Homeसाहित्यअभय मोकाशी : पत्रकारितेतील एक धगधगता निखारा

अभय मोकाशी : पत्रकारितेतील एक धगधगता निखारा

जेष्ठ पत्रकार, पत्रकारितेचे अध्यापक अभय मोकाशी यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आठवणी जागविणारा हा लेख. अभय मोकाशी यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

अभय मोकाशी म्हणजे पत्रकारितेतील एक धगधगता निखारा होता. इंग्रजी पत्रकारितेतून सरकारवर आसूड ओढणारा मराठमोळा पत्रकार म्हणून अभय मोकाशी यांची ओळख. तत्वनिष्ठ, सिद्धांतवादी, जे पटेल तेच बोलणार, रुचेल तेच करणार. कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही, असा खाक्या. नवोदितांना योग्य, बिनचूक मार्गदर्शन आणि संपादक म्हणुन बातमीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. वृतपत्र छपाईसाठी वेळेवर पाने रवाना करतांना पटकन बातमी स्वतः लिहून हातावेगळी करतांनाही ज्या बातमीदाराचे श्रेय आहे, ते त्याच बातमीदाराला देतांना त्याचे श्रेयनाम ठळकपणे छापणार.

अभय मोकाशी यांच्या काही बातम्या ऐतिहासिक ठरल्या. त्यांच्या बातमीमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पाय उतार व्हावे लागले होते. कोणत्याही राजकीय पक्षासाठी ताटाखालचे मांजर बनण्यापेक्षा खणखणीत, परखडपणे आपली विचारसरणी कायम जपून ठेवीत, त्या पद्धतीने अख्खे ते आयुष्य जगले.

अभय मोकाशी यांनी तरुणांनी पत्रकारितेत कसे कार्य करावे याचा वस्तुपाठ घालून दिला. यासाठी अकादमीही स्थापन केली. नवनवीन पत्रकार त्यांनी घडविले. पत्रकार संघटनांमधून चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काही वृत्तपत्रे बंद पडून पत्रकार बेरोजगारीच्या खाईत लोटले जाऊ नयेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांविरोधात शड्डू ठोकायलाही त्यांनी कमी केले नाही.

पत्रकारांसाठी राष्ट्रीय पातळीवर योग्य ते निर्णय घेण्यात यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांकडून पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी यांना आयोगाची स्थापना आणि त्यांची अंमलबजावणी करणे यावर त्यांचा कटाक्ष असे. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट ही संघटना ट्रेड युनियनच्या धर्तीवर होती म्हणून त्यांनी त्या संघटनेचा सरकार विरोधात चळवळ, लढा उभारण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विशेष उपयोग करुन घेतला. प्रसंगी काळ्या फिती लावून, मोर्चा काढून लोकशाही मार्गाने आंदोलन करणे याचा तर अभय मोकाशी यांनी अवलंब सातत्याने केला. ‘इंडिपेंडंट’, ‘इंडियन पोस्ट’ ही इंग्रजी वृत्तपत्रे बंद पडली त्यावेळी ते आंदोलनात अग्रभागी होते. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून ते हिरीरीने आंदोलनात सहभागी होत असत. मिड डे चे ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या झाली, त्यावेळी पत्रकारांनी अक्षरशः रान पेटविले होते आणि प्रचंड मोर्चा काढला होता. त्यातही ते अग्रभागी होते. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवतांना परिणामांची पर्वा केली नाही. जुन्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. लोकसभा मतदारसंघातून दिग्गज उमेदवार समोर असताना देखील निवडणूक लढविताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. लिहिण्यासारखे खूप आहे. अभय मोकाशी हा पत्रकारितेतील ज्वलंत इतिहासाच्या कादंबरीचा विषय आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची आज कुणाचीही पात्रता नाही. परंतु अलिकडच्या काळातील दिनू रणदिवे, मधू शेट्ये अशा दिग्गजांच्या मांदियाळी मध्ये बसणारे लढवय्ये पत्रकार म्हणून अभय मोकाशी यांचे नाव निश्चितच घ्यावे लागेल.

आज संघटनांच्या नावाखाली दुकाने चालविणारे महाभाग बरेच आहेत. पण आपल्याला कोणताही रंग चिकटवून घेण्याऐवजी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देणारा पत्रकारितेतील धगधगता निखारा म्हणजे अभय मोकाशी हेच म्हणावे लागतील. कॉम्रेड अभय मोकाशी यांच्या कार्यकर्तृत्वाला लाल सलाम !

— लेखन : योगेश वसंत त्रिवेदी. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments