Homeलेखअरे संसार संसार...

अरे संसार संसार…

निरक्षर असूनही सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी सांगून गेल्या….
“अरे संसार संसार,
जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके,
तेव्हा मिळते भाकर…”
जागेअभावी इथे पूर्ण कविता देण्याचा मोह आवरून इतकेच म्हणावेसे वाटते की, आता चुल आणि भाकर जाऊन अत्याधुनिक सुविधा, उपकरणे आली आहेत. मुले मुली केवळ साक्षरच नाही तर अति उच्च शिक्षित होऊ लागली आहेत. तरीही संसाराचे मर्म समजून न घेता उठसूठ घटस्फोट घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे ! याला काय म्हणावे ? पण असे घटस्फोट टाळण्यासाठी योग्य वेळी केलेले योग्य समुपदेशन किती महत्वाची भूमिका बजावू शकते, हे आपल्याला सांगणार आहेत, प्रा.डॉ.अशोक वाकोडकर.

अल्प परिचय : –
प्रा.डॉ. अशोक वाकोडकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांची 2018 पासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाकडून कौटुंबिक प्रकरणासाठी समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी स्थायी लोक अदालत जिल्हा न्यायालयात दोन वर्ष न्यायदान विषयक काम पाहिले आहे. आजपर्यंत 600 कुटुंबाचे प्रबोधन करून त्यांना न्यायालयात जाण्यापासून त्यांनी यशस्वीपणे परावृत्त केले आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर त्यांची महाराष्ट्रात विविध ठिकाणी व्याख्याने होत असतात.

दूरदर्शन मुंबई आणि आकाशवाणीवरून त्यांच्या विविध कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. आतापर्यंत त्यांची सहा पुस्तकाचे प्रकाशित झाली असून एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांना स्वा.रा. ती. म. विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, महाराष्ट्र लोकप्रशासन परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक प्राप्त झाले आहेत.

न्युज स्टोरी टुडे परिवारात वाकोडकर सरांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आता वाचू या, त्यांनी यशस्वीपणे हाताळलेली काही कौटुंबिक प्रकरणे..
— संपादक

1) “९० दिवसांचा दुरावा संपुष्टात !”
दोघांच्या कौटुंबिक वादात ती माहेरी निघून गेली. तीन महिने लोटले तरीही कुणी कुणाशी संपर्क करेना. मुलगा सातवीस शिकतो. शेवटी त्याने “चला बोलू या” शी संपर्क केला. आपली व्यथा कथन केली. तो व्यवसायाने ड्रायव्हर महिन्यांत 20 दिवस बाहेरगावी असतो. ड्रायव्हर असून पण निर्व्यसनी ! मुलाची आबाळ होऊ लागली. माहेरच्या लोकांचा संसारात हस्तक्षेप हा त्याचा आक्षेप !! नोटीस पाठवल्या मुळे दुसरे दिवशी ती कक्षात हजर झाली. हा सुद्धा मुलांसहित आलेला होता. तो नेहमी रागावतो असा तिचा आरोप होता. शेवटी दोघांचेही प्रदीर्घ असे समुपदेशन करण्यात आले. त्याने तिच्यावर संशय घेऊ नये आणि तिच्याशी शांतपणे बोलावे असे ठरले तिने सुद्धा माहेरच्या लोकांना हस्तक्षेप न करण्याविषयी सांगावे असे तिला सांगण्यात आले. समुपदेशन केल्याप्रमाणे दोघांनीही तसे वागण्याचा निश्चय केला आणि नव्वद दिवसाचा त्यांचा दुरावा संपला. तीन महिन्यानंतर मुलगा आई जवळ गेला, तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि नकळत तिच्या पापण्या अश्रुंनी ओल्या झाल्या. तिघेही एकत्र घरी जाण्यासाठी आनंदाने कक्षा बाहेर पडले.

2) “दिव्यांग मुलीचा संसार सावरला !!”
पत्नीला ऐकू येत नाही अन् बोलता येत नाही.. लग्नाला दोन वर्ष होऊन गेली. एक सुंदर फुल त्यांच्या संसार वेलीवर उमलले. पती ही कंपनीत नोकरीला ! तो कक्षात आला आणि त्याची व्यथा कथन केली. ती मुलाला नीट सांभाळत नाही, काळजी घेत नाही, मी नोकरीवर जाण्यापूर्वी मला टिफीन हवा असतो, पण ती लवकर उठतच नाही. कधी कधी चिडून अंगावर धावून येते. या आणि अशा त्याच्या पत्नी विषयी तक्रारी ! तशा त्या किरकोळ कौटुंबिक तक्रारी. पण तो वैतागला आणि तिला कायम माहेरी सोडण्याचा (अ)विचार त्याच्या मनात येऊ लागला. अशातच मित्राच्या सांगण्यावरून तो “चला बोलू या” कडे आला आणि सारी कहाणी कथन केली. तिला उपस्थित राहण्याविषयी कळवायचे होते पण अडचण होती की ती मूकबधिर होतील सांगावं तर ऐकू येत नाही आणि तिचं म्हणणं तिला मांडता येत नाही. एक मार्ग सुचला. लहानपणापासून मूक बधिर असल्याकारणाने तिच्या आई-वडिलांना साऱ्या खाणाखुणा समजत होत्या म्हणुन तिच्या आई – वडीलांसहित दुसरे दिवशी उपस्थित राहण्यास कळविण्यात आले. त्याचं गाव जवळच होतं. दुसरे दिवशी जावई आणि मुलीसहित आई-वडील उपस्थित झाले. तिच्या मातापित्यांना नवऱ्याने केलेली तक्रार सांगितली ! आणि मार्गदर्शन केलं की सकाळी तिनं लवकर उठाव; टिफीन करून द्यावा, लहान मुलाची काळजी घ्यावी, त्याच्याकडे अधिक लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले. वडिलांनी खाणाखुणा करून तिला समजून सांगितले. तिनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. नवऱ्याने तिची नैसर्गिक प्रतिकूलता लक्षात घेऊन तिला समजून घ्यावं, असं त्यालाही मार्गदर्शन करण्यात आलं. अन् काय आश्चर्य ! तिला कायम माहेरी पाठवण्याचा विचार दूर झाला. सारे जण आनंदाने बाहेर पडले. एक आव्हानात्मक कौटुंबिक प्रकरण संपुष्टात आल्याचे मला आत्मिक समाधान मिळाले. दीपावली सण जवळ आला असताना किरकोळ कारणावरून तुटू पाहणारा दिव्यांग मुलीचा संसार सावरला, बाळाला पण आई वडील यांचे प्रेम मिळालं !!

३) “संशयाने तुटणारा संसार सावरला !”
संशयात्मा विनश्चती ! याचा प्रत्यय एका कौटुंबिक प्रकरणात आला. केवळ पतीविषयी असलेल्या संशयाने तीन महिन्यापासून ती आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह बहिणीकडे निघून आली. तिला आईबाबांचे छत्र नाही. त्यामुळे ती आपल्या बहिणीकडे आली. कुणी कुणाशी संपर्क करे ना. आठवड्यापूर्वी तिनं “चला बोलू या!” मध्ये अर्ज केल्यावरून तिच्या पतीला उपस्थित राहण्यास कळविले असता तो उपस्थित राहिला. तिचा असा आक्षेप होता की पती माझ्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्या दोन महिन्याच्या बाळालाही तो विचारत नाही, एवढेच नव्हे तर तो नात्यातील एका महिलेशी गोड गोड बोलतो. त्यामुळे संशयाची भूत तिच्या मानगुटीवर बसले होते. तिला विचारले की तू प्रत्यक्ष डोळ्यांनी काही पाहिले का ? तेव्हा तिने नकार दिला. लोक चर्चा करतात म्हणून मला संशय येतो, एवढेच ती म्हणाली. यावरून तिला समजून सांगितले की लोक काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, प्रत्यक्ष पाहिले असेल तरच विश्वास ठेवायचा ! एक तास समजून सांगितल्यावर तिचा संशय दूर झाला.

तीन महिन्यापासून आपल्या बहिणीकडे दोन महिन्याच्या मुलीसहित असलेली पत्नी आनंदाने त्याच्यासह सासरी जाण्यास तयार झाली. बॅग बहिणीकडे असल्याने दोघांनाही तिकडे पाठवले आणि केवळ संशयामुळे तुटणारा संसार सावरला गेला ! तीन महिन्यापासून दुरावलेल्या चिमुकलीला त्यानं जवळ घेतलं. त्यालाही अश्रू अनावर झाले. तिच्या पापण्या पण ओल्या झाल्या पण हे आनंदाश्रु होते.

4) “पत्नी एकेरी बोलते म्हणून दुरावा !”
खरे तर एकमेकांना एकेरी नावाने बोलणे ही अलीकडे फॅशन आहे. पण एका प्रकरणात याच कारणावरून दुरावा निर्माण झाला होता. यामुळे दोघात वाद विकोपाला गेला. त्यामुळे दोघांचेही समुपदेशन केले. सासू सासऱ्यांना मान देत नाही, तो मुलास रागावतो, ती नोकरी करते ! ड्युटीवर असताना माझा फोन उचलत नाही हा त्याचा आरोप ! या साऱ्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली आणि शेवटी प्रकरण संपुष्टात आले. मला घटस्फोट पाहिजे म्हणणारी पत्नी त्याचे सोबतच घरी गेली. क्षुल्लक कारणावरून तुटणारा संसार सावरला !

5) “चार महिन्यापासून विभक्त पत्नीला सासरी पाठवले !”
दोन वर्षांपूर्वी किशन आणि श्रिया यांचा विवाह थाटात पार पडला. तो अभियंता आणि ती पण पदवीधर !! लग्नानंतर त्यानं तिला महाबळेश्वर, गणपतीपुळे अशा विविध ठिकाणी फिरायला नेले आणि तिची हौस पुरविली. पण तरीही ती समाधानी नव्हती. एके ठिकाणी तीन फोटो काढण्यास नकार दिला. इथं तो नाराज झाला. त्यात हे सारं मित्रांसमोर घडलं. त्याला तिच्या अशा वागण्यानं अपमान झाल्यासारखे वाटलं. पुढे तिनं नोकरी करण्याचा हट्ट केला. (तो चांगल्या पदावर असल्यानं तशी गरज नव्हती !) ईच्छा नसताना त्यानं संमती दिली. काही महिने बरे गेले. पण नंतर तिच्या वागण्यात बदल झाला. ती चोरून मोबाईलवर बोलायला लागली. काही आक्षेपार्ह फोटो आणि संदेश त्यानं वाचले अन् त्याचा राग अनावर झाला. दोघात वाद झाला तो इतका विकोपाला गेला की ती रागाच्या भरात न सांगता माहेरी निघून गेली. या गोष्टीला चार महिने लोटले. दरम्यान त्याचा राग शांत झाल्यावर त्याने संपर्क केला असता मला घटस्फोट हवा असे उत्तर तिनं दिलं. हा थोडा अस्वस्थ झाला. याला “चला बोलू या !” ची माहिती मिळाली. तो कक्षात दाखल झाला. इत्यंभूत कथन केलं. तिचं माहेर जवळच असल्यानं आमच्या विभागातील महिला पोलिस यांनी संपर्क केला अन् लगेच येण्यास कळवले. एक तासात ती भावासह कक्षात हजर झाली. तिचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं. घटस्फोटाचे पुढील धोके तिला सांगितले तिला हे पटलं अन् ती सासरी जाण्यास तयार झाली. याला पण कक्षात घेतले. त्यानं पत्नीकडून अजून अपेक्षा व्यक्त केल्या — ती जोडवी घालत नाही, टिकली लावत नाही आणि मुख्य म्हणजे मंगळसूत्र घालत नाही. हे आई बाबा यांना पटत नाही करिता वाद होतात. तिनं हे सौभाग्याचे अलंकार घालावेत हे तिनं स्वेच्छेने मान्य केलं. तो न्यायाला तयार झाला अन् तीही लगेच जाण्यास तयार झाली. चार महिन्याचा दुरावा संपला. दोघांनीही परस्परांना पुष्प गुच्छ दिले अन् समाधानाने ती सासरी गेली.

प्रा. डॉ. अशोक वाकोडकर

— लेखन : प्रा. डॉ. अशोक वाकोडकर. छत्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments