हे असेही हृदय आईचे !
वनिताचा मंजिरीला अचानकच फोन आला, “मंजिरी, लगेच येतेस ? अर्जंट अगदी ? सांगते काय ते तू आल्यावर.” “येते की.”
मंजिरीला शक्य होतं. शेजारी चावी ठेवली, पाचव्या मिनिटाला मंजिरी घराबाहेर पडली. वनिता मंजिरीची मैत्रीण. दोघींची मुलं एकाच शाळेत होती , एकाच ट्यूशन मध्ये. आता कॉलेजमध्ये जातात.
वनिता आता जवळच्याच भागात राहायला आली आहे. अगदी दोन बिल्डिंग सोडून, ती आता राहते. एका फ्लॅटमध्ये वनिता, सुभाष आणि त्यांची मुलं आणि शेजाच्या फ्लॅटमध्ये तिच्या सासूबाई ! असे अॅडजेसन्ट फ्लॅट ती शोधत होती. इथे असे शेजारी लागून असलेले फ्लॅट मिळाले. त्यामुळे वनिता इथं राहायला आली.
तिची आणि मंजिरीची आता मैत्री अधिक जुळली आहे.
मंजिरी अगदी धावत म्हणावी अशी गेली. घाईत असूनही शेजारी किल्ली ठेवायला विसरली नाही. धाकटा आला असता, प्रॅक्टिकल संपवून. मोठा लायब्ररीत गेलाय. काय अर्जंट आणि किती वेळ लागेल कोण जाणे. वनिताचा आवाज घाबरलेला होता.
“सुभाषजवळ बस जरा. सासूबाई चार वाजेपर्यंत असतील , तुझ्या सोबतीला. साखर-पाणी इथे ठेवलं आहे. मी येतेच ॲम्ब्युलन्स घेऊन ! बोलते नंतर.”
वनिता घाईघाईत निघाली. पाऊण तासात ती ॲम्ब्युलन्स घेऊन आलीच. सुभाषला घेऊन ती निघणार तेवढ्यात, “मी येतेय” असे मंजिरीने आग्रहाने दटावले. सासूबाई कुठेशा जाणार होत्या, त्या आवरायला त्यांच्या घरात गेल्या.
झालं होतं असं, जेवल्यावर काही वेळातच सुभाषला एकदम उलट्याच होऊ लागल्या. जेवताना पाणी ढसाढसा प्यायले गेले असेल. लवंग घे, दालचिनी चघळ असे उपाय झाले, पण थांबत नाही म्हटल्यावर तिनं डॉक्टर देसाईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांपर्यंत फोन पोचत नव्हता. सुभाषची एनर्जी लेव्हल झपाट्याने ढासळत होती. तिनं घराजवळ असलेल्या पॉलिक्लिनिकमध्ये फोन लावला.
“आज इथं सरांचा वार नाही.” रिसेप्शनिस्ट म्हणाली.
“मग ते कुठं असतील ? संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये असतील की दादोजी चौकातल्या ?“
“सांगू शकत नाही. सर्जरी चालू असेल तर ते फोन घेणार नाहीत. आज ओपीडीचा वार नाही त्यामुळे आमच्याकडे काही अपडेट्स नाहीत. माहीत नाही कुठे आहे सर्जरी.” रिसेप्शनिस्टने तिच्या रुक्ष आवाजात सांगितले.
दोन हॉस्पिटलं म्हणजे दोन टोकं ! वनिताने चटकन निर्णय घेतला, सरळ निघायचं. जिथे डॉक्टर असतील तिथून ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. त्याला कोलायटीसची लक्षणे आढळल्यापासून देसाई डॉक्टर कायम होते. त्यांना गाठायचंच .
वनिता पहिल्यांदा दादोजी चौकात गेली सुदैवाने तिथेच नेमके डॉक्टर सापडले. ॲम्ब्युलन्स घेऊन ती धडकली.
फूड पॉईझनिंग असे निदान झाले. दक्षता म्हणून दोन दिवस मात्र सुभाषला हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घ्यावा लागला, एव्हढंच काय ते. मोठं संकट टळलं.
“सुभाष अशा गंभीर आणि काळजीच्या परिस्थितीत असताना सासूबाईंना चार वाजता कुठे निघायचे होते गं ?”
मंजिरीला उत्सुकता होती.
“मी नाही विचारलं. असेल त्यांची भिशी किंवा कुठल्या तरी मंडळाचा मेळावा.”
“मुलाला असे टाकून ?”
“अगं पन्नाशीला पोचेल आता सुभाष. मुलगा म्हणून नव्हे, प्रौढ माणूस म्हणून बघ.”
“त्याच्याकडे प्रौढ म्हणून मी बघेन गं. आई मूल हे नातं सुभाष पंचाहत्तरीचा झाला तरी असेल ना ? असायला हवंच. आईचंच का, वडील किंवा भावंडं यांची पण नाती अशीच असतात ! रक्ताची नाती उगीच म्हणतो का आपण !”
“ह्या घरी अशीच पद्धत आहे, बाई. सुभाष हा एक प्रौढ आहे. आम्ही सासवासुना आता शेजारी आहोत फक्त ! सोयीचे पडावे म्हणून हा शेजार मागून घेतला.”

“शेजारधर्म म्हणूनसुद्धा काही असतो बरं का ..” मंजिरीने ठणकावले.
सुस्कारा सोडत वनिता सांगू लागली, “जाऊ दे. मलाही हे सुरुवातीला अॅबनॉर्मल वाटायचंच गं. आता सवय झालीय आणि मी हा अर्थ लावलाय. प्रेम करण्याचे संस्कार असतात की काय, मंजिरी ! देव जाणे ! माझ्या सासूबाई अशाच निष्प्रेम वाढल्या. त्यांना तसंच वळण आहे ! त्यांचं खेड्यात रहाणं. साध्या बेसिक गोष्टीत हाल. घराबाहेर न्हाणीघर, नीटसा आडोसा नसलेलं. बायकांनी सकाळच्या आत अंघोळी उरकायच्या. चांगला आडोसा करणं कठीण का होतं ? दोघी बहिणी वयात आल्यावर कुरकुर करायच्या. पण काही उपयोग नाही. तिन्ही भावंडं अशी सावत्र असल्यासारखी वाढली. शुष्कपणे. त्या सांगतात कधी आठवणी. सुभाष सांगतो एकेक आजोळच्या आठवणी. त्यांच्या अशा गप्पांमधून तर्कसंगती लावता आली. आजोळी जायचं ते रीतीप्रमाणे हो ! कधी अधिक महिना म्हणून. किंवा श्रावणात शुक्रवारी ! सहवासाची ओढ नाही.”
असेल त्या परिस्थितीत , जमतील तसे लाड अनुभवलेल्या मंजिरीला हे विचित्रच वाटले. कुटुंब म्हणजे काळजी, कौतुक, लाड, क्वचित धाक, बोलणी खाणे. कधी वादावादीसुद्धा ! सगळे प्रेमाचेच की हे आविष्कार. ह्यात तुटकपणा कोठेच नसतो !
“सुभाष सांगतो, आजोळी गेला होता एकदा तेव्हाची गोष्ट बरं का. त्याचा मामा सायकलला लावायला डायनोमा मागत होता. डायनोमा म्हणजे बॅटरी असते, सायकलच्या चाकाला लावलेली. चाक फिरतं तसा सायकलला पुढे असणारा दिवा पेटतो. ह्याचं आजोळ म्हणजे अगदी खेडं. गावात कॉलेज नाही. रेल्वे प्रवास करून कॉलेज गाठायचे. रेल्वे स्टेशनपासून दूर अडीच तीन मैल आत गाव. जंगल, झाडी वाटेत. स्टेशनपासून गावात पुष्कळजणं चालत किंवा सायकलनं यायची. म्हातारीकोतारी टांगा मिळेल म्हणून वाट बघायची. रस्त्यावर धड उजेड नाही. कॉलेज, क्लास करून येईपर्यंत सात वाजून जायचे. पावसात तर एका हातात छत्री धरून किंवा मानेच्या फटीत छत्री पकडून सायकल हाणत यायचं ! डायनोमा असेल तर,निदान रस्ता नीट दिसेल. ह्या वर्षी डायनोमाचे बजेट नाही आजोबा स्पष्ट म्हणाले ! चार पाच वर्षांचा होता सुभाष. मामाचं भांडण ,उपाशी झोपणं त्याला लख्ख आठवतं. विचित्र वाटेल ऐकून.“
“परिस्थिती इतकी वाईट होती का ?“
“छे गं ,हलाखीची तर मुळीच नाही.”
“सख्खीच मुलं होती ना, ही ?”
“हो तर ! प्रश्न फक्त पैशाचा असेल तर पैसा मिळू लागला की तो सुटतो. विचित्रपणा हा प्रॉब्लेम कायमसाठी असतो. लवकर सुटत नाही तो. सुभाष आता माणसाळलाय खूप. मुलांना प्रेम कळावं म्हणून खास मी आणि माझी बहीण एकत्र ट्रीपा करतो. जाणून बुजून शिबिरात पाठवावं तसं, मी मुलांना भावाकडे पाठवते. बहिणीकडे पाठवते. तिथे एकत्र रहातात सगळी. कधी माझ्याकडे रहातात एकत्र.“ मंजिरी थक्क होऊन ऐकत होती.
“असं निष्प्रेम माणूस घरात ठेवणं अवघड आहे. स्वतःहूनच सासूबाई अशा स्वतंत्र राहताहेत ते बरंच आहे तुला, एका अर्थी.“ मंजिरी पुटपुटली.
म्हटली तर ही समस्या आहे आणि नाही सुद्धा ! गुंतून राहू नये, असा उपदेश आपण ऐकत असतो. पण हे कळल्यावर मला मात्र अस्वस्थ व्हायला झाले. तुम्हाला ?
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
