Homeकलाअमेरिका : बी एम एम संमेलन - ४

अमेरिका : बी एम एम संमेलन – ४

‘अवघा रंग एकचि झाला’

डॉ. मीना नेरूरकर यांनी ‘अवघा रंग एकचि झाला’ हे नाटक साधारणपणे २००७ च्या सुमारास लिहिले आणि त्याच वर्षी ते व्यावसायिक रंगभूमीवर आले. हे नाटक ‘नाट्यसंपदा’ या प्रसिद्ध संस्थेने अनंत पणशीकर यांच्या निर्मितीखाली २००७ मध्ये पहिल्यांदा रंगभूमीवर आणले.या नाटकाचे मूळ दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले होते. अवघ्या काही वर्षांत (२०१३ पर्यंत) या नाटकाचे ३०० पेक्षा जास्त प्रयोग झाले होते. ते नाटक शीतल डोळस ह्यांनी रंगभूमीवर आणण्याचे ठरविले.

शीतल डोळस.

नाटकाचा शोध, त्याचा सखोल अभ्यास आणि संपूर्ण प्रयोगाची आखणी यासाठी जवळपास ६ महिने लागले. त्यानंतर सलग ३ महिने कसून तालमी झाल्या.
२ नोव्हेंबर २०२५ रोजी “अवघा रंग एकचि झाला” या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला तब्बल ८०० रसिकांनी उपस्थिती लावली. त्यानंतर सॅन रॅमोन, लॉस एंजेलिस, सॅक्रामेंटो आणि सिएटल येथे नाटकाचे प्रयोग झाले. आजवर एकूण ३,५०० हून अधिक प्रेक्षकांनी या नाटकाचा अनुभव घेतला आहे. बे एरियामध्ये साकारले गेलेले पहिले भव्य मराठी संगीत नाटक आहे.

लेखिका – डॉ. मीना नेरुरकर
गीते – प्राध्यापक अशोक बागवे आणि डॉ. मीना नेरुरकर
संगीत – पंडित रघुनंदन पणशीकर
दिग्दर्शक – शीतल डोळस
कलाकार – योगिता भातखंडे, मिलिंद भांडारकर, अमोल परांजपे, मनोज ताम्हनकर, शलाका डोळस
वाद्य वृंद – अजिंक्य रानडे, ओजस गोगटे, आयुष तऱ्हाळकर
नेपथ्य – संजय पाचपांडे, प्रणिता साकळीकर, शीतल डोळस
प्रकाश योजना – चैतन्य गोडसे, अवधूत भांबारे
वेशभूषा – मीरा ताम्हनकर, शर्वरी डोळस
ध्वनी संयोजन – अक्षय भातखंडे, मिलिंद कुलकर्णी, भास्कर रानडे

परंपरा आणि आधुनिकतेची अप्रतिम सांगड घालणारे हे एक भव्य मराठी संगीत नाटक पहायला मिळाले.
भक्तिसंगीतापासून ते पाश्चिमात्य संगीत आणि फ्युजन पर्यंतचा अद्वितीय संगीतप्रवास यात आहे. रंगमंचावर गाणारे, कसलेले कलाकार – अभंग, कीर्तन, नाट्यसंगीत, Western आणि Fusion सर्वच प्रकार, अतिशय सुरेल आवाजात गाऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

या नाटकात तीन पिढ्यांचा, त्यांच्या विचारांतल्या फरकांचा, एक हृदयस्पर्शी प्रवास प्रेक्षकांना पटतो. नाटकातले संगीत जितके प्रभावी आहे तितकेच या नाटकातली प्रकाश योजना, नेपथ्य सुंदर आहे. शीतल डोळस ह्यांचे दिग्दर्शन वेळोवेळी जाणवते आणि प्रशंसा मिळवते. उदा. सोशल मिडियावर सोपान चा वावर, जनीचा शिकण्याचा प्रवास, त्यावेळचा तिचा क्षणातला कपडे, केस रचना बदलून सहजपणे केलेला रंगमंचावरचा वावर ह्या गोष्टी प्रेक्षकांना मनापासून आवडल्या. त्यांनी भरभरून दाद दिली.

अमोल परांजपे आणि शीतल डोळस ह्यांचे विशेष कौतुक झाले कारण या तरूण वयात त्यांची क्लासिकल, वेस्टर्न संगीताची जाण, अभ्यास, आवाजातला गोडवा, घेतलेली मेहनत प्रेक्षकांपर्यंत पदोपदी पोहोचत होती. अमेरिकेतली मराठी तरूण मुलगी, शीतल इतकी स्पष्ट मराठी बोलते, इतकेच नव्हे तर नाट्यगीतं, श्लोक, क्लासिकल गाण्यातील ताना इतक्या ताकदीने म्हणते, सहज स्टेजवर वावरते हे पाहून, ”अमेरिकेत मराठीला चांगले दिवस येत आहेत “ असे समाधान सर्व प्रेक्षकांना नक्कीच वाटले. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या पालकांचेही तितकेच धन्यवाद ! शलाकाला बी एम एम ची युथ स्कॅालरशीप मिळाल्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन !

कुटूंबातल्या सर्वांनी एकत्र बसून पाहण्यासारखे हे, सुंदर नाटक आहे तेव्हा सर्वांनी आवर्जून पहावे असंच मी म्हणेन .
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments