“डॉ अनंत देशमुख”
साहित्यव्रती प्रा डॉ अनंत देशमुख यांचा जन्म १ जुलै १९४८ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बागदांडे येथे झाला.त्यांना लहानपणापासून वाड:मयीन वातावरण लाभले.त्यांच्या आजोबांना वाचनाची आवड होती.त्यामुळे लहानपणीच त्यांना ग्रंथांचा खजिना हाती मिळाला आणि तेव्हापासून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली.
देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण बागदांडे येथे तर पुढील सारळ, कराड, जैतापूर येथे झाले.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलिबाग येथे झाले. देशमुख १९७६ साली पुणे विद्यापीठातून बीएससी, १९७८ साली बी.एड. १९८१ साली एम.एड. झाले. त्यानंतर त्यांनी १९९० साली कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यावर पी.एच.डी. प्राप्त केली.
देशमुख यांनी सुरुवातीला डॉकयार्ड येथील जहाज दुरुस्तीच्या कारखान्यात काम केले. परंतु साहित्याची आवड असल्याने ते त्या नोकरीत रमले नाहीत. कालांतराने ते शैक्षणिक क्षेत्राकडे वळले त्यांनी विद्यादान व साहित्यातील संशोधन करून त्यावर लेखन करण्याचे घेतलेले व्रत निवृतीनंतरही सुरू आहे. देशमुख यांनी एम.फिल करणाऱ्या वीस आणि पी.एच.डी. करणाऱ्या दहा विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले आहे.

देशमुख यांनी संशोधनात्मक लेखन विपुल प्रमाणात केले आहे.१९८८ साली “नाट्यविचार” तर १९९३ साली “आधुनिक नाट्यविचार” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या मूळ प्रतींचा अभ्यास करून “विशाखाभोवती” हे पुस्तक लिहिले. त्यांनी दुर्लक्षित विषय हाताळले आहेत. प्रसिध्द व्यक्तीच्या प्रकाशात न आलेल्या महत्वाच्या भागावर संशोधन करून त्यावर प्रकाशझोत टाकला आहे. आनंदीबाई जोशी यांच्यावर अनेकांनी लिहीले आहे परंतु देशमुख यांनी त्यांचे पती गोपाळराव जोशी यांचे चरित्र लिहीले आहे. त्याचप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अनेकांनी लिहीले आहे परंतु देशमुख यांनी टिळकांचे पुत्र श्रीधरपंत यांच्यावर चरित्र लिहून अनेकांना माहीत नसलेली माहिती उपलब्ध करून दिली आहे.

देशमुख यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या बद्दल सखोल अभ्यास करून त्यांचे चरित्र आठ खंडात प्रकाशित केले आहे. चरित्र, प्रवास वर्णन, कथा, ललित लेख, संशोधनात्मक लेखन विपुल प्रमाणात केले आहे.
स्वतःबद्दल कमी बोलणाऱ्या देशमुख यांनी “अनन्वय” नावाने आत्मचरित्र लिहीले आहे.त्यांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाटककार अजित दळवी यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावर आधारित “समाजस्वास्थ्य” हे नाटक लिहिताना अनंत देशमुख यांचे मार्गदर्शन घेतले आहे.

देशमुख यांना शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रांत अनेक पुरस्कार, मानसन्मान प्राप्त झाले आहेत. नेहमी हसतमुख असलेल्या सतत वाचन, लेखन यात मग्न असणाऱ्या साहित्यव्रती डॉ अनंत देशमुख यांनी येत्या काही वर्षात पुस्तकाची शंभरी पुरी करावी.त्यासाठी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

— लेखन : दिलीप गडकरी. ठाणे
— संपादनc: देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
