Homeसेवा"कोवळं ऊन" : स्मिताताई लिहितात…

“कोवळं ऊन” : स्मिताताई लिहितात…

जग किती जवळ येत चाललंय, याचे छान उदाहरण नुकतेच घडले.  सिंगापूर येथील लेखिका नीला बर्वे यांचा “कोवळं ऊन” हा कथा संग्रह  न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केला आहे. हा कथा संग्रह त्यांनी नुकत्याच सिंगापूर येथे गेलेल्या स्मिताताई ढमामे यांना भेट म्हणुन दिला. पुस्तकावर  असलेले प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांचे नाव आणि  पत्ता वाचून
स्मिताताईना अतोनात आनंद झाला, कारण त्याही नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी आहेत ! असा हा  योगायोग… तर वाचू या, स्मिताताईना “कोवळं ऊन” ने दिलेला आनंद, त्यांच्याच शब्दात !
— संपादक

नमस्कार नीलाताई 🙏
तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने मला तुमचं कोवळं ऊन  हे स्वलिखित पुस्तक दिलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानते. ज्या क्षणी तुम्ही मला पुस्तक दिलं त्याक्षणी मला खूप आनंद झाला. तो क्षण कॅमेरात टिपला आहे, तो फोटो मी तुम्हाला पाठवतच आहे.

लेखिकेने स्वतःहून मला पुस्तक देणं ही भावनाच मुळात माझ्यासाठी खूप छान होती. लगेच पुस्तक वाचायला घेतलं आणि आज पुस्तक वाचून संपलं सुद्धा…

कोवळं ऊन ही पहिलीच कथा वाचून होता होता माझे डोळे पाणवले. मग पुढच्या कथा वाचण्यासाठी मन अजून उत्सुक  झाले… प्रत्येक कथेतून काही ना काही शिकायला मिळालं. या कथेतील कितीतरी पात्र अशी आहेत की त्यांच्याकडून नात्यातील समंजसपणा दिसून आला. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी आपण कसा सुसंवाद ठेवू शकतो हे या पुस्तकातून शिकायला मिळालं. कथांमधला फ्लॅशबॅक पण सुंदर मांडला आहे.दरवेळी अबोला म्हणजे हट्टीपणा असतो असे नाही हे आभाच्या वडिलांकडे म्हणजेच विद्याधर कडे पाहून वाटलं. 

नाते या सत्य घटनेवर आधारित गोष्टीमध्ये अरुंधतीच्या निर्णयाने काळजाचा ठोका चुकवला आणि तिचा अभिमानही वाटला.

चुकलं कोकरू मध्ये आपलं कोकरू चुकीच्या वळणावर गेलेलं पाहून सुद्धा वडिलांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, ते खरंच शिकण्यासारख आहे.

प्रत्येक कथेमध्ये तुम्ही आम्हाला गुंतवून ठेवलंय. बऱ्याच कथा कधी संपल्या ते कळलंच नाही तर काही कथांमध्ये खूप उत्सुकता ताणली जात होती. आव्हान मधील गाडीचा, ट्रेनचा स्पीड सुद्धा कसा वाढतोय ते पाहून छातीत धडधड होत होतं. आणि असा साहसी, धाडसी मुलगा पुढे IIT Kanpur मध्ये जातो खरंच ग्रेटच आणि त्याची मैत्रीण राधा सुद्धा मला आवडली.

बाकी अस्मिता, अंतरीचे बंध, स्वप्न सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत. पक्षाचे वर्णन आणि त्याच्याभोवती खेळणारी मुले सगळं किती छान व्यक्त केले आहे तुम्ही. कोरोना काळ सुद्धा अगदी योग्य प्रकारे मांडला आहे.

एकंदरीतच तुमची लिहिण्याची शैली उत्कृष्ट आहे, संवादात्मक आहे. वाचकाला कथेभोवती खिळवून ठेवणारी आहे आणि विचार करायला लावणारी सुद्धा आहे आणि मी जे पुस्तक वाचत आहे त्या लेखिकेला मी ओळखते हा आनंद तर माझ्यासाठी असिमीत आहे.

या पुस्तकाला दिग्गज व्यक्तिमत्व पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित आशा बगे यांचे अभिप्राय मिळाले यामुळे या पुस्तकाचे मोल अजून वाढले.

आणखी एक विशेष म्हणजे, सांगायला खूपच  आनंद होतो आहे की या पुस्तकाच्या प्रकाशिका सौ अलका देवेंद्र भुजबळ यांचा नवी मुंबईचा जो पत्ता आहे मी तिथेच राहते. मिलेनियम टॉवर्स या सोसायटीच्या शेजारची सोसायटी भूमी पॅराडाईज मध्ये मी राहते. आमचा सानपाडा सेक्टर 11 येतो. मी राहते त्या सानपाड्यातीलच प्रकाशिका हा योगायोग पाहून अत्यंत आनंद झाला.😊

नीलाताई, असेच लिहित रहा. तुमच्या पुढील लिखाणाला माझ्याकडून व शिवशंकरजींकडून मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏
आपली
स्मिता ढमामे.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments