातील पुढचे म्हणजे सहावे तत्व म्हणजे.
६) अनेकांतवाद : प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू असतात. आपले मतच बरोबर आहे असे न मानता इतरांचे विचारही समजून घ्यावेत.
७) क्षमा : इतरांच्या चुका माफ कराव्यात. राग न ठेवता मन शांत ठेवावे.
८) समता : सर्व जीव समान आहेत. कोणावरही भेदभाव, अन्याय करू नये.

जर आपण त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केला, तर आपले जीवन नक्कीच सुंदर होईल.
आजच्या काळात आपण पाहतो — राग, द्वेष, स्पर्धा, लोभ यामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे.
अशा वेळी भगवान महावीरांची शिकवण आपल्याला पुन्हा माणूस बनायला शिकवते. त्यांच्या आदर्श तत्वांचे पालन केल्यामुळे आपल्या घरात आणि समाजात शांतता आणि प्रेम निर्माण होईल.
जैन मंदिरांमध्ये भगवान महावीरांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी सुंदर जैन मंदिरे स्थापन केली आहेत. पावापूर येथे सुन्दर जलमंदिर आहे, मोहनखेडा येथेही अत्यंत सुंदर मंदिर आहे तर कुंथलगिरी येथील जैनमन्दिर खूप उंचावर आणि सुंदर असल्यामुळे प्रसिद्ध आहे. सर्व मंदिरातून
शोभायात्रा (मिरवणुका) काढल्या जातात. दानधर्म आणि सेवा कार्य केले जाते. गरीबांना अन्न व वस्त्र वाटप केले जाते. त्यांच्या शिकवणीचे प्रवचन दिले जाते.

महावीर जयंती आपल्याला शांतता, अहिंसा आणि साधे जीवन जगण्याचा संदेश देते. आजच्या काळातही त्यांचे विचार खूप उपयोगी आहेत.
भगवान महावीर जयंती हा केवळ सण नसून, तो मानवतेचा आणि चांगल्या जीवनमूल्यांचा उत्सव आहे. त्यांच्या शिकवणीनुसार वागलो तर समाज अधिक शांत आणि सुखी होईल.
आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. कोणालाही दुखावणार नाही. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारू. लोभ आणि रागापासून दूर राहू.
“जगा आणि जगू द्या” हा भगवान महावीरांचा संदेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरला तर आपला देश मानवतेच्या दृष्टीने उच्च स्थानावर पोहोचेल
यात तिळमात्र शंकाच नाही. फक्त भारतातच नाही,तर जगभरातील लोकांनी त्यांचे विचार अंगिकारले तर जगातील सर्व वैरभाव संपून शांतता प्रस्थापित होईल. आता ही काळाची खरी गरज आहे.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments