Homeकलाअमेरिका : बी एम एम संमेलन - ३

अमेरिका : बी एम एम संमेलन – ३

साधारण २०१५ साली श्री.अविनाश साधू, प्रेरणा कुलकर्णी आणि त्यांचे LA चे सहकारी ,ह्यांनी अमेरिकेतील महाराष्ट्रीयन आर्टिस्ट असा ग्रूप केला आणि नंतर BMM बरोबर MANA (महाराष्ट्रियन आर्टिस्ट नॅार्थ अमेरिका) हा ग्रूप २०२५ मध्ये वॅाट्सॲपवर तयार केला. मराठी चित्रकारांना प्रोत्साहन, चित्रांचे फोटो टाकून त्यावर, चर्चा, सल्ले, तज्ञांचे मार्गदर्शन, त्यांची प्रात्यक्षिके, अशा गोष्टी ह्या ग्रूपवर चालतात.

ह्या वर्षी प्रथमच MANA आणि BMM तर्फे अमेरिकेतल्या मराठी मंडळांतल्या चित्रकार मंडळींसाठी एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे नांवही आकर्षक होते, “रंग महाराष्ट्राचे” त्या साठी ३ विषय दिले होते. … महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील व्यक्ती आणि त्यातील सौंदर्य स्थळे.

चित्र काढण्यासाठी खूप पर्याय होते. आपल्या आवडत्या माध्यमात चित्र काढून ३ चित्र पाठवता येणार होती. त्या चित्राचे आधी फोटो काढून मागवले गेले. त्यातून निवडलेल्या चित्रांचे नंतर चित्र मागवून BMM संमेलनात प्रदर्शन भरविण्यात आले. संमेलनात नंतर त्या स्पर्धेचा निकाल सांगण्यात आला. या स्पर्धेसाठी परीक्षक होते माननीय, प्रसिघ्द चित्रकार प्रमोद कुर्लेकर आणि सुचित्रा भोसले.

प्रमोद साताऱ्याचे आहेत आणि सुचित्रा बंगलोरला आधी होत्या आणि आता शिकागोला स्थायिक आहेत. या दोन्ही मराठी चित्रकारांनी भारतात आणि परदेशातही अनेक बक्षिसं, मान मिळवला आहे आणि त्यांचे नांव परदेशी चित्रकारांच्या वर्तुळात गाजते आहे. त्यांची चित्र सोशल मिडियावर पहायला मिळतील.

BMM मध्ये अमेरिकेतील ६० मराठी मंडळे आहेत. त्यातील एकूण ४० चित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. काहींनी १ तर काहींनी ३/३ चित्रं पाठवली होती. एकूण ७० चित्रं होती.
या स्पर्धेची सर्व जबाबदारी विनीता मोहिते ह्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पाडली . सर्व नियमाप्रमाणे सांगणे, शंका निरसन करणे, आलेली चित्रे आपल्या घरात ठेऊन नंतर, काळजीपूर्वक संमेलनाच्या ठिकाणी घेऊन जाणे, व्यवस्थित स्टॅंडवर मांडणे, त्यांची माहिती लिहीणे, संमेलनानंतर सर्व राहिलेली चित्रं पॅक करून परत पाठविणे, परीक्षकांचे स्वागत करून त्यांना पूर्ण वेळ देणे ही सगळी कामे, स्थानिक स्वयंसेवकांच्या आणि मिस्टरांच्या, मदतीने वनिता मोहिते ह्यांनी पार पाडली. त्या सर्वांचे विशेष कौतुक.

कला प्रदर्शनाचे उद्घाटन

प्रदर्शनाचे उद्घाटन ७ तारखेला, दोन्ही चित्रकारांच्या हस्ते, फित कापून झाले.चित्र प्रदर्शनाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला, अनेकांनी चित्र विकतही घेतली. शेवटच्या दिवशी बक्षिसं जाहिर करण्यात आली. ती सर्व नांवे BMM च्या वेबसाईटवर पहायला मिळतील.

एक आणखी नवीन गोष्ट झाली या BMM च्या कार्यक्रमात जे नामवंत परीक्षक आले होते त्यांच्याबरोबर २ कार्यक्रम होते. एक दिवस त्यांची मुलाखत, त्यांचा चित्रकलेचा प्रवास असा कार्यक्रम होता. अतिशय मोकळेपणी, हातचे राखून न ठेवता, दोन्ही चित्रकारांनी आपली अनेक चित्रं दाखवली, त्या मागचा विचार, ह्या प्रवासात आलेले चढउतार , आनंदाचे, संघर्षाचे क्षण त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी चित्र काढून दाखविले. त्यांना प्रत्यक्ष ॲाईल पेंटनी व्यक्तिचित्र काढतांना पहाणे आणि त्याबरोबर सविस्तर माहिती ऐकणे, किस्से ऐकणे हा खूप विलक्षण अनुभव होता. अतिशय खूप वर्षांपासूनची ओळख असल्याप्रमाणे, आपुलकीने चित्रकार बोलत होते, त्यांना प्रश्न विचारून बोलते करण्याचे काम स्नेहल कुलकर्णी ह्यांनी खूप सुंदर केले. खूप शिकायला मिळाले ह्या दोन दिवसांत ! प्रमोद कुर्लेकरांनी काढलेले मोठे शिवाजी राजे ह्यांचे चित्र आणि त्यामागचे विचार, चित्रावरच्या प्रतिक्रिया हे सुध्दा खूप छान पध्दतीने त्यांनी सांगितले. सहज चित्र काढतांना दोघांच्या गप्पा चालू होत्या आणि दोन तासांचा कार्यक्रम ३.३० तास झाला, तरी अजून सर्वांना हवा होता. कमी वेळात इतके सुंदर चित्र काढून त्या दोघांनी रसिकांना खूष केले. त्यासाठी आयोजक आणि दोन्ही चित्रकार ह्यांचे खूप आभार!

एकावेळी अनेक कार्यक्रम असल्यामुळे आवड असलेले काही मोजके रसिक ह्या कार्यक्रमाला होते. पण हा कार्यक्रम समाधानकारक झाल्यामुळे दर संमेलनात असा चित्रकलेला वाहिलेला कार्यक्रम असावा असे वाटते.
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments