‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा मूळचा शाहीर साबळे यांनी सुरू केलेला आणि महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना एका मंचावर आणणारा एक अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम आहे. जेव्हा उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) किंवा स्थानिक मराठी मंडळांच्या संदर्भाने याचा विचार केला जातो, तेव्हा या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
महाराष्ट्राची लोकधारा
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास यांसारख्या संतांनी भक्ती, ज्ञान आणि समाजप्रबोधनाची ज्योत प्रज्वलित ठेवली. ग्रामीण जीवन, श्रमसंस्कृती, निसर्गाशी असलेले नाते आणि लोकजीवनातील विविध पैलू महाराष्ट्रातील लोककलांमधून जिवंतपणे व्यक्त होतात. बदलत्या काळातही महाराष्ट्रातील जनतेने या लोककला जपल्या असून त्या आजही आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहेत.या समृद्ध लोकवारशाचे दर्शन घडविण्यासाठी बालतरंग आणि किशोरकुंज या उपक्रमांतर्गत “महाराष्ट्राची लोकधारा” हा संगीतप्रधान सांस्कृतिक कार्यक्रमाचा या अधिवेशनात विशेष समावेश होता.
अवघ्या ५ ते १४ वर्षे वयाच्या या वयोगटातील २३ हून अधिक बाल व किशोर कलाकारांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. परदेशात वाढणाऱ्या या मुलांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांशी जोडणे, त्यांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आपल्या मातृसंस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात पायला नमन या मंगलाचरणाने झाली.त्यानंतर ओवी, वासुदेव, भारूड, पोवाडा, कोळीगीत, अभंग आणि शेवटी महाराष्ट्र गीत अशा लोककलांच्या विविध रूपांचा सुरेल आणि रंगतदार प्रवास सादर करण्यात आला. प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील भक्ती, शौर्य, कष्टसंस्कृती, विनोद, लोकपरंपरा आणि सामुदायिक जीवनाचे दर्शन घडले.
या सर्व बालकलाकारांनी अत्यंत मेहनत,समर्पण व आत्मविश्वासाने आपली कला सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वारसा जपत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कार्यक्रमाने साध्य केले.
“महाराष्ट्राची लोकधारा” हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता; तर महाराष्ट्राच्या लोकपरंपरा, भक्ती, शौर्य, लोकसंगीत आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा नव्या पिढीने नव्या पिढीसाठी साकारलेला एक जिवंत उत्सव होता. बालतरंग आणि किशोरकुंजच्या माध्यमातून या लहान कलाकारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झरा हजारो मैल दूर अमेरिकेतील भूमीवर अविरत वाहता ठेवला आणि आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेले नाते अधिक दृढ केले.
ह्या सर्व कार्यक्रमाचे श्रेय संकेत जोशी ह्यांना जाते. माझी नात ह्या गाण्यांच्या कार्यक्रमात होती. त्यामुळेच संकेत जोशी ह्यांनी ह्या २३ जणांची प्रॅक्टीस घेतांना, त्यांना स्पष्ट मराठी उच्चार सांगणे, गाण्यांचा अर्थ सांगणे, रेकॅार्ड करून प्रत्येकाचे गाणे सुधारणे वगैरे साठी घेतलेली मेहनत मी पाहिली आहे .ते स्वतः ही गायला इतर अनेक कार्यक्रमात होते . ते सर्व सांभाळून त्यांनी ह्या २३ मुलांकडून खूप छान गाणी गावून घेतली यासाठी त्यांचे विशेष कौतुक!
छोटे उस्ताद – बीएमएम स्वरमंच २०२६
स्वरमंच हे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) २०२६, सिएटलचे उत्तर अमेरिकेतील गुणी गायक-गायिकांसाठी समर्पित संगीत व्यासपीठ होते. संगीताची आवड, शिस्त, परिश्रम आणि कलात्मक अभिव्यक्ती यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेची निर्मिती करण्यात आली. ऑनलाइन प्राथमिक फेऱ्यांपासून ते मुख्य रंगमंचावरील अंतिम सादरीकरणापर्यंत स्पर्धकांना स्वतःचे कौशल्य सादर करण्याची सुवर्णसंधी या उपक्रमातून मिळाली.
या स्पर्धेसाठी उत्तर अमेरिकेतील विविध शहरांतून १०० हून अधिक ऑनलाइन प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. दोन कठोर ऑनलाइन निवड फेऱ्यांनंतर अंतिम फेरीसाठी केवळ तीन समूहगीतांची निवड करण्यात आली. त्यापैकी सिएटलचे संकेत जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील “छोटे उस्ताद” या समूहाने विशेष लक्ष वेधून घेतले.

या समूहामध्ये ईव्हा जोशी, ईशान जोशी, राजस देशपांडे, केयूर देशपांडे, झीवा मेहेंदळे, गार्गी देशपांडे, आर्या देशपांडे आणि अकिरा अंधारे या ७ ते १२ वयोगटातील बालकलाकारांचा समावेश होता. परदेशात वाढणाऱ्या या चिमुकल्या कलाकारांना मराठी संगीत परंपरेशी जोडण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता.
या अधिवेशनाच्या मुख्य रंगमंचावर या बालकलाकारांनी सुमारे दोन हजारांहून अधिक रसिक, मान्यवर पाहुणे आणि प्रतिष्ठित उपस्थितांसमोर आपले सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि हृषीकेश रानडे उपस्थित होते.
छोटे उस्ताद समूहाने गीतरामायणातील “स्वयंवर झाले सीतेचे” ही अत्यंत अवघड, अभिजात आणि सांगीतिक दृष्ट्या समृद्ध रचना सादर केली. सुधीर फडके (बाबूजी) यांनी संगीतबद्ध केलेली आणि कवी ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेली ही रचना मराठी संगीतविश्वातील अजरामर ठेवा मानली जाते. अशा दर्जेदार आणि आव्हानात्मक रचनेची निवड करून या बालकलाकारांनी स्वतःची तयारी आणि संगीतातील प्रगल्भता सिद्ध केली.

सादरीकरणादरम्यान मुलांनी सूर, लय, शब्दोच्चार आणि भावाभिनय यांचा अप्रतिम मेळ साधला. त्यांच्या गाण्यातील प्रामाणिकपणा आणि समर्पणामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. परीक्षकांनाही त्यांच्या सादरीकरणाने विशेष प्रभावित केले.
या प्रसंगी डॉ. सलील कुलकर्णी यांनी विशेष गौरवोद्गार काढताना नमूद केले की, “१९५६ साली रचलेली ही कलाकृती उत्तर अमेरिकेत वाढणाऱ्या आणि मराठी ही पहिली भाषा नसलेल्या मुलांनी इतक्या प्रामाणिकपणे आणि भावपूर्ण रीतीने सादर केली आहे, हे पाहून बाबूजींना निश्चितच मोठा आनंद झाला असता.” हे कौतुक या बालकलाकारांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत अभिमानास्पद होते.
या सादरीकरणाला भारतातील नामवंत वादक सत्यजित प्रभू, निलेश परब, ऋतेश अहोल आणि प्रसाद पड्ये यांची संगीतसाथ लाभली. अशा दर्जेदार कलाकारांसोबत मुख्य मंचावर सादरीकरण करण्याचा अनुभव या मुलांसाठी अविस्मरणीय ठरला. गाणे संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून, टाळ्यांच्या कडकडाटात गाण्याला पसंती दिली, इतकेच नव्हे वन्स मोअर ची मागणी केली आणि मुलांनीही मध्येच सुरवात करून खूप छान परत थोडे गाणे म्हटले.
अंतिम निकालात “छोटे उस्ताद” समूहाने प्रथम क्रमांक पटकावला आणि २०२६ च्या स्वरमंच स्पर्धेत मानाचा तुरा आपल्या नावावर केला. हे यश केवळ एका स्पर्धेतील विजय नव्हते, तर परदेशात वाढणारी नवी पिढी मराठी भाषा, संस्कृती आणि अभिजात संगीत वारसा किती आत्मीयतेने जपत आहे याचे प्रेरणादायी उदाहरण होते.
“छोटे उस्ताद” ही केवळ गायनस्पर्धेतील विजयी टीम नव्हती; तर गीतरामायणाच्या अमर परंपरेला नव्या पिढीने वाहिलेली संगीतपूर्ण आदरांजली होती. या चिमुकल्या कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून मराठी संस्कृतीचा वारसा हजारो मैल दूर अमेरिकेच्या भूमीवर अभिमानाने फुलवला.
या गाण्यासाठीही संकेत जोशी ह्यांनी खूप मेहनत घेऊन मुलांना तयार केले. ह्या सर्व मुलांना डॅा.सलील कुलकर्णी ह्यांच्या बरोबर, त्यांच्या मधली सुट्टी ह्या कार्यक्रमात, त्यांच्याबरोबर गायला मिळाले, शिवाय शेवटच्या दिवशी सर्वांबरोबर आरती गायला आणि पहिल्या दिवशीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात, “जय जय महाराष्ट्र“ हे गाणेही गायला मिळाले. ही छोटी मुलं आधी महिनाभर आणि संमेलनाच्या ४ दिवशीही कार्यक्रमाची प्रॅक्टिस मनापासून करत होती, त्याबद्दल ह्या सर्व मुलांचेही मनापासून कौतुक!
त्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन आणि संधी या कार्यक्रमामुळे मिळाली त्याबद्दलही बीएमएमचे आभार!
ही लेखमाला आपल्याला कशी वाटली, हे नक्की कळवा.
समाप्त.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
