अडेलतट्टू वृत्ति बदलण्या
किती ‘तुताऱ्या’ फुंकुन झाल्या
‘गुलाम सवयी’च्या परंतु
दिशांतील सावल्या न हलल्या
दुःख खाली वाहुन वाहुन
हेल्यांची तर पाठ मोडली
कर्दमलेल्या भर रस्त्यावर
खुरे तयांची रुतून बसली
मोक्याच्या जागेवर टपली
अराजकाची पिल्ले उठती
माणुसकीच्या अंत्येष्टीला
‘मानभावि काव्या’ ने जमती
माणुस म्हणुनी पाउलण्याचा
बीजमंत्र गर्भात घोकला
नाळ सुटी होताना तो का
बेंबीमधुनी गळून पडला ?
प्रवाळबुद्धी असून त्याने
कृत्रिम बुद्धी विकसित केली
अहंधुंदिच्या स्थितीत त्याला
घातक ठरणारी विषवल्ली
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
