Homeसाहित्यएक गोष्ट…

एक गोष्ट…

जेवणाच्या सुट्टीनंतर, नववीच्या वर्गावर साबळे सरांचा तास होता.
रोजच्या प्रमाणे बाहेर पाऊस कोसळत होता.शिकवणं संपल्यावर सरांनी खिडकीजवळ जाऊन एक फोन केला.पावसाच्या आवाजातही त्यांचा आवाज विद्यार्थ्यांना चांगला ऐकू येत होता.
“कुठे आहेस बाळा?”
“आणि मग?”
फोन संपल्यावर मोबाईल खिशात ठेवत ते शांतपणे पुन्हा विद्यार्थ्यांकडं वळाले,
“माझ्या मुलीला फोन केला होता”.
विद्यार्थ्यांपैकी कुणीतरी विचारलं,” त्याच ना सर तहसीलदार आहेत त्या ?”
“हो, पाऊस प्रचंड पडतोय. ती ज्या तालुक्यात आहे, तिथल्या एका गावात, पावसानं काही शेतात पाणी शिरून पीकं वाहून गेली,
त्याचा पंचनामा करते आहे”.
“सर, त्यांच्याविषयी मागं तुम्ही काही सांगत होता.आता सांगा ना”.
कुणीतरी धीट विद्यार्थी बोलला.
“हो सर, सांगा ना”. आणखी काही विद्यार्थी ओरडले.
“माझं शिकवणं संपलंय आजचं.म्हणून सांगतो एक गोष्ट. पण आज माझ्या मुलीची नाही.तिचीही सांगेन परत कधीतरी निवांत वेळी. आज एका मुलीची गोष्ट सांगतो.
बहुतेकजणांना ती माहित नसेल. पण गोष्टीची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत असेल.
सगळेजण कान टवकारून सरांकडं पाहू लागले.

समोरच्या टेबलावर बसून सर बोलू लागले,
“रामायण सगळ्यांना माहित आहेच. त्यातील राम, सोडता आणखी कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला माहीत आहेत?”
“लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या बायका, दशरथ, त्याच्या तीन राण्या,हनुमान, रावण, कुंभकर्ण”,
“खारूताई, जटायू”,
“वाल्मिकी ऋषी,लव कुश”
“आणि ?”
“निशाद, शबरी .”
” मंथरा दासी.जिच्यामुळे रामाला वनवास घडला आणि पुढे त्यामुळेच रामायण घडले”.
” अयोध्येतील आणि लंकेतील प्रजा”.
सगळ्यांचं ऐकून झाल्यावर सर बोलू लागले,
“आज मी रामायणातील अशाच एका बहिणीची गोष्ट सांगतो,जिचं अस्तित्व खुद्द रामाच्या जन्माचं कारण बनलं होतं.पण अनेकांना तिचं नावही माहीत नाही.
सहाजिकच आहे,वाल्मिकी रामायण ,रामचरित मानस यांच्यात तिचा उल्लेख नाही. कोणत्याही चित्रपटात किंवा गाजलेल्या टीव्हीवरच्या मालिकांमधूनही तिचं नाव आपण ऐकलं नाही.
दक्षिणेकडील काही रामकथांमध्ये तिचा उल्लेख आढळतो”.
सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली.
“राजा दशरथ आणि त्याची थोरली राणी कौसल्या यांना रामाआधी एक मुलगी झाली होती तिचं नाव होतं शांता. सुस्वरूप, युध्दकला, पाककला, साहित्य वगैरे कलांमध्ये ती पारंगत होती. ती जशी हुषार होती तशीच तिच्या शालिनपणाने आणि सौजन्यपूर्ण वागणुकीने ती अयोध्देत सर्वांची प्रिय झाली होती. एकदा अंगदेशीचे राजा रोमपथ आपली राणी वर्षिणीसोबत अयोध्देत आले होते. वर्षिणी ही कौसल्येची थोरली बहिण होती.
रोमपथ आणि वर्षिणी ह्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दु:खी होते.त्यांच्या आयोध्दा भेटीत छोट्या शांताने त्याची उत्तम सेवा केली होती. ते पाहून ‘संतान असावी तर शांतासारखी’ असे म्हणून
वर्षिणी गेली.

नि:संतान असल्याने, दु:खी असलेल्या रोमपथ आणि वर्षिणी दांपत्याला दशरथाने आपली कन्या शांता दत्तक दिली. आपल्या पोटचा गोळा आपल्यापासून दुरावणार, म्हणून कौसल्येला सुरवातीला दु:ख झाले असणारच. मात्र आपली मुलगी खुद्द मावशीकडेच सुखी राहील याचा तिला आनंदही झाला असेल.

शांता वडलांनी दिलेल्या शब्दाला मान देऊन आपल्या आईवडिलांना सोडून अंगदेशी गेली.
तिथेही तिने सर्वांचे मन जिंकून घेतले.पुढे तिचा विवाह ऋषी शृंग यांचेशी झाला.हेच ते ऋषी शृंग ज्यांनी पुढे जाऊन राजा दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
यामुळेच दशरथ राजाला चार गुणी पुत्र प्राप्त झाले असा उल्लेख आहे.राम हे यापैकी एक.याच रामाच्या कर्तृत्वाने रामायण घडले.
शांतादेवी (जी रामचंद्रांची थोरली बहिणी आहे) यांची अशी अनेकांना माहीत नसलेली गोष्ट .
हिमाचल प्रदेशात शांतादेवीचं एक मंदिर आहे.अनेक भाविक तिथे दर्शन नेहमी घेत असतात.”
सर थांबले. खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसत त्यांनी विचारलं,” आवडली का ही गोष्ट ?”
बाहेर पाऊस थांबला होता. तास संपल्याची बेलही झाली होती.पण कुणाचेच तिच्याकडं लक्ष नव्हतं. वर्गाबाहेर पडणाऱ्या सरांकडं सगळेजण आवाक होऊन पहात होते.

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा डाॅ.सतीश शिरसाठ. इंग्लंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments