Homeपर्यटनमाझी जीवन नौका : २२

माझी जीवन नौका : २२

🌊🌊🌊🌊🌊
हल्दियाकडे

तुतीकोरीनचं unloading पूर्ण झालं. त्याचवेळी घरून आलेली पत्रे जहाजावर सर्वांना मिळाली. प्रत्येकाच्या घरच्या बातम्या सर्वजण एकमेकाला सांगत होते. मुलांची प्रगती, कुठे कुणाच्या गावातल्या शेतात चाललेली कामं, कोणाच्या घरी व्यायलेली गाय, त्यातही गाईला पाडी झाली असली तर आनंदी आनंद, बांधायला काढलेल्या घरांची प्रगती, कोणाच्या घरी काही आजारपणं, तर कोणाकडे  नातेवाईकाला नवं झालेलं बाळ, मुलांनी येताना घेऊन यायच्या वस्तूंची दिलेली यादी, पत्नीने तब्येतीची काळजी घ्यावी म्हणून लिहिलेले अर्जव…. त्यावरून केली जाणारी थट्टा… किती तरी गोष्टी बोलल्या जात होत्या.
घरची पत्र मिळाली की जहाजावर उत्सवच असतो.

रामू, थर्ड ऑफिसर होता… वीस-बाविशीचा मुलगा. दक्षिणेतला, तमिळनाडूत ला ! तो कल्याणपूरच्या हाताखाली डेक सेक्शन मध्ये काम करायचा. त्याच्या घरून पत्र आलं होतं.
मी आणि सुचित्रा तिच्या केबिनमध्ये गप्पा मारत होतो. मी चिऊला मांडीवर घेऊन खेळवत होते. तेवढ्यात रामू आला. खुश होता. त्याच्या सगळ्यात धाकट्या बहिणीचे लग्न ठरत आलं होतं. लग्नाबद्दल खूप उत्साहाने बोलत होता. बोलता बोलता गंभीर झाला. म्हणाला, “जितना हो सके ज्यादा से ज्यादा पैसा पापा को भेजना है |”

रामू हा एकटाच मुलगा. सगळ्यात धाकटा. चार थोरल्या बहिणी. त्यांची लग्न करता करता वडिलांचं कंबरडं मोडायची पाळी आलेली. बहिणी थोड्याफार शिकल्या होत्या. पहिल्या तिघींची लग्न झाली होती. आता चौथ्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैशाची जमवाजमव सुरू होती. रामू सांगत होता, “क्या करे ? हमारे मे बहुत सारा सोना और दामाद को बहुत कुछ देना पडता है | पहले तीन बहनों की शादी करने के लिए हमारी जमीन बिक गयी | खाली एक छोटासा घर बचा है | पापाने बहुत मेहनत की, पैसा जमा किया | लेकिन हम एकदम गरीब गरीब हो गये ! इसीलिए तो मैं छोटी उमर मे जहाज पे काम करने लगा | मैं अकेला बेटा हूं | पापा की मदद तो करनी है | पैसा चाहिये ना ! मैं मेरी अम्मा और पापा को खुश देखना चाहता हूं | मैं शादी करूंगा तब बीबी के माॅं-बाप से कुछ नही ले लूंगा”

पाहता पाहता त्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. त्याला हुंदका आवरेना. मी आणि सुचित्राने त्याची समजूत घातली. मी म्हटलं, “आप अपने पापा को गरीब मत समझना | तुम्हारे जैसा होनहार, समझदार बेटा है, तो पापा गरीब कैसे हो सकते है ?” मग तो समाधानाने हसला.

आत्ता विचार करताना लक्षात येतं त्यावेळी माझं लग्न ही नुकतंच झालं होतं. दोघेही भाऊ शिकत होते. लहान होते. अजून  कमावण्याची त्यांची वयं आणि शिक्षणं झाली नव्हती.

एक मध्यमवर्गीय शाळेतला शिक्षक माणूस असलेले आपले वडील, त्यांनी आपल्या लग्नाचा सर्व खर्चाचा भार कसा उचलला असेल ? त्यावेळी आपल्या हे कधीच कसं लक्षात आलं नाही ?
खरंच तेव्हा वय लहान, अल्लड होतं. एकवीस वर्षाचीच होते मी ! ना जगाचा अनुभव, ना व्यवहारांची माहिती !
आई-बाबांच्या पंखाखाली अत्यंत सुरक्षित, अतिशय आनंदात होते मी. या सगळ्याची झळ त्यांनी आम्हाला कधीच बसू दिली नाही की कधी जाणीव ही करून दिली नाही. त्यातच येणारे जाणारे, मुक्कामाला असणारे पाहुणे, कोणाची आजारपणं हे सार ते आनंदाने करायचे.

ते दोघं हे शिवधनुष्य कसं पेलंत होते, ते त्यांनाच माहिती. त्यांनी आम्हाला दिले ते उत्तम संस्कार, समाधान आणि आनंद ! आपल्याला काही कमी आहे असं कधी वाटलंच नाही. हे आनंद आणि समाधान देण्याची कोणती जादू त्यांच्याकडे होती ते त्यांनाच माहीत.
आता मागं वळून पाहताना त्या सगळ्याची जाणीव होते आणि परत एकदा आई-बाबांबद्दल मन आदराने भरून येतं.

आमच्या घरून आलेली पत्रं आम्हालाही मिळाली. त्यात दादा-वहिनी, वृंदा तसेच आई-बाबा यांची पत्रं होती. आम्ही दोघांनी ती ताबडतोब वाचली. घरी वाढदिवसाला मी पाठवलेली पत्रे त्या सर्वांना मिळाली होती. खूप छान वाटलं असं त्यांनी आवर्जून लिहिलं होतं.

बाबांच्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की : –
अव्वाला, म्हणजे माझी आजी, बाबांची आई – हिला मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तिथं तिच्या पोटाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वी झालं. सर्व औषधोपचारांना तिचा छान प्रतिसाद मिळत आहे. तिची तब्येत सुधारत आहे. धोका दूर झाला आहे. हे सर्व वाचून मला फार आनंद झाला. समाधान वाटलं. मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं.

बोटीवरती नेहमीप्रमाणे पायलट आला. बोलार्डचे दोरखंड सोडले गेले आणि तुतीकोरिनचा निरोप घेऊन हळूहळू लोकपालक मोठ्या मोकळ्या समुद्राच्या दिशेने निघाली. हल्दियाकडे प्रयाण होत होतं.

रोलिंगचा पहिला अनुभव
मार्च संपत आलेला ! हळूहळू समुद्रातलं वातावरण बदलत होतं. दुसऱ्या दिवशी अचानक समुद्राच्या लाटांचा आकार थोडा बदलतो आहे त्यांना फुगवटा येतो आहे असं वाटायला लागलं. कालपर्यंत अवखळ, नाजूक, नाचऱ्या वाटणाऱ्या लाटा आता हळूहळू दाट, मोठ्या आणि गंभीर व्हायला लागल्या. अचानकच त्या जहाजाच्या कडांवर येऊन आदळायला लागायच्या. त्या सरशी जहाज उजवी डावीकडे डुलायला लागायचं. हेच ते रोलिंग ! लाट धडकून परतली की संबंध शिप थरथरायची… जशी भूकंपात जमीन थरथरते ! तोपर्यंत मागोमाग पुढची लाट येऊन धडकायची. रोलिंग सुरूच रहायचं. चालताना आपला तोल जातो आहे असं वाटायचं.
मुकुंद म्हणाले, “अगं हे काहीच नाही. अजून ही सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत. वरच्या वस्तूंची  पडझड सुरू झाली नाहीये. खरं रोलिंग पुढेच बघायचेय.” मी म्हटलं, बापरे !

कुठलीच पूर्व सूचना न देता शिपला मधूनच घुसळून काढण्यात समुद्राला मजा वाटायची. रात्री बेडवर आडवं झालं की कधीकधी झुल्यात घालून आपल्याला कोणीतरी झोका देतेय असं वाटायचं.

ते स्वप्न !
मला स्पष्ट आठवतं, ती तारीख होती २७ मार्च १९८०. सेलिंग मधलं यांचं वॉचकीपिंग सुरू झालं होतं. पहाटेच्या चारच्या इंजिनरूम ड्युटीला हे तयार होऊन निघाले होते. मला जाग आली, पण लगेच परत झोप लागली.
मला स्वप्न पडलं की सांगलीतलं आमचं घर आहे. बाहेरच्या खोलीला लागून असलेल्या बाथरूम मधून अव्वा पाय धुवून ओल्या पायांनीच खोलीत आली आहे. ती रडते आहे. पदराने डोळे पुसते आहे. मी तिला विचारलं, ” अव्वा काय झालं ? का रडते आहेस ?”
ती म्हणाली, “मला आपल्या घरातून जायचं नाही आहे गं !”
मी म्हटलं, “पण तुला आपल्या घरातून जायला कोण कशाला सांगेल ? तू इथेच रहा.”
ती म्हणाली, “तसं नाही गं ! पण मला जावंच लागेल” आणि मला जाग आली. स्वप्न संपलं होतं.

किती विचित्र स्वप्न होतं ते. केबिनमध्ये मी एकटीच होते. मग झोप येईना. उठून बाहेर डे रूम मध्ये आले. हाताला मिळेल ते पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करायला लागले. पण मन लागेना. आठ वाजेपर्यंत तिथेच बसून होते. आठला ड्युटी संपवून हे आले. मला इतक्या सकाळी डे-रुममध्ये वाचत बसलेली बघून त्यांना आश्चर्य वाटलं. मी पडलेले स्वप्न सांगितलं. मला हे म्हणाले, “अगं आव्वांच्या ऑपरेशनची, तब्येतीची गोष्ट तुझ्या मनात आहे, त्यामुळे असं काहीतरी स्वप्न तुला पडलं. बाबांच्या पत्रात वाचलंस ना की अव्वांची तब्येत सुधारते आहे. त्या आता लवकरच बऱ्या होतील. काळजी करू नकोस.” मला खूप दिलासा मिळाला. ते स्वप्नही तेवढ्यावरच राहिलं.

बंगालचा  उपसागर !
तसंही हा बंगालचा उपसागर, आपला गंगासागर, फार अवखळ आणि खोडकर ! अचानकच खोड्या काढायला सुरुवात करायचा ! आकाशात जरासं मळभ होतं. पण उजेडही होता. दुपारी चारची वेळ असेल. नजर सहजच पोर्टहोलच्या बाहेर गेली तर जहाजाच्या कडांवर धडकून दूर जाणाऱ्या लाटांच्या डोक्यावर पांढरा शुभ्र फेस खुलून दिसत होता. त्या शुभ्र फेसाळ लाटांचा समुद्रात जसा सडाच पडला होता.

मुकुंद म्हणाले, “अरे, आज व्हाईट हॉर्सिस दिसायला लागलेत. सी रफ होणार थोडासा !”
मी विचारलं, “म्हणजे आता आपली शिप आणखी जोरात हलणार ? हे व्हाईट हाॅर्सिस काय आहे ?”
मुकुंद म्हणाले, “त्या डोक्यावर  पांढराशुभ्र फेस असणाऱ्या दूर दूर पसरलेल्या लाटा दिसत आहेत ना, त्यांना व्हाईट हॉर्सिस म्हणतात.”
मुकुंद सांगत होते, तीव्र वाऱ्यामुळे आणि समुद्रातील प्रवाहांमुळे अशा मोठ्या लाटा तयार होतात. त्या धडकल्या की त्यांचे वरचे शिखर फुटून तिथे पांढरा फेस तयार होतो.

जहाजाला अगर खडकांना धडकून या पांढऱ्या फेसाळलेल्या शेकडो – हजारो लाटा… एकामागून एक अशा किनाऱ्याकडे वेगाने झेपावताना दिसत होत्या.  जणू काही मानेवरची पांढरी आयाळ उडवत पांढरेशुभ्र घोडेच मोठ्या डौलात दौडत जात आहेत असा भास होत होता.
धडकणाऱ्या लाटांचा धडाड आवाज मी प्रथमच ऐकत होते, जशा काही हजारो घोड्यांच्या टापाच !

समुद्र तर राजाधिराज…
महान सम्राट !
त्याचं वैभव मोठं,
दिमाख मोठा,
धाकही मोठा !
त्याच्या इतमामाला शोभेल अशीच ही क्षितिजापर्यंत चौफेर पसरलेली हजारो – लाखो शुभ्र अश्वांची सेना.. हे सागराचे  वैभव… ती भव्यता पाहून मी दिपून गेले होते.

ग्रीक कथेनुसार समुद्राचा देव ‘पाॅसिडॉन’ (Poseidon)
या महापराक्रमी देवाचे वाहन म्हणजे वादळी समुद्रात उसळणाऱ्या या पांढऱ्याशुभ्र फेसाळ लाटा… शुभ्र रेशमी आयाळ असलेले हे व्हाईट हाॅर्सिस… हिप्पोकॅम्पस !

समुद्रात जेव्हा ‘व्हाईट हॉर्सिस’ दिसू लागतात, तेव्हा तो वाऱ्याचा वेग वाढल्याचा आणि समुद्र खवळलेला असल्याचा स्पष्ट संकेत असतो आणि अगदी तसंच घडत होतं. वादळ सुरू होतं. शिपचं रोलिंग वाढत चाललं होतं.

एरवी प्रत्येक बारीक-सारिक गोष्टीला घाबरणारी मी, पण मलाच आश्चर्य वाटतं, त्या वादळाची, जहाजाच्या होणाऱ्या रोलिंगची, खवळणाऱ्या समुद्राची मला कधीच भीती वाटली नाही. समुद्र हे मला नेहमीच माझं घर वाटतं !

सूर्य कलला होता. संधीप्रकाशात त्या घोड्यांच्या पांढऱ्याशुभ्र आयाळीवर लाल रंगाचा शिडकावा झाला होता….जसे काही लाल तुरेच खोचले होते. एक मंदशी झिलई लाभलेली ती रंगसंगती अपूर्व होती.
आता हळूहळू सूर्य मावळला. अंधार होत चालला तशा लाटा गडद निळ्या – जांभळ्या दिसायला लागल्या. त्यांच्या वरचे आयाळ उडवणारे ते घोडे जास्त शुभ्र दिसू लागले.

उधळलेले श्वेता वारू अर्थात white horses

धूसर होणाऱ्या प्रकाशात लाटांच्या फेसावर चाललेला तो छाया प्रकाशाचा खेळ सागराचं श्वेत-श्यामल रांगडं देखणेपण, त्याचा रुबाब खुलवत होता. निसर्गाच्या सुंदरतेला खरोखर सीमा नाही.
तर, अनंत जलधीला महान सम्राट मानणाऱ्या आणि वादळाच्या तांडवाचे संकेत देत येणाऱ्या पांढऱ्या फेसाळ लाटांच्यात त्याची श्वेत अश्वसेना पाहणाऱ्या कवींच्या असामान्य प्रतिभेलाही तोड नाही.

कोणी संस्कृत कवी म्हणतो तसं :
गगनं गगनाकारम् |
सागर: सागरोपम: |
तरंगा: फेनधवला: |
सागरस्यैव भूषणम् ||
अनंत आकाश आणि अथांग सागर अनुपमेय आहेत. समुद्राच्या या फेसाळलेल्या पांढऱ्याशुभ्र लाटा हे केवळ त्या सागराचेच भूषण आहे. हे भूषण केवळ त्यानेच मिरवावे. दुसऱ्या कोणालाही ते शोभणार नाही आणि पेलणार ही नाही.

सागर – तांडवाची पहिली सलामी
त्या दोन दिवसांत समुद्राच्या बदलणाऱ्या या रुद्र -भीषण स्वरूपाची एक छोटीशी चुणूक मी प्रथमच पाहत होते. सागराचा धिंगाणा दिवस रात्र सुरूच होता. त्यातच आपली सगळी कामे आंघोळ, कपडे धुणे आवरायची म्हणजे एक कसरतच होती. मला स्वयंपाक वगैरे करणे शक्यच नव्हते. चहा ब्रेकफास्ट केबिनमध्ये घेतला आणि जेवायला खाली मेस मध्येच गेलो. तिथले कुक्स, स्टुअर्ड्स रोजच्या प्रमाणे आरामात काम करत होते. तिथे सर्व स्वयंपाक व्यवस्थित तयार होता. सर्व ऑफिसर्स आणि क्रू मेंबर्स आपापल्या ड्युटीज नेहमीप्रमाणे सांभाळत होते. त्यांना कोणालाच काही फरक पडत नव्हता. या सगळ्याचं मला फार आश्चर्य वाटत होतं.

वादळातला समुद्र

या गोंधळात सुचित्रा चिऊला कशीबशी सांभाळत होती. तिच्या बाटल्या उकळणे, आंघोळ घालणे, सगळीच धमाल होती. तिला मदत करायला माझ्या तिच्या केबिनकडे चकरा सुरूच होत्या.

मुकुंद दुपारचा चहा घेऊन इंजिन रूम कडे निघाले. मग मी पण केबिन मधून बाहेर पडले. रोलिंग सुरूच होतं. ऍली-वे आणि जिन्यात दोन्हीकडे लावलेल्या बारचा आधार घेतल्याशिवाय चालणं अवघड होत होतं. मग जिना चढून ब्रिज वरती गेले. जहाजाचा सर्वात वरचा मजला. सबंध काचेच्या पारदर्शक भिंतींची ती गोलाकार खोली. ब्रिज-रूम मधून बाहेर पडून तिथल्या उघड्या डेकवर बाहेर जाऊन उभी राहिले. तेथे सेकंड ऑफिसर काम करत होता. म्हणाला, “Be careful madam. The ship is rolling. Please don’t go near the railings”

वरून पाण्यावर डुचमळत चालणाऱ्या शिपचा समोरचा संपूर्ण मोठा भाग दिसत होता. सर्व डेक्स वर अगदी सगळ्यात खालच्या, समुद्रा लगतच्या हॅचिसच्या दोन्ही बाजूला असलेल्या डेक्स वर सुद्धा ड्युटी ऑफिसर्स आणि क्रू मेंबर्स सराईतपणे वावरत होते. त्यांची कामं सुरू होती.
जहाजाच्या कडांवर येऊन धडकणाऱ्या लाटांचे तुषार डेक भिजवून काढत होते. कधी कधी जोरदार लाटेचं पाणी डेकभर पसरत होतं आणि जहाज झुकलं की परत समुद्रात समर्पित होत होतं. त्या डाव्या-पोर्ट आणि उजव्या-स्टारबोर्ड बाजूच्या दोन्हीही डेक्स चिंब भिजून गेल्या होत्या.

हलके व्हाईट हॉर्सिस

तिथून दिसणारा समुद्राचा अफाट विस्तार शब्दातीत होता. लाटांच्या तडाख्याबरोबर उडणारे पाण्याचे तुषार जहाजाला वेढून टाकत होते. जसे मोत्यांचे हार  घालून समुद्र शिपला सजवत होता. शिप डोलत होती, मुरडत होती, लाजत होती. जहाजाच्या कडांवर लाटा धडाडकन् धडकत होत्या. जसा मस्तीत आलेला समुद्र आपल्या हजारो हातांनी शिपला कवळून धरत होता आणि त्याची क्षितिजापर्यंत  पसरलेली ती शुभ्र घोड्यांची सेना चौफेर अखंड  दौडत होती….मी अनिमिष नेत्रांनी पहात होते.

नवीन पोर्ट… मद्रास
हल्दियाला पोहोचेपर्यंत समुद्र थोडा खवळलेलाच होता. शिपचं रोलिंग  सुरूच होतं. कल्पना करा आपलं अख्खं घरंच, नव्हे अख्खी बिल्डिंगच… एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे झुकून अखंड डोलत आहे. असंच सतत सुरू होतं.
मला Sea sickness होतो आहे असं जाणवायला लागलं. थोडं मळमळायला लागलं. पोटात अस्वस्थ वाटत होतं. घशाशी येत होतं. पण उलटी मात्र झाली नाही, मी ती होऊ दिलीच नाही….. कारण आपल्याला जहाजावर मुकुंदांच्या बरोबर  राहायचं आहे. मी निर्धार केला की जहाज लागू द्यायचं नाही…. No sea sickness !
शेवटी दर्यावर्दी इंजिनियरची बायको होते ना मी ! माझ्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा विजय होता.

समुद्राच्या पाण्यावरील व्हाईट हॉर्सिस
A I निर्मित प्रतिकात्मक चित्र.

हल्दियाला बंदरात पोचल्यावर अक्षरशः सुटकेचा निःश्वास टाकला. जहाज जेट्टीला लागलं. गॅंग-वे उतरून खाली आलो तर जेट्टीच्या जमिनीवर उड्या मारत चालायला होतंय असं वाटत होतं.
सुचित्रा म्हणाली, रोलिंग हो रहा था तो मुझे हलका पेट में uneasy लगने लगा. लेकिन अनुश्री मजे में थी | शायद बच्चों को कभी Sea sickness नहीं होता |
हल्दियातलं लोडिंग संपवून परत तुतीकोरीनला जाणार हे रुटीन आता अंगवळणी पडलं होतं.

दुसऱ्या दिवशी आम्ही तुतीकोरीनकडे निघणार होतो, तोच कंपनीचा मेसेज घेऊन एजंट आला की या वेळेला तुतीकोरीन ऐवजी लोकपालकची रवानगी मद्रास बंदराकडे होणार आहे. जहाजावर खुशीची लाटच उसळली. त्याच त्या कंटाळवाण्या रूट मधे बदल होऊन मद्रास सारख्या मोठ्या वेगळ्या शहरात जायला मिळणार याचा जहाजावर सगळ्यांनाच प्रचंड आनंद झाला. त्यावेळी मद्रासचे अजून चेन्नई झालं नव्हतं, मद्रास हेच नाव होतं.

दुसऱ्या दिवशी sail out झालो. आता परत किती rough weather असेल, किती rolling होईल असं वाटत होतं. सकाळी खूप लवकर बंदरातून बाहेर पडत होतो. . हे इंजिनरूमकडे आणि मी डेकवर जाऊन उभी राहिले. सूर्य उगवत होता. त्याच्या कोवळ्या लालसर हसऱ्या कीरणात समुद्र उजळून निघाला होता. शिप मोकळ्या समुद्रात आली. आता समुद्र मात्र एकदम शहाण्यासारखा वागत होता. कुठे लाटा नाहीत, धडधड नाही, रोलिंग नाही. सारं शांत !

येतानाच्या प्रवासात उधळलेल्या त्याच्या श्वेतवारूंची सारी सेना त्याने आवरून घेतली होती. लगाम खेचून, पागेत बंद करून टाकली होती बहुतेक !
येतानाचं ते त्याचं रांगडं, गंभीर, रुद्र-भीषण, सुसज्ज योद्धाचं रूप आणि आजचं हे कोवळं, शांत, खेळकर, हासरं रूप !
हाच का तो कालचा ? असा संभ्रम पडावा.
सागराचं प्रत्येक रूपच देखणं, प्रत्येक विभ्रम विलोभनीय !
क्षणाक्षणाला रूप पालटणारा हा नटखट बहुरूपी !

संध्याकाळी बाहेर पाहिलं तर झळाळत्या केशरी रंगांनी आकाश भरून गेलं होतं. मुकुंद म्हणाले, “आपल्याला जाताना एकदम शांत समुद्र मिळणार आहे”
“See the clear Orange light in the sky. Orange sky is the sailor’s delight.”
“आकाशाचा असा केशरी रंग दिसला की वादळ संपलं आहे. समुद्र शांत असणार आहे याची ती खूण असते.”
खरोखरच प्रवास अगदी छान शांतपणे पार पडला. अगदी आरामात, एकदम मजेत मद्रासला येऊन पोहोचलो.

वेदवती कुलकर्णी

— लेखिका : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण
पूजा टंकसाळे सातारा on कोणी तरी असावे….