Homeलेखसंगती रंग : २५

संगती रंग : २५

मिसेस थापा !

मागच्या आठवड्यात ट्रेनमधले लिहिले आणि एक वल्ली आठवली. ’ डोंबिवली टू सी. एस. टी.‘ प्रवास करताना इतके नमुने भेटतात की जगाची सैर केल्याचे पुण्य मिळावे !

ठरलेली ट्रेन असली की ग्रुप तयार होतोच. त्यात अलिखित संकेत ,नियम असतात. म्हणजे असं बघा, सकाळचे घरचे आवरून आम्ही सेमी फास्ट ट्रेनने सी. एस. टी.कडे कूच करत आहोत. आधीच्या स्टेशनला चढून काहीजणी बसलेल्या आहेत. कल्याणपर्यन्त सीट मिळते. मग प्रवासी चढतात त्यांना बसायला मिळत नाही ! बसलेल्यातली एखादी ठाण्याला उतरेल. घाटकोपर किंवा दादरला उतरेल. ठाण्याच्या आधी डोंबिवली येतं. डोंबिवलीला चढेल तिला सीट हवी. जी लवकर चढेल तिला ठाणे, दुसरा नंबर दादर !
हा खो खो खेळताना, ट्रेनच्या दरवाजाशी उड्या अत्यावश्यक ! असे खेळताना रोज तेच भिडू असले की ग्रुप तयार होतो. सकाळी क्वचितच झोप घेणारी असते. एरवी नुसता गलका ! दाट गर्दी ! त्यात गाणी, खादाडी, चेष्टा, मस्करी, गप्पा !
कित्येकदा नावे माहित नसतात, आडनावे तर दूरच. एकीचे नाव ठाणा सीट, तर एकीचे चक्क इडली होते ! कारण ती एकटीच साऊथ इंडियन. बऱ्याचदा खाऊ आणायची आम्हाला इडली आणि लालकेशरी रंगाची ती अप्रतिम चटणी. तिला सगळ्या बोलावून बसायला देत ! ग्रुपमधल्या एकीने सांगितले मला राजू हेच नाव माझे वाटते,राजू म्हणा ! एक बाई सतत विणण्याचा ध्यास घेतलेल्या होत्या. हातात सतत लोकर आणि सुया ! तशा मोठ्या होत्या वयाने. त्यांना सुईबाई म्हणायचो आम्ही. बाकी नावाने किंवा टोपणनावाने आणि ए – जा करून.
आमच्यात होती एक मिसेस थापा ! हे टोपणनाव तिच्या समोर वापरले जात नसे,बरं का. तिला थापा नाव कसे पडले त्याचीच कहाणी सांगते आहे !

टिटवाळ्याहून यायची ट्रेन आणि मिसेस थापादेखील. ट्रेन टिटवाळ्याला आठ वाजताची होती. मिसेस थापाला बसायला सीट मिळायचीच. मिसेस थापा जाम आळशी आणि झोपाळू होती. जागी असेल तर,मजेशीर गप्पा मारायची ! खूप वेळा ती जी झोपायची ती दादरला उठून उभी राहायची. पाय मोकळे करायला उभी रहात असे ती. सीट नाही मिळाली तर मिसेस थापा उठेल ही आशा असायची आम्हाला. सुईबाई म्हणायच्या ती नुसते डोळे मिटते.

“उशीर झाला गं पिंकीचा प्रोजेक्ट करत बसलो काल रात्रभर..” कोणीतरी उशीर का झाला ते सांगायचे.
“मी तर आज साडेसात वाजून गेले तरी अंथरुणातच !” मिसेस थापा.
“अय्या मग ?”
“मग काय घाईघाईने पोळ्या केल्या मिस्टरांनी भाजी चिरली ! गाडी हॉर्न देतेय. मिस्टरांनी गार्डला हात केला .. टिटवाळ्याला स्टेशनसमोर राहतो आम्ही !”
साडेसात वाजता उठून आठ वाजताची ट्रेन, पोळी भाजी करून स्वतःचं आवरुन ही बाई गाडी पकडते ! माझ्या कानात सुईबाई म्हणाल्या, “ उघडून बघा गं हिचा डबा !”

“काल अक्कलदाढ काढून आले, वाकडी तिकडी मुळं होती म्हणे ! अजून दुखतंय. पण आले बाई. रजा नव्हती मिळत !”
मी एकदा कुरकुरले.
मिसेस थापा सरसावली. “माझ्या तर एका वेळी दोन दोन अक्कलदाढा काढल्या होत्या. त्याच रात्री पाहुणे आले ! पुरणाच्या पोळीचा स्वैपाक रांधला !“
माझ्या कानात सुईबाई म्हणाल्या, ”तोंडाचा आ कर म्हणावे ! किती आहेत बघ अक्कलदाढा !”
आम्ही कोणी काहीही सांगितले, म्हणजे गंमत असो, प्रॉब्लेम असो, फुशारकी असो वरचढच असायची मिसेस थापा !

मला अशा ‘वरकडी’ किस्से सांगत थापा मारणे, पत्त्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅलेंजची आठवण करून देते. आम्ही लहान असताना हा चॅलेंज नावाचा खेळ खेळायचो. खेळलाय कुणी ? राजरोस खोटं बोलण्याचा हा खेळ ! समजा मी दोन एक्के लावले, दुसऱ्याने खोटे ठरवले तर चॅलेंज म्हणायचे ! खरे निघाले तर चॅलेंज म्हणणाऱ्याने ते उचलायचे. पण सहसा भिडू अजून दोन एक्के लावतो ! आणि करता करता दहा बारा पानं उपडी पडतात. और एक , और एक करत एक्के पडत जातात. चारच एक्के असताना ढीगभर एक्के !

मिसेस थापा असे एकावर एक थापत राहायची. आम्ही काहीही सांगितले तर ते तिने बघितलेले असायचे ! शिवाय नुसते बघितलेले नसायचे किंवा नुसती जाऊन आलेली नसायची तर त्यात काहीतरी विशेष असायचे की जे आम्ही कोणी केलेले नाही किंवा करु शकणार नाही ! ती लोणकढी थापा मारते हे कळत असे. पण आम्ही तिची कधी लिंक तोंडली नाही. तिच्या बोलण्यात व्यत्ययही आणला नाही. ‘ चॅलेंज’ देऊन तिला उघडे पाडले नाही !

तिला थापाबाजी करण्यात आनंद मिळत असे, आम्हालाही त्यातून चक्क मजा येत असे. लग्नाचा वाढदिवस साजरा करायला राजू कर्नाटकात दांडेलीला जाऊन आली. तिथं जंगल आहे. अभयारण्य व व्याघ्रप्रकल्प आहे.. जंगलात जे फार्म हाऊस घेतलेलं तिथे मोबाईलला रेंज नव्हती. जवळ पास एखाद घर नव्हतं, त्यामुळे अगदी निसर्ग सानिध्यात राहायचा खराखुरा आनंद मिळाला. राजू हे सांगत होती.
त्यावर मिसेस थापा सांगू लागली, “हे तर काहीच नाही आम्ही पण दांडेलीला गेलेलो आठ वर्षापुर्वी, त्यावेळेस जंगल जास्त दाट होतं. जसं बेळगावपासून थोडं पुढे आलो तसा जंगलातूनच रस्ता चालू झाला. संध्याकाळ झाली, वाघाच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या. ड्रायव्हर घाबरला, म्हणाला मी नाही पुढे नेऊ शकत ही बस ! मग काय मिस्टरांनी स्वतः ती बस चालवली. (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस,बरं का !)
दांडेलीत उतरलो तर रात्र झालेली. गाव बंद झालेलं. बारीक मिणमिणता लाईट दिसला म्हणून एका लहान घरात गेलो आणि त्यांना सांगितलं आम्ही सकाळपर्यंत बाहेरच्या पडवीत राहतो आता रात्री चालत जंगलात जाऊ शकत नाही. त्या माणसान तिथं राहायला परवानगी दिली. मध्यरात्री गुरगुर ऐकु आली आणि जागे झालो. तर काय ? समोर वाघ बसलेला ! आम्ही त्याच्या डोक्यावरुन, मानेवरून हात फिरवायला चालू केलं , वाघाला सकाळपर्यंत त्याचं मांजर करुन टाकलं ! त्या घराचा मालक चाट पडला. त्याला काय चाललंय ते समजतच नव्हतं ..
बोला आता !
असं पडलं तिचं नाव मिसेस थापा !
साहजिक आहे ना ?
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध