नमस्कार मंडळी.
वाढत्या कार्य बाहुल्यामुळे आपले आवडते “वाचक लिहितात…” हे सदर नियमितपणे प्रसिद्ध करता येत नाही, या बद्दल दिलगीर आहे. असो.
आता वाचू या गेल्या महिनाभरात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
देवेंद्र भुजबळ साहेब,
आपण “वाचक लिहितात” या सदरातून आमच्या प्रतिक्रिया किंवा अभिप्राय प्रसिद्ध करता यातून आम्हाला लेखनाची प्रेरणा मिळते.आपले जगाच्या पाठीवर कोणी तरी वाचते, आपल्या विषयी लिहिते…..हा आम्हाला जन्म देणारे खरेच आपण साहित्य भूमीतील आमचे जन्मदाते आहात !!!! साष्टांग दंडवत !!!!!🙏💐
— प्रा मनोहर यादव. सातारा
2
डॉ पांढरीपांडे यांचा लेख विचारप्रवण आहे.
राजीनामे का देत असतील ..खाजगी कंपन्या अधिक आकर्षक पगार देतात, त्यांच्या करिअर मध्ये ते प्रगती करू शकतात, संशोधनातील स्वातंत्र्य येथे मर्यादित वाटतं, सरकारी नोकरशाही,निर्णय घेण्यातील विलंब, अशी अनेक कारणे असतात.. हे डॉ नी व्यवस्थित मुद्देसूद मांडले आहे.
बाहेरच्या देशात ही कागदोपत्री चालणारी प्रक्रिया, कामाचा ताण आणि संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावून ही दुसऱ्याने लोणी खाणे असले प्रकार नगण्य असल्याने तरुण तिकडे आकर्षित होतात. हे मी अगदी जवळून बघितले आहे.
राजीनामा देऊ नका असे सांगून काहीच उपयोग नसतो असंतोष वाढीस लागतो, डॉ म्हणतात त्याप्रमाणे ..विशेष वेतन वगैरे सुरू करूनही फारसा फरक पडलेला दिसत नाही, त्यांच्या विद्यार्थ्याचे उदाहरण पायाखालची वाळू सरकण्यास पुरेसे आहे..ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.. नेहमीच अळणी जेवण, मुळमुळीत बोल गरजेचे नसून असे झणझणीत अंजन घालणं गरजेचेच आहे.. धन्यवाद.
— स्वाती वर्तक. मुंबई.
3
शिकागोत रंगलेल्या कविसंमेलनाचा वृतांत वाचनीय आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
4
गुरु पौर्णिमा निमित्तच्या अंकात गुरूचे महात्म्य, लेख, कविता वाचून छान वाटले.
डॉ प्रभाताईंचा लेख नामदेव, चांगदेव, गोरोबा संताच्या कथा गुंफत मुक्ताईचे रोखठोक बोलणे, वयाने लहान असून ही कर्तृत्वाने मोठी असलेल्या मुक्ताईचे माहात्म्य छान अधोरेखीत केले आहे. आवडला लेख
सिंगापूरच्या ऋचाताई संतांच्या दोहे, श्लोकातून नामस्मरणाची महती विषद करतात.. भाषा शैली छान आहे
डॉ पांढरीपांडे यांचा लेख सद्य भारतीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिशय आशादायी आहे .. त्यांना सतत चांगली माणसे भेटत राहतात असे नाही …आयुष्यात भले बुरे प्रसंग येतातच पण ते नेमके मौक्तिक वेचून आपल्यापुढे सादर करतात हे त्यांचे वैशिष्ट्य….त्यांना भेटलेली विद्यार्थिनी, त्या वर्षीच्या विद्यार्थ्यानी दिलेली घवघवीत देणगी आणि सरांचे नाव प्रयोगशाळेसाठी देण्याचा प्रेमळ आग्रह..
सारेच भारावून टाकणारे आहे… समाधानकारक आहे.. अभिनंदन
डॉ जी ..
स्वातीताई, मीनाताई, रश्मीताई… तिघींच्या कविता उत्तम आहेत.
— स्वाती वर्तक, मुंबई.
5
“आठवणीतील विद्यार्थिनी” लेख छान…
— विद्या साताळकरt
6
आजच्या खिडकी तील पावसाने मन चिंब भिजलं. . जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझ्याही लहानपणीच्या पावसात भिजलेल्या..👌🏻👍🏻
— स्नेहा मुसरिफ, पुणे.
7
सदानंद शेट्ये .. यांच्या जीवनाचा व्यवस्थित धांडोळा घेत विश्वासराव यांनी चांगला लेख लिहिला आहे. आमच्या तर्फे ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ..आजकाल असे पुढारी असे कार्यकर्ते मिळणे च दुर्मिळ होत चालले आहे.
डॉ पांढरीपांडे यांचा लेख खूपच तळमळीने लिहिलेला दिसतो .माझ्या मते आमची पिढी ही साने गुरुजी, प्रेमचंद, गांधी, विनोबा वाचून ऐकून अधिकच भावनाप्रधान झाली असल्याने असे होत असावे….CHANGE IS CONSTANT….. या धर्तीवर आम्हाला ही परिवर्तन शिकायलाच पाहिजे.
जे झाले ते गेले.. आहे खरेच ताण आणणारे की आमचे चुकलेच पण ….
किरण आचार्य यांचे… वो बारिश का पानी खूप रम्य आठवणी जागवणारे… बालपणीच्या पावसाची, बहिणीबरोबर अनुभवलेला पाऊस सारेच वेगळेव…शेवटची कविता जगजीत सिंह चे गाणे तंतोतंत आमचचे बालपण हळुवारपणे उलगडत जाणारे
डॉ दिलीप कुलकर्णी यांचा डॉ नीतिमत्ता जाणणारा , आपला व्यवसाय धर्म समजून घेणारा, आजच्या काळात अदृश्य झालेला डॉ फारच आदर्श आहे.. छान.
“सुभाषित विवेचन” – मित्र.. खूप छान, संग्रहणीय असे झाले आहे ….
— स्वाती वर्तक. मुंबई.
8
“शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध” हा विंग कमांडर शशिकांत ओक सरांचा लेख आपणा सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. सन २०४७ च्या भारत एक जागतिक महासत्ता या उद्दीष्ट प्राप्तिकरता आतापासूनच काय करता येईल या बाबीस विचारप्रवर्तक ठरतो.खरे तर पेराल तेच उगवते. खाण तशी माती…..या म्हणींप्रमाणे आपण गुरुकुल ते आताचे ऑन लाइन शिक्षण या शैक्षणिक प्रवासातून एकच लक्षात घेतले पाहिजे की, मन सुधारल्याशिवाय देश सुधारू शकत नाही.पूर्वी ब्रिटिशांचे अत्याचार राष्ट्रप्रेम जागृत करत होते.आता नागरिकांमधील भ्रष्टाचार राष्ट्रप्रेम जागृत करणार आहे. ब्रिटिशांचा अन्यायाचा कहर झाला आणि स्वातंत्र्य मिळाले.परिस्थिती सहन झाली नाही शिगेला गेली आणि जनता एकवटली. तसेच आता भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे.एक वेळ अशीच येईल की गल्लोगल्ली भ्रष्टाचारी लोकांची छी.. थू ….होईल !!! त्या करता समाजमन जागृत करणारे व वैयक्तिक मानसिकता बदलणारे, संस्कारधारित, राष्ट्रप्रेमी, नैतीक, कल्याणकारी, मानवता प्रेमी शिक्षणाची आवश्यकता आहे. कोणतेही संशोधन वरील कसोट्या लावूनच पुरस्कृत व्हायला हवे .अन्यथा ते फक्त संशोधन असावे,संवर्धक संशोधन नाही !!!!!🙏
— प्रा मनोहर यादव. सातारा
9.
सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राच्या विकासासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी ५० लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला, ही अत्यंत कौतुकास्पद आणि स्वागतार्ह बाब आहे. वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या विरंगुळ्यासाठी आधुनिक आणि सोयीसुविधांनी सज्ज जागा मिळणे, ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. या निधीमुळे बैठक व्यवस्था, मनोरंजनाची साधने आणि अंतर्गत पायाभूत सुविधांचा उत्तम विकास होईल, ज्यामुळे ज्येष्ठांना एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण लाभेल. परिसरात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या मागण्या समजून घेणे, हे लोकप्रतिनिधींचे जनतेशी असलेले घट्ट नाते दर्शवते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेले छत्र्यांचे वाटप हा एक अत्यंत उपयुक्त आणि संवेदनशील उपक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदाचा आणि आरोग्याचा विचार करणाऱ्या अशा विकासकामांमुळे समाजातील ज्येष्ठ घटकाला मोठा आधार मिळतो. या महत्त्वपूर्ण आणि जनहितार्थ प्रकल्पासाठी आमदार महोदयांचे आणि उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन! हे आधुनिक विरंगुळा केंद्र सानपाड्यातील आजोबा-आजींसाठी नक्कीच एक हक्काचे आणि आनंदाचे केंद्र ठरेल.
— गजानन लोखंडे. नवी मुंबई.
10
भारतीय संस्कृतीतील सुंदर गोष्टींशी आधुनिक शिक्षणाशी सांगड घालून भारत खऱ्या अर्थाने ‘विश्वाचा आश्वासक बनेल’ ही भूमिका ओक सरांच्या अभ्यासपूर्ण लेखातून पुरेपूर दिसून येते.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ..लंडन.
11
डॉक्टरची दुसरी बाजू सांगणारा वैद्य प्रशांत यांचा लेख उत्तम, सर्व बाबींचा व्यवस्थित अभ्यास करून लिहिला आहे ..यथार्थ आणि वास्तवदर्शी चित्रण आहे
गुजराथी यांचा .. ताटी उघडा…लेख आवडला
डी वाय पाटील यांचे कर्तृत्व अफाट होते ..आमची ही भावपूर्ण श्रद्धांजली
किशोर कुमार वरील कविता छान. मोजक्या शब्दात अष्टपैलू व्यक्तित्व सांगणे कठीण आहे ते मुसरीफ यांनी सहज पेलले आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई.
12.
“ताटी उघडा ज्ञानेश्वरा”
या लेखमालेला सृष्टी गुजराथीने सुरूवात केली. तसे तिने पहिला भाग प्रसिद्धसुध्दा केला आहे. माउलीच्या समग्र जीवनाची पुन्हा नव्याने उजळणी आपणा सर्वांना होणार आहे. कारण मुळातच कमी वयात तिला साहित्याची जाण असून तिची ३/४ साहित्यिक पुस्तके प्रसिद्ध, संहिता लेखन, बासुरी वादन, मार्गदर्शन व्याख्याने तसेच प्रसार माध्यमाना निगडीत असणारी ही हरहुन्नरी तरूणी द्वि पदवीधर असून उत्तम लेखिका आहेत.
आता ती ७०० वर्षापूर्वीची संतांची शिकवण पुन्हा समाजमनावर रुजवू पाहते. कारण संतांची शिकवण उध्दारक असते. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या चारही पोरांना समाजकंटकांनी छळले. ज्ञानदेवासारख्या बालयोगी या प्रकाराने उद्विग्न झाला. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई या चार भावंडांचे चरित्र “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या लेख मालिकेतून विषद करून त्या भावंडातील संवाद व त्यातून समाजमन परिवर्तनाचे धडे देऊन एक अगम्य सत्य आपल्या भाषेत देऊ पाहते. सृष्टीचा यावर सखोल अभ्यास असल्याने ती भाष्य करू पाहते आहे. तिला या स्तुत्य व महत्वपूर्ण संतमहिमेसाठी आपणा सर्व रसिकजन व माझ्यातर्फे खूप – खूप शुभेच्छा…!! 🌹
— प्रकाश पोळ. ठाणे
13
नमस्कार सर,
आपला ‘हिरोशिमा: ‘ते’ आणि ‘हे’ हा लेख छान. संपूर्ण विनाशातून अद्ययावत उत्कर्षापर्यंत तेथील लोकांनी प्रामाणिकपणे अथक परिश्रमांद्वारे घेतलेली भरारी नक्कीच फिनिक्स पक्ष्याची आठवण करून देते. प्रत्येकाने नक्कीच अनुसरावे असे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा लेख.
जयश्रीताईंचा ‘गीता उपदेश’ हा लेख आवडला. उद्धरेदात्मनाऽत्मानम् या गीतेतील वचनाद्वारे खरोखरच माणसाने कार्यान्वित राहून स्वतःचा उद्धार कसा करावा हे जयश्रीताईंनी खूप छान उदाहरणे देऊन सांगितले आहे.
वसुंधराताईंचा ‘मिसेस थापा’ हा लेख म्हणजे मैत्रिणींच्या प्रत्येक गृपमध्ये एकतरी असे व्यक्तिमत्व असतेच हे दाखविणारा आविष्कारच आहे. आमच्याही गटात अशीच एक ‘थापा’ आहे. असे एकही क्षेत्र नाही की, ती त्यात ‘मास्टर’ नाही. छान लेख.
श्री.किरण आचार्य यांचाही ‘आखरी कश’ हा लेख खूप सुंदर !
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
14
अगदी खरे आहे. घरातील ध्वनिप्रदूषण..
परवाच माझे दीर जाऊ आले होते. ते म्हणाले, वहिनी तुमच्याकडे किती शांत आहे. आम्ही soundproof, काचा बसवल्यावर अगदी 100 % नाही तरी खुप फरक पडतो.
डोक शांत रहाते !
— प्रियंवदा गंभीर. पुणे
15
जो आवाज दुर्लक्षित होता तोच कानात घुमत होता, त्या आवाजाकडे लक्ष देण्याची गरज उदाहरणासह छान संबोधित. 🙏
— एम पि देवळे. नवी मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800
