रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने स्टोअर ऑपरेशन ट्रेनिंग (फार्मा स्टोअर्स) तसेच रिटेल स्टोअर ऑपरेशन व मॉल मॅनेजमेंट या रोजगाराभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या दालनात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
ही बैठक रुग्ण मित्र विनोद साडविलकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान यशवंत मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश मुळे यांनी स्टोअर ऑपरेशन ट्रेनिंग (फार्मा स्टोअर्स) आणि रिटेल स्टोअर्स/मॉल मॅनेजमेंट या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा सविस्तर प्रस्ताव सादर केला. या अभ्यासक्रमांमध्ये स्टोअर सेटअप व लेआउट, उत्पादनांची माहिती, इन्व्हेंटरी व स्टॉक व्यवस्थापन, बिलिंग व POS ऑपरेशन, ग्राहक सेवा, कायदेशीर व नियामक अनुपालन, सुरक्षा, डिजिटल ऑपरेशन्स तसेच रोजगारासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सरकारी प्रमाणपत्रासह रोजगार संधी व जॉब प्लेसमेंटसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित विविध विभागांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

या बैठकीस शशी बाला (प्रमुख व्यवसाय विकास), सतीश रेवतकर, भास्कर जाधव (प्रमुख समाज विकास अधिकारी), विवेक मेंडोन्सा, लॉरेन्स अँड मायोचे मार्केटिंग संचालक, प्रवीण व्यास (खजिनदार, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन), शुभांगी महाडीक (समन्वयक, कोकणी बाजारपेठ) यांच्यासह रुग्ण मित्र धनंजय पवार, श्रद्धा अष्टीवकर, रमेश चव्हाण, विजय कांबळे, चंदन विचारे, उमेश झगडे, श्रेया घाडगे, शशिकांत मोरे आदी उपस्थित होते.
“कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींना सक्षम करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे,” असा सकारात्मक सूर बैठकीत उमटला.
बैठकीचे आयोजन केल्याबद्दल विनोद साडविलकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
रुग्ण मित्रांचा हा पुढाकार रोजगारनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
