“मग तो कृपासिंधु,
निवारी साकडे !”
उन्हाची वेळ. खरं तर जेवणाची वेळ. आमचे भिशी कम गेट टुगेदर होते. एकत्र गप्पा आणि जेवण असा कार्यक्रम होता. मी ‘ रिक्षा रिक्षा ‘ असा आर्त आक्रोश करत उभी होते. टाहो म्हणा ! हल्ली रिक्षा ड्रायव्हर लांबूनच विचारतात,
“ कुठे ?“
आपण जाण्याचे ठिकाण सांगायचे. मग ते उत्तर न देता झर्र s कन निघून जातात. ‘घोडबंदर रोड ‘ किंवा ‘ कासार वडवली ‘ असे खूप लांबचे ठिकाण सांगितले की , त्वरित गर्रकन रिक्षा वळवून हजर होतात.
ठाण्यात तरी बहुतांशी हाच प्रकार आहे. दहा-बारा रिक्षा अशा गेल्या की एखादी नशिबी येते. चालत जाउन सुद्धा येणार नाही, इतका थकवा रिक्षासाठी ‘ याचना ‘ करून येतो. पलीकडच्या बाजूने जात असलेली रिक्षा माझा टाहो ऐकून थबकली. माझ्यापाशी येऊन थांबली. मी एकदम व्याकुळपणे झेपावले आत आणि सीटवर बसले.
“ मखमली तलाव ..” मी म्हटले. एकीकडे पैसे सुटे आहेत ना ते शोधू लागले. रिक्षा मिळाली, वेळेवर येते आहे असा मैत्रिणीला मेसेज टाकला. आणि तेवढ्यात माझं लक्ष रिक्षावाल्याकडे गेलं. मी ओरडलेच.
“ बाप रे ! डोक्याला बँडेज आहे तुमच्या ! “
डोक्याला नुकतेच टाके घातलेले दिसत होते. पाच-दहा मिनिटं पण झालेली नसावीत. बँडेजवर ठिबकलेला रक्ताचा ढबोळा डाग सांगत होता, की ड्रेसिंग अगदी ताजे आहे.
जखम , डोक्याला बँडेज तरीही गिऱ्हाईक घेऊन बिनधास्त चालला होता गडी. मारामारी करून आला असेल. त्याचे फुटलेले डोके आणि त्याच्यावरचे बँडेज बघून गुंड असेल असं वाटलं किंवा धडकली असेल रिक्षा ! माझ्या मर्यादित कल्पनाशक्तीनुसार मी आडाखा बांधला. त्याच्या अशा अवस्थेत मी त्याच्याकडून चाकरी करून घेणं मात्र प्रशस्त वाटेना.
“ काय झालं ? मार कसा लागला ?”
तेवढ्यात डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या एका ड्राइव्हरला त्याने आधी एक सणसणीत शिवी हासडली , मग म्हणाला,
“ आत्ताच एक तासापूर्वी.. बँडेज बांधून झाल्यावर केमिस्टकडून दवा घेतली नि पहिलं भाडं तुमचं भेटलं.. ”
‘ दवा ‘, मी ‘ भाडं ‘ असणं , ते त्याला भेटणं वगैरे खटकणारे शब्द पार करून त्याची जखम माझ्या मनात खोलवर पोहोचली..
मलाच अवघड झालं ते ऐकायलासुद्धा. गप्पा मारल्या तर धडकावेल हा पुन्हा कुठेतरी रिक्षा, अशी भीती वाटत असूनही मी पुटपुटले.
“ घरी जायचं की हो, अशावेळी ! “ .
“ जायचं नाही घरी, हे निचित केलं आहे मी.
मुलं शाळेतून घरी आली असतील. एकच रूम आहे. मला आराम भेटणार नाही. शिवाय ती दोघं आधी माझ्या बायकोला कळवतील ! रोजंदारीवर काम करते ती. तिचा जीव राहायचा नाही. ती धावत घरी येईल. खाडा होईल तिचा. आता काय जखम तर बांधून झालीच आहे. रिक्षा चालवून चार पैसे कमवेन तरी. तसाही दुपारी मी जेवतच नाही. पोटभर नाष्टा करून बाहेर पडतो.”
इतका सारासार ‘ निचित ‘ विचार त्याने जखमेतून रक्त वाहत असताना केला , तेही डोक्याला मार लागून झालेली जखम ! माझ्या डोळ्यांसमोर पोटासाठी खेड्यातून शहरात आलेले, कष्टकरी , एकमेकांवर जीव लावणारे त्याचे गरीब कुटुंब आले. ‘मी ‘ साठी म्या म्हणत नसला तरी खेडवळ भाषा कळत होती.
रस्त्यामध्ये सिग्नल लागला, आणि त्याने आणखीच सविस्तर सांगितले. एका दारुड्याने त्याच्या रिक्षेला हात केला होता. झोकांड्या खाणारा आणि त्याचा एकूण अवतार बघून दारुडा पैसे देणार नाही अशी त्याला शंका आलीच होती. रात्रभर पिऊन खलास झालेला तो दारुड्या , भूक लागल्यामुळे त्याला जाग आली असावी. अकरा वाजत आले होते. आंघोळ, चहा ,जेवण सगळे त्याला अगदी हवेसे झाले असेल.
घरी तरी जाईल बिचारा ,ह्या दयाळू भावनेने त्याला रिक्षात घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बकाल वस्तीपाशी सोडलं. तिथे दारुड्या खाली उतरायला तयार नाही !
पैसे नको फक्त खाली उतर.
छे !
दारुड्यानं मोठ्या आवाजात शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याचे भाईबंद म्हणा, शेजारचे म्हणा , धावत आले.
विचार नाही पूस नाही, रिक्षावाल्याला हात धरून बाहेर काढलं. भरपूर तुडवलं. डोकं फुटेस्तोवर मारलं. नशिबाने ती टोळी त्याला जिवंत टाकून पळाली. मग हा विकृत समूहाचा बळी ठरलेला बिचारा आपल्याच रिक्षातून जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेला. एक गिऱ्हाईक त्याचा खांद्यावरचा पंचा विसरून गेलं होतं. त्याचा जखम बांधायला उपयोग झाला.
हॉस्पिटलमध्ये अॅडमिशन मिळेपर्यंत, ‘ मी चोर किंवा आरोपी नाही, रक्त माझेच आहे ‘ हे पटवेपर्यंत थोडा वेळ गेलाच.
करायला गेला एक आणि झालं होतं भलतंच. मी हळहळले.
“ खूप खोल नाही जखम !” त्याने मलाच धीर दिला.
उतरताना भाड्याव्यतिरिक्त मी एक नोट ठेवली.
” आजच्या औषधापुरते… “ तो नको नको म्हणत होता म्हणून मी आग्रह केला.
“ तुम्हाला कशाला भुर्दंड, ताई ? “
“ भुर्दंड नाही हो. वेगवेगळी कारणं असतात. वेगवेगळ्या प्रकारचं मार खाणं असतं. विनाकारण बळी जाणं मी सुद्धा अनुभवलं आहे. सहानुभूती हवी वाटते अशा वेळी… “ न कळत मी उद्गारले. मनात काहीसे दाटून आले. त्याला काय कळले माहीत नाही. पण सच्चेपणा नक्कीच कळला असेल.

“ जीव नाही घेतला हे चांगलं झालं बघा. कुठेतरी देव असतूय. पंचा मिळाला बघा जखम दाबून धरायला ! ‘
“ एव्हढं झालं तरी, देवाला नाव ठेवत नाही तुम्ही ? कमाल आहे ! ”
“ वारीला जातो ! देव नाही कसं म्हणल हो मी ? भोग सुटत नाहीत, देवाचा दोष नाही त्यात.” रिक्षा निघून गेली. मी मिनिट एक भर खिळूनच उभी होते. त्याचं तत्वज्ञान तर मनात कोरून राहिलं.जखम झाली म्हणून तो विचलित झाला नव्हता. दयाळू भावनेच्या बदल्यात हे काय मिळालं, असा सूर नव्हता. मनस्थिती स्थिर ठेवून त्याने योग्य निर्णय घेतला होता. दैवाला, देवाला शिव्या तर देण्याचा प्रश्नच नव्हता त्याच्या लेखी !
दयाळू देवाने जखम बांधायला साधा रुमाल नाही तर पंचा ठेवला होता.
आलिया भोगासी असावे सादर
देवावरी भार, घालूनिया I
मग तो कृपासिंधु, निवारी साकडे
येर ते बापुडे, काय रंक I
संत तुकयाचे बोल एका रिक्षावाल्याकडून मी प्रत्यक्ष अनुभवले. स्थितप्रज्ञ ह्या शब्दाची साक्षात प्रचिती.
किती वेळा तरी ठरतो आपण असे बळी ! दुसऱ्याच्या अनाठायी इर्षेचे ,स्वार्थाचे , राजकारणाचे किंवा विकृतीचे ! मदत करायला जावी आणि असे विपरीत पदरी यावे ! वाईट वाटते ना ? पण नाही ! तळमळ आता होऊ द्यायची नाही. किती उत्तम वस्तुपाठ मिळाला.
जाताजाता असंही वाटलं , रिक्षावाल्यासाठी गिऱ्हाईक मिळण्यातसुद्धा धोका असू शकतो ? ते देखील दिवसा ढवळ्या… हे आतापर्यन्त कधी आपल्या मनाला शिवलेही नव्हते !
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
