“केराचा डबा”
मैत्रीचं नातं देवघेवीनं सुरू होतं आणि त्यामुळे वाढतं देखील. देवघेव म्हणजे संवाद असतो, मदत असते. कधी सल्ला, कधी दिलासा दिला जातो किंवा साधा रुमाल दिला जातो किंवा अगदी साधी सेफ्टी पिन देखील ! पण देवाण घेवाण हवीच. ही देवघेव एकतर्फी असेल तर नातं टिकत नाही. शेजारणीकडून आलेली वाटी खाऊ घालूनच परत दिली जाते. माझी आजी नेहमी म्हणत असे, “जग हे, दिल्या घेतल्याचे !”
वस्तूची नसेल तर संवादाची तरी देवाण घेवाण हवीच. ट्रेन मधली मैत्री पण “जागा”‘ दिल्याने, घेतल्याने सुरू होते, नंतर घट्ट होते हा अनेकांना अनुभव असेल. मग गप्पा सुरू होतातच. आगळी वेगळी देवाण घेवाण ही ! ट्रेनमध्ये सीट मिळवणे हा अती महत्वाचा विषय आहे. (जेन्टस डब्यात सुद्धा अशी ‘जागा’ मिळवताना असेच ग्रुप होतात.)
अशीच मला स्मिता भेटली आणि आमची मैत्री झाली होती. मी सी. एस. टी.हून मुलुंड स्टॉपिंग फास्ट ट्रेन पकडत असे. स्मिता पण त्याच ट्रेनने येत असे आणि मुलुंडला उतरत असे. मी डोंबिवलीला पुढे येत असे. आमची मैत्री उठून दिसत असे. कारण आम्ही त्या ट्रेनचे कायमचे मेंबर ! आमच्या सी. एस. टी. स्टेशनला ज्या गप्पा सुरू होत असत, त्या मुलुंड स्टेशन दिसेपर्यंत चालायच्या. उतरल्यावर खिडकीत हात दाखवून ‘उद्या भेटू गं’ असे ती म्हणत असे.
गप्पा म्हणजे संवाद नसायचा, हे आता लक्षात येतंय. ती खूपदा तिची छळीक सासू आणि चक्रम नवरा ह्यांचे एकेक प्रसंग सांगत असे. रोज काही ना काही घडायचेच. नाहीतर आठवणी असायच्याच.

स्मिताच्या घरात एकदा मुलाने पैसे घेतले, तेव्हा तर गहजब झाला मोठा. कपाटाचा एक ड्रावर पैशाची साठवण म्हणून वापरला जात असे. मुलगा कॉलेजमध्ये जाणारा. “जी पे” नव्हतेच तेव्हा. खरं तर अँन्ड्रॉईड फोन देखील नव्हते. मनी ट्रान्स्फर सुद्धा तेव्हढे सर्रास चालत नसे. कॅशने खूपदा व्यवहार होत असत. तिच्या मुलाने कॅश उचलली, जी त्याच्यासाठीच घरात आणली होती ! फी द्यायची होती. त्याने फी भरलीदेखील.
हिच्या सासूबाईंनी हिच्या नवऱ्याचे कान भरले. लगेच नवरा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करायला निघाला. तिचे दीर मध्ये पडले. असं काही घडलं तर तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही घातलं तर बघ. अशी धमकी मिळाल्यावर तो मातृभक्त शांत झाला. स्मिताचा नवरा ह्या प्रकारचा मातृभक्त होता ! अपत्याचा जन्मदाता म्हणायचा का हा ? बिचारीचे तेच तर दुःख होते. आमच्या ट्रेनमध्ये ती सर्वांना हे दुःख ‘वाटत’ असे.
मी तर स्मिताच्या जास्त हक्काची. कारण माझी ती ट्रेन नेहमीचीच आणि तिच्या रोजच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक हुकमी जागा ! बिचारीचे ऐकून घेऊन तिला बरे वाटत असे. काही जणी तर तिला चक्क टाळत असत.
तिने कधीही मला विचारले नाही, की तुझा मूड कसा आहे ? तुला काही आज बोलायचे आहे का ? रोज इतके ऐकून घेतेस, तुला कधी मन मोकळं करावं असं वाटत नाही का ?
‘मोलकरीण सलग चार दिवस आली नाही,’ ‘ऑफिसमध्ये राजकारण चालू आहे’ ‘मुलाची परीक्षा आहे तर नवरा सुट्टी काढत नाही – मीच रजा घेते नेहमी’, अशा आमच्याही सगळ्यांच्या काही ना काही तक्रारी असायच्या. पण ह्या समस्या तिच्याशी आम्हाला बोलायला नो चान्स ! वाटायचे हिच्या बिचारीच्या वाट्याला इतक्या अडचणी. आपले काय, मामुली प्रश्न ! तिच्या तुलनेत साधी कुरकुर !
माझ्या डिपार्टमेंटचे टायमिंग बदलले आणि ती ट्रेन आता मिळेना. असे बरेच महिने गेले. एकदा मला घरी लवकर जायचे होते. मी कन्सेशन घेऊन मुद्दाम त्या ट्रेनला आले. तर त्या दिवशी, स्मिता सपशेल माझ्या समोरून दुसऱ्या कंपार्टमेंटच्या हिशोबाने पुढे गेली.
“स्मिता, स्मिता !” जोरात हाक मारली मी. पण तिने ढुंकून बघितले नाही. तेवढ्यात ट्रेन आली आणि धबाधब उड्या मारत सीट पकडल्या.
बाकीच्या खूपजणी भेटल्या मला. मोठा ग्रुप असायचा आमचा.
“स्मिताचे लक्षच नाही गं, ती तिकडे का बसते हल्ली ?”
“अगं तिच्या सासूबाई गेल्या मध्यंतरी !“
“म्हणून काय जागा बदलायची ? ग्रुप बदलायचा ? मी आज संधी मिळाली तर आले मुद्दाम सगळ्यांना भेटायला.”
“अगं, सासूबाई गेल्या ना, चहाडया कोणाच्या करणार ?”
“नवरा आता तिच्या ताटाखालचे मांजर झालाय !”
“मातृभक्त नवरा, आता बायकोभक्त झालाय. त्याला भक्त होता येतं फक्त !”
“तिला आता डस्टबीनची गरज नाही.”
“आता ती दमते ! सासू स्वयंपाक करत असे. ते नसे सांगत ! फक्त केर टाकायला डबा हवा असायचा तिला.“
“तिच्या मनात जमा झालेला, तिने फेकून द्यावा असा कचरा अॅक्सेप्ट करायला आपण होतो ! केराची टोपली ! गरज सरो, डस्टबीन मरो.”
“आता आपला आवाज सुद्धा नको तिला. जागा पकडून मस्त झोप घेते ती.” एकेक जणी सरसावून बोलू लागल्या.
“मी तर भला मोठा केराचा डबा होते ! रेल्वे स्टेशनवर असतो ना, कचरा काढायचा भला मोठा ड्रम ! तसा डस्ट बीन होते मी !”
सगळ्याच खळखळून इतक्या हसलो ! कदाचित स्मिताला पण तिकडे जाग आली असेल !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
