आज पासून आपण दर शुक्रवारी ” खिडकी” हे सदर प्रसिद्ध करणार आहोत. हे सदर श्री किरण आचार्य हे लिहिणार आहेत. व्यवसायाने इंजिनीयर असलेले श्री किरण आचार्य हे विविध अभियांत्रिकी आणि साहित्य संस्थांशी जोडल्या गेले आहेत.
आतापर्यंत त्यांची सहा मराठी आणि एक इंग्रजी अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या बरोबरच ते इंडियन एक्सप्रेस महाराष्ट्र टाइम्स, ठाणे वैभव, अशा वर्तमानपत्रातून स्तंभलेखन आणि विविध दिवाळी अंकासाठी लेखन करीत असतात. त्यांना साहित्य विषयक अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे सहर्ष स्वागत आहे.
– संपादक
माझा जन्म 1980 चा. या दरम्यान जन्माला आलेली जी मंडळी आहेत ती खरी नशीबवान आहेत. कारण आमच्या पिढीने जुना काळ आणि हे आधुनिक वेगवान जग या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. आम्ही 10-20 पैशांचे व्यवहारही बघितले आहेत, आणि पैशांना जेव्हा काहीच किंमत उरली नाही असा काळही बघितला आहे. आम्ही पोस्टाची पेटी, त्यात टाकली जाणारी पत्रे, त्याचे प्रकार, म्हणजेच 15 पैशांचे पोस्टकार्ड, 75 पैशांचे आंतरदेशीय पत्र, आणि एक रुपयाचे पोस्टाचे पाकीट हे बघितलेले आहेत. पत्र लिहिणे, ते पाठवणे, आणि त्याच्या उत्तराची वाट पाहणे हे आम्ही अनुभवले आहे.
त्याकाळी गावाहून निघताना, निरोप देताना, पाणावलेले डोळे... गाडी निघताना, 'पोचल्यावर पत्र पाठवा.' असा प्रेम निरोप आम्ही अनुभवला आहे. परतणाऱ्या व्यक्तीला गाडी दिसेनाशी होईपर्यंत स्टेशनवर गाडीच्या दिशेने हात हलवून टाटा करणारी मंडळी तेव्हा होती. एक दिवस प्रवासाचा, नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुखरूप पोहोचल्याचे पत्र ती पोचलेली व्यक्ती पोस्टात टाकायची. साधारणतः तीन चार दिवसांनी ते पत्र मिळायचे. तोपर्यंत गावातील व्यक्ती संयम राखून पत्राची वाट बघायचे. फोन म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते तेव्हा. आमच्या गावात तर मी लहान असताना फोनच नव्हता. आम्हाला फोन फक्त सिनेमात माहीत होता. मी पहिल्यांदा एक फोन डॉक्टरांच्या दवाखान्यात बघितला. गोल डायलिंग रिंग असलेला तो फोन, त्याची ट्रिंग ट्रिंग ही खूपच विलक्षण वाटायची तेव्हा. एखादी जादूसमोर घडत असावी असे वाटायचे तेव्हा. काही वर्षांनी आमच्या गावी एक फोन आला होता. तो फोन म्हणजे सगळ्यांचेच आकर्षणाचे केंद्र ठरला होता. त्या एका फोनचा नंबर गावातील सर्वांनीच आपापल्या नातेवाईकांना देऊन ठेवला होता. अर्थात फोन करणे त्यावेळी कुणालाही परवडणारे नव्हते. अगदी तातडीचे असल्यास नेमका निरोप द्यायला त्याचा वापर केला जायचा. तो देखील ट्रंक कॉल बुक करून मग वाट बघून तो फोन लावला जायचा.
दरम्यान लोकल कॉल साठीचे कॉइन बॉक्स, आणि बाहेरगावी फोन करायला एसटीडी बुथ हा प्रकार आला. एक होतं की, 80 ते 2000 सालापर्यंत कोणतेही बदल अगदी रातोरात होत नव्हते. एखादी निर्माण झालेली व्यवस्था ही सामान्य लोकांना समजून ती अंगवळणी पडल्यावर निदान पाच-दहा वर्ष तरी तशीच असायची. त्या पिढीने हा ठहराव बघितलेला आहे.
2000 सालानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आज कोणत्याही सिस्टमला ठहराव राहिला नाही. आज निर्माण झालेली व्यवस्था काही तासात बदलून नवीनच काहीतरी वेगळं समोर येतं. पूर्वी जुने-जाणते लोक त्यांचे जे अनुभव सांगायचे, ते ऐकून तेव्हाची आमची तरुण पिढी नक्कीच काहीतरी शिकायची. त्या वेळेच्या वरिष्ठ लोकांचे अनुभव नक्कीच आमच्या उपयोगी यायचे. कारण त्यात फारसे बदल झालेले नसायचे. आज मात्र कुणाचाच अनुभव कोणाच्याच कामात येत नाही. मी जे करतो, मी जे अनुभवतो, त्याचा, त्या माहितीचा, कुणालाही फारसा फायदा नसतो. कारण दुसरा त्या गोष्टीला जेव्हा सामोरा जातो, तेव्हा तिच्या सर्व पद्धती, प्रक्रिया, नियम, हे बदललेले असतात.
गेलेला काळ, सध्याचे वर्तमान, आणि येणारे भविष्य, नेमके याकडे कसे पाहावे हा आजचा मुख्य प्रश्न आहे असे मला वाटते. आणि मग आठवते ती 'खिडकी...'
लहानपणी जानेवारी- फेब्रुवारीमध्येच माझे वडील आमचे गावी जाण्याचे ट्रेनचे तिकीट काढायचे. आणि तेव्हा ते रिझर्वेशन तिकीट आले, की रोज माझ्या मनात विचार यायचा की आपल्याला खिडकीजवळचे तिकीट मिळाले की नाही? तेव्हा आता सारखे तिकिटावर कोणती विंडो सीट आहे हे लिहिलेले नसायचे. केवळ सीट नंबर असायचे. आणि आता सारखे तेव्हा डब्यातील सीट ची रचना दाखवणारे एकही साधन नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवासाचा दिवस, आणि गाडीत चढल्यावर मगच समजायचे की आपल्याला खिडकीची जागा मिळाली की नाही.गाडीत जेव्हा खिडकीची सीट मिळायची तेव्हा तो आनंद गगनात मावायचा नाही. खिडकीत बसून वेगाने धावणाऱ्या गाडीच्या बाहेर बघत प्रवासाचा आनंद काही वेगळाच असतो.
मुळात खिडकी आणि त्यातून दिसणारे बाहेरचे जग याचे आकर्षण प्रत्येकालाच असते. आजही कुणी विंडो सीट नाकारत असेल असे वाटत नाही. कोणतेही वाहन असो खिडकीची जागा ही प्रत्येकालाच प्रिय असते. ज्या प्लॅटफॉर्मवर आपण उभे असतो त्याच प्लॅटफॉर्मला गाडीत बसून, खिडकीतून पाहताना वेगळीच मजा येते. खिडकीची जादूच वेगळी आहे. अगदी विमानात जरी बसत असू , तरी आपली पहिली पसंती ही खिडकी
जवळच्याच जागेला असते.
घर घेताना देखील घरात खिडक्या किती आहेत हेच बघतो. घराच्या बाहेर पडून आपण सर्व परिसर कधीही बघू शकतो. तरीही घरात खिडकीतून तोच परिसर पाहताना वेगळा अनुभव असतो. खिडकी हे माध्यमच खास आहे.
आतले आणि बाहेरचे असे दोन जग ही खिडकी निर्माण करते. आतल्याला बाहेरचे जग, आणि बाहेरच्याला खिडकीतून दिसणारे ठराविक आतले जग, दोन्ही हवेहवेसे वाटणारे....
कदाचित म्हणूनच आधुनिक जगात देखील मायक्रोसॉफ्टने कम्प्युटरमध्ये विंडोज हा शब्द वापरला असावा!. ही पण एक खिडकीच आहे, जी त्याने आपल्या हातात दिली. आपण या नवा युगात रोज समाज माध्यमातून एकमेकांच्या अकाउंट मध्ये या खिडकीतूनच डोकावून बघतो, आणि त्यातून देखील अगदी तसाच आनंद मिळवतो.
काही व्यक्ती त्यांच्या समाज माध्यम घराच्या खिडक्या उघड्या ठेवतात. मग आपण त्यातून डोकावून त्यांचे तपशील बघतो. काही जण हे अकाउंट लॉक करतात. म्हणजे थोडक्यात खिडकी बंद करतात. मग आपल्याला त्यांना सांगून ती खिडकी उघडून मागावी लागते. गंमतच आहे सगळी. थोडक्यात आजही कृत्रिम का होईना पण खिडकीची जादू कायम आहे.
अशाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खिडकीतून दिसणाऱ्या काही घटना, काही प्रसंग, आपण या नव्या ‘खिडकी’ मालिकेतून बघूया. काही खऱ्या खिडकीतून टिपलेले, आणि काही या आजच्या स्मार्टफोन नामक डिजिटल खिडकीतून टिपलेले प्रसंग! यात मी कोणतेही तत्त्वज्ञान सांगणार नाही. जे दिसले, जे घडले, आणि जे जाणवले, ते जसेच्या तसे मी आपल्यासमोर मांडणार आहे. तुम्ही देखील ते आहेत तसे स्वीकारून, आपल्या पद्धतीने त्यातून अर्थ काढू शकता. कारण मी वर उल्लेखल्याप्रमाणे आजचे जगच असे आहे, की माझे अनुभव आणि ज्ञान हे केवळ माझ्यापुरते मर्यादित आहे. प्रत्येकाला आपला स्वतःचा अनुभव घ्यावा लागतो हे आजचे वास्तव आहे. तुम्हाला काय वाटते? जरूर कळवा.
क्रमशः

— लेखन: किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800
