Homeसाहित्यताटी उघडा ज्ञानेश्वरा : ७

ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ७

तावदानावरची धूळ

ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्॥

गीतेच्या १५ व्या अध्यायात केलेले संसाराचे हे वर्णन… एक उलटे झाड, ज्याची मुळे वर आहेत आणि फांद्या खाली! ही मुळे परमात्म्याचा— म्हणजेच चैतन्याचा स्रोत मानली जातात आणि त्या चैतन्याच्या प्रभावानेच आपला प्रपंच चालत असतो. शरीरशास्त्राच्या दृष्टीने सांगायचे तर, मेंदू म्हणजे ऊर्ध्व मूळ, पाठीचा कणा आणि मज्जारज्जू म्हणजे वृक्षाचे खोड, मज्जातंतू म्हणजे अधः अर्थात खाली पसरलेल्या फांद्या आणि इंद्रिये म्हणजे पालवी; असे एक चित्र मांडले जाते.

आता एक गंमत बघा, ही जी पालवी आहे ना, ती अगदी चंचल आहे, प्रतिक्रियावादी आहे. वारा, पाऊस या प्रत्येकाचा तिच्यावर प्रभाव दिसतो. शरीरातही स्पर्श, रूप, रस, गंध आणि शब्द यांचा सतत आपल्यावर प्रभाव पडत असतो; आपल्यापैकी कुणीच यातून सुटलेले नाही. निसर्गातही पानगळीचे चक्र सुरूच असते; पण हे झाले वरवरचे बदल! मुळे मात्र आतमध्ये ठामपणे रुतून असतात. ती हळूहळू स्वतःचा विस्तार करत, वरचा डोलारा सांभाळत असतात. आपल्या मनाला, आपल्या मेंदूलाही नेमके तेच काम असते.

दिस येतील, दिस जातील… पण आपली तत्त्वे, नीतिमूल्ये मात्र आपल्यासोबतच राहतील. आपल्याला जो काही विचार करायचा आहे, तो या मूल्यांबद्दल करायला हवा. बाहेरची परिस्थिती आपल्या हाती नाही, पण आपल्या आत काय असावे, हा आपला स्वतःचा विचार आहे. आणि त्याप्रती असलेला साक्षीभाव हेच संतत्व आहे! मुक्ताईच्या भाषेत सांगायचे तर—

संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी॥
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा॥

ज्याने दगड उचलला, त्यालाही झाड फळ देते, सावली देते; ज्याने कुऱ्हाड चालवली, त्यालाही लाकूड मिळते. त्यांच्या कर्माचा विचार झाड करत नाही; ते स्वतःच्या मूळ भावाने वाढत आणि विस्तारत राहते. अशीच क्षमाशीलता आपल्या मनात रुजवता आली तर? आणि हे देणे तरी किती निःसंग की परतफेडीची कुठलीच अपेक्षा नाही, लोभ नाही! आणि ‘मी करतोय’, ‘मी देतोय’ हा अहंभावही नाही. अशी विरक्ती ज्याला साधली, त्याला कोण दुखावणार? ज्या वृक्षाची मुळे इतकी खोलवर रुतली आहेत, त्याला कोणते वादळ भिववणार?

इह परलोकीं सुखी। शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं॥

ज्याच्या जीवनातील आसक्तीचा संघर्षच संपलाय, त्याला कसले आलेय द्वैत? त्याचे ‘मी-तू’पण संपलेले असेल; प्रत्यक्ष परमात्म्याशी तो एकरूप झालेला असेल! आपल्यासारख्या संसारी सामान्य जीवांना इतका मोठा टप्पा कदाचित थोडा कठीण जाईल; पण जगाविषयीच्या आणि स्वतःविषयीच्या आपल्या अवास्तव कल्पनांना तर आपण टाचणी लावू शकतो ना? भूत आणि भविष्याच्या जंजाळातून स्वतःला बाजूला करून, वर्तमानात थोडा मोकळा श्वास तर घेऊ शकतो. म्हणूनच तर मुक्ताई म्हणतात—

‘मिथ्या कल्पना मागें सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

खिडकीच्या तावदानांवर धूळ, धुकं जमा होणं अनैसर्गिक नाही; पण ती पुन्हा घासून-पुसून स्वच्छ करणं, हे आपलंच काम! म्हणजे मग बाहेरचं सगळं स्वच्छ दिसायला अडचण नाही, बरोबर ना?
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments