Homeयशकथाझेप : 29

झेप : 29

“प्रशांत गौतम”

एकीकडे पत्रकारिते सारख्या गंभीर क्षेत्रात कार्यरत राहायचे आणि दुसरीकडे मुलांचे मनोरंजन, प्रबोधन करणार्‍या बालकथा लिहायच्या अशी कसरत प्रशांत गौतम आयुष्यभर करीत आले आहेत आणि विशेष म्हणजे पत्रकार म्हणुन काय किंवा साहित्यिक म्हणुन काय अजिबात टेंभा न मिरवता एखाद्या सामान्य माणसासारखे रहायचे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील आमचे व्यवसाय बंधू प्रशांत गौतम हे होत.

घरात पत्रकारितेची काहीही पार्श्वभूमी नसलेले प्रशांत गौतम यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला. गावात दोन शाळा व एक महाविद्यालय होते. एक व्यंकटेश विद्यालय – तिथे त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सरस्वती विद्यालयात झाले. अकरावी ते बी.काॅम पर्यंत गंगाखेड तर त्यानंतरचे शिक्षण परभणीतील शिवाजी महाविद्यालयात झाले.

प्रशांतजीचे शालेय आणि बरेचसे महाविद्यालयीन शिक्षण गावीच झाले तरी ते काही सहजासहजी झाले नाही. घरची कौटुंबिक परिस्थिती फारशी बरी नसल्याने त्यांना शाळा, महाविद्यालयात शिकत असतानाच भांड्याची पावडर मागवून ती विकणं, गुलाबाची फुले व कलियापाक बाजारात जावून विकणं अशी कामे करावी लागली. घरची आर्थिक परिस्थिती जरी चांगली नव्हती तरी त्यांच्या सुदैवाने घरी साहित्यिक वातावरण मात्र चांगले होते. घरातील वाड्यातील बैठकीच्या खोलीत वडीलांचे अनेक लेखक मित्र येत असत, त्यांचा त्यांना सहवास लाभला. शिवाय एक पुस्तकांची लाकडी अल्मारी होती, गावात गांधी वाचनालय होते. त्यामुळे वाचनाची आवड लागली. तर लेखनासाठी गावातील दैनिक, साप्ताहिक हे माध्यम होते, त्याचा त्यांना फायदा झाला.

परभणीत महाविद्यालयात शिकत असतानाच पत्रकारितेच्या आवडीपोटी प्रशांतजी एकाच वेळी तीन साप्ताहिकात अर्धपगारी काम करायचे. तिथे बीकॉम झाल्यावर त्यांनी एम कॉम करण्यासाठी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. नांदेड येथे त्यांनी श्रमिक एकजूट मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून दोन वर्षे काम केले. पुढे आपली आवड ओळखून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम त्यांनी प्रथम श्रेणीत पूर्ण केला. येथेही ते अभ्यासक्रमाच्या वेळेनंतर देवगिरी तरूण भारत मध्ये सहा महिने कार्यरत होते. त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते ज्या ज्या वृत्तपत्रात होते, तेथील संपादक त्यांना अ. भा. मराठी साहित्य संमेलन वृत्त संकलनासाठी पाठवत असत.विद्यापीठात असताना, लोकमतचा मुक्त पत्रकार या नात्याने मुंबईतील पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या वृत्त संकलनाची संधी प्रा.सुधीर गव्हाणे यांच्यामुळे त्यांना अचानक मिळाली. एम.जे अभ्यासक्रमाच्या लघुप्रबंधासाठी “ललित” या वाड़मयींन मासिकाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने मॅजेस्टिक ललित व दीपावली परिवाराशी ते जोडल्या गेले.

एम.जे झाल्यावर प्रशांतजी सायं दैनिक गोरज वार्ता मध्ये रुजू झाले. इथे त्यांना पहिले पान, अग्रलेख, दिवाळी अंक संपादन अशी कामं मिळत गेली.त्या नंतर ते दै. सामनात दि. 23 सप्टेंबर 1995 रोजी रूजू होऊन बढती घेत घेत 2023 मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून सेवानिवृत्त झाले. या कार्यकाळात त्यांनी तब्बल तीस साहित्य संमेलन कव्हर केली. विविध निमित्ताने लेखन केले. यात प्रामुख्याने बालसाहित्य हा आवडीचा विषय होता. वीस कथासंग्रह दोन बालकादंबरी असे त्यांचे लेखन झाले. ललित, दीपावली, महाराष्ट्र टाइम्स, प्रतिष्ठान पंचधारा मधुन लेखन प्रकाशित झाले आहे.

गौरवाची गोष्ट म्हणजे प्रशांतजी यांच्या “गोष्टींची गोष्ट” या बाल कथा संग्रहाचा समावेश नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात झाला आहे. या कथा संग्रहास १९९९-२००० या वर्षी राज्य वाडंमय पुरस्कार मिळाला आहे. या शिवाय त्यांना पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पन्नासहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांचा गुणवंत नागरिक म्हणून, पुणे मसापने साहित्य सेवक म्हणून सन्मान केला आहे. आज पर्यंत दहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तेवढीच मराठवाडा साहित्य संमेलनात निमंत्रित म्हणून सहभागी होतो.

अमेरिकेतील शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने ऑनलाईन तासभर लाईव्ह मुलाखत घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात इंग्रजी विभागातील एम.ए च्या विद्यार्थ्यीनींने एका लेखकाचा अभ्यास या उपक्रमात त्यांची सविस्तर मुलाखत घेतली. सोशल मीडियावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुंबईत पत्रकार दिनानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

समाज माध्यमांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार.

प्रवासाची आवड म्हणून ते अर्धा देश फिरून आले. या भ्रमंतीमुळे त्यांचे मन समृद्ध झाले. जीवनाच्या प्रवासात विविध टप्प्यांवर वेगवेगळे बरेवाईट अनुभव येतच असतात, अनेक स्वभावाची माणसं भेटतात असतात, काही लगेच विसरतात तर काही अनंतकाळ स्मरणात राहतात; असेच काहीसे त्यांच्या जीवन प्रवासात होत गेले. वृत्तपत्रात असल्याने व सतत बाहेर फिरत असल्याने मोठा मित्र परिवार वाढला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कटू प्रसंग सतत उगाळत न बसता सकारात्मक गोड आठवणी आपण जतन करू शकतो, असे ते म्हणतात.

प्रशांतजी यांच्या आयुष्याच्या प्रवासात संस्मरणीय प्रसंग म्हणजे त्यांनी सहा वर्षे केलेली पंढरपुरची वारी, यात अनेक सुखद अनुभव आले. पहिले पुस्तक, पहिला राज्य पुरस्कार हे अनुभव खासच आहेत.

काळाची पावले ओळखून प्रशांत यांनी दहा वर्षांपूर्वी “महाराष्ट्र मित्र” हा WhatsApp समुह छत्रपती संभाजीनगर येथून सुरू. सुरुवातीपासूनच या समुहात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी आहेत. राजकारण, वादग्रस्त पोस्ट वगळता अन्य सर्वसमावेशक पोस्ट येथे येतात,दिवसभर समुह सक्रिय असतो.

सुरवातीला या समूहात पाच ते दहा सदस्य सहभागी होते, त्यात वाढ होत होत आज ही संख्या ९०० एवढी झाली. त्यामुळे अलिकडेच त्यांनी एका समुहाचे तीन समुह केले. यात दोन महाराष्ट्र मित्र व एक साहित्य संवाद समुह आहे. या तिन्ही समुहात जवळपास वीस राज्यातील २०० मराठी भाषिक, रसिक सहभागी आहेत.

या समुहात साहित्य संमेलनाचे दहा माजी अध्यक्ष, साहित्य महामंडळ, साहित्य संस्था यांचे अध्यक्ष प्रतिनिधी, तसेच दैनिक, वाड़मयीन मासिक यांचे संपादक, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत.

या समुहाचे आतापर्यंत पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात तीन स्नेह मेळावे झाले आहेत. पहिले वर्ष हे भेटीगाठीचे होते. दुस-या वर्षी संगीतकार कौशल इनामदार तर तिसऱ्या वर्षी लेखिका, अनुवादक उमाताई कुलकर्णी यांना निमंत्रित केले होते.

या समुहाचे यूट्यूब चॅनल असुन कोरोना काळात ऑन लाईन “साहित्य संवाद” हा उपक्रम सुरू केला. त्यात वीसेक संवाद झाले. सर्वोत्तम व्हाट्सअप समुह म्हणून ठाणे येथील मराठी आठव दिवस या उपक्रमाच्या संस्थेने समुहाचा गौरव लेखक विश्वास पाटील व ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांच्या हस्ते झाला.याच कामाची व्यापक नोंद पुण्यातील अप्रतिम मिडियाने घेतली. पत्रकार दिनानिमित्त मुंबईत झालेल्या समारंभात समुहाचा सन्मान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. दिवसेंदिवस समूहाची लक्षवेधी वाटचाल सुरू आहे.

आजची पिढी बराच वेळ सोशल मीडियावर असते. मोबाईल हे त्यांचे विश्व झाले आहे. पण चांगली पुस्तके वाचनाचा परिणाम हा दीर्घकालीन असतो, म्हणून त्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी असे ते कळकळीने सांगतात.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मनःपूर्वक धन्यवाद सर.
    आपल्या सारख्या जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींचे कौतुकाचे शब्द
    नक्कीच उमेद वाढविणारे असतात. विशेष म्हणजे आपण
    पोर्टल च्या सुरुवातीपासून आजतागायत संबंधित आहात, याचा विशेष आनंद होतो.

  2. आदरणीय भुजबळ सर,
    श्री प्रशांत गौतम यांचा जीवनपट अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांमध्ये मांडला आहे. एक नि:स्वार्थ, साधे, अभ्यासू आणि साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. एका सर्वगुणसंपन्न व्यक्तिला आपल्या लेखणीने यथायोग्य न्याय दिला. दोघांचेही मनापासून अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments