महाराष्ट्र राज्यात ७ हजार ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यांचे २० लाख सभासद आहेत. त्यापैकी ९१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नाही. तसेच ज्यांना मिळते तीही तुटपुंजी आहे, म्हणुन ज्येष्ठ नागरिकांना कमीत कमी ५,००० रु. पेन्शन मिळाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र फेस्कॉम अध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे यांनी केली. सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव होते.

श्री टेकाळे पुढे म्हणाले की, “६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळत असून, ७५ वर्षाच्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास करण्यासाठी मोफत सवलत मिळत आहे. महिलांना ६ वर्षा पासून ७५ वर्षापर्यंत ५० टक्के सवलत मिळत आहे. एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी फेसकॉमच्या वतीने प्रयत्न केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघामध्ये जवळजवळ ७० लाख नागरिकांनी कार्ड काढली आहेत. आयुष्यमान कार्डच्या मार्फत ज्येष्ठांना ५ लाखापर्यंत सवलत मिळते. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन झाली असून, शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्या सांगण्यासाठी सायंकाळी ३ ते ५ या वेळेत अधिकाऱ्यांना भेटता येते. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. आपण दुसऱ्यांना आनंद आनंद दिल्यास आपणास आनंद मिळतो. आनंदी आयुष्य जगण्यासाठी सुसंवाद करा, वाद करू नका” असेही ते म्हणाले.

फेस्कॉमच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री सुरेश पोटे यांनी फेसकॉम संघटनेविषयी सविस्तर माहिती दिली. “ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला श्री अण्णासाहेब टेकाळे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच ज्येष्ठ नागरिकांना अनेक सवलती मिळत आहेत” असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड, आयुष्यमान कार्ड, नवी मुंबई परिवहन बसेसचे मोफत प्रवासाचे कार्ड, आरोग्य शिबिरे, आनंद मेळावे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजात वाचन प्रवृत्ती वाढावी म्हणून, ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वाचक मंडळाची स्थापना आपण करीत असून संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

उन्नत आणि उत्कर्ष पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत रांजणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पतसंस्थेत बचत केल्यास ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याज दिले जाईल.
या कार्यक्रमात 93 वर्षीय श्री श्रीनिवासन यांनी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याचे मर्म साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने संघाला 25 हजार रुपयांची देणगी दिली.

मेळाव्याच्या सुरुवातीला गायनाचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी केले. तर संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
