Sunday, February 9, 2025
Homeलेखअवयव दान : आपले गैरसमज दूर करा !

अवयव दान : आपले गैरसमज दूर करा !

मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीचा जीव वाचवणे हे सगळ्यात मोठे पुण्य कर्म व नैतिक कृत्य आहे याबाबत जगामधील सर्व धर्म, सर्व पंथ आणि सर्व जनसमुदाय यांचं एक मत आहे. तसेच दिव्यांगांना सक्षम करणे हे सुद्धा पुण्य कर्मच आहे.

नेत्रदान, त्वचादान, अवयवदान आणि देहदान या सर्वदानांना श्रेष्ठदान किंवा महादान म्हणून संबोधलं जातं कारण मानवाचे कल्याण करणे हे या दानांमधून शक्य होते.

या महादानांबद्दल समाजामध्ये अत्यंत अल्प माहिती असून अनेक गैरसमज आहेत. पुरेशी व योग्य माहिती यांचा अभाव आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये दरवर्षी सुमारे पाच लाख व्यक्तींचे मृत्यू होत असतात. तसेच लाखो अंधांना दृष्टी पासून वंचित व्हावे लागते. अनेक आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या व्यक्तींना मृत्युपंथाची वाटचाल करावी लागते. म्हणूनच या श्रेष्ठदानांबाबत समाजाचे प्रबोधन करणे व समाजात जागृती निर्माण करणे यासाठी कार्य करणे ही सुद्धा अत्यावश्यक गोष्ट आहे.यासाठी “दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई” ही संस्था सतत प्रयत्नशील आहे.
या संस्थेचा विस्तार जवळपास संपूर्ण महाराष्ट्र भर झालेला आहे.

समाजामध्ये जागृती निर्माण करून आणि प्रत्यक्ष हे दान घडवून आणण्यासाठी समन्वय साधून श्रेष्ठदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.
व्याख्याने, पदयात्रा, रथयात्रा, लोककलांमधून लोकजागृती, पथनाट्ये, नाटके, शॉर्ट फिल्म अशा अनेक कला व सामाजिक माध्यमातून, विविध समाज घटकांशी सतत संपर्क साधून संस्था आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटत असते.

नेत्रदान :-
अंध दोन प्रकारचे असतात. पैकी बहुसंख्य अंध व्यक्ती बुबुळामुळे आलेल्या अंधत्वाने ग्रस्त असतात. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान केल्यास, मृत्यू पावलेल्या माणसाची बुबुळे काढून अंध व्यक्तीला देता येतात. त्यामुळे त्या अंधाला दृष्टी मिळू शकते. तो अंध ही सृष्टी पाहू शकतो. असे हे नेत्रदान. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे चार अंधांना दृष्टी मिळू शकते. (वैद्यकीय संशोधनामुळे आता एका बुबुळाचे दोन भाग म्हणजे स्लाईस करून दोन अंधांना बसवता येतात.)

त्वचादान : –
याबाबत कित्येक लोकांना किंबहुना काही डॉक्टरांना सुद्धा माहिती नाही. माणसाच्या मृत्यूनंतर सहा तासाच्या आत त्या व्यक्तीची त्वचा एका विशिष्ट मशीनने काढून घेऊन ती विशिष्ट पद्धतीने साठवली जाते. या साठवलेल्या त्वचेमधून 30 ते 40 टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णाचा जीव वाचवता येतो. त्या रुग्णाच्या शरीरावर त्वरित योग्य ते उपचार करता येतात. अशी ही जीवन संजीवनी त्वचा, मृत्यूनंतर दान करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.

देहदान :-
मृत्यूनंतर देह पुरून किंवा जाळून नष्ट करण्याऐवजी तो वैद्यकीय महाविद्यालयास दान करून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा देहांचा उपयोग होतो. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देहावर काम करण्याचे चांगले शिक्षण मिळाल्यास चांगले डॉक्टर्स चांगले सर्जन तयार होतात. आपल्या पुढील पिढ्यांना असे तज्ञ उपलब्ध होतात. यासाठी आपण आपला मृतदेह मृत्यूनंतर दान करण्याचा संकल्प करू शकतो.

अवयवदान :-
एखादी व्यक्ती हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये उपचार घेत असताना मेंदू मृत झाल्यास एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या शरीरातील अनेक अवयव जसे की हृदय, यकृत, फुफ्फुसे, किडनी वगैरे अवयव त्याचप्रमाणे हाडे, कानाचे पडदे, गर्भाशय, हात असे अनेक अवयव कार्यरत असण्याच्या स्थितीत त्या मृतदेहातून काढून, अवयव खराब झाल्यामुळे मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीच्या शरीरात खराब झालेल्या अवयवां ऐवजी बदलता येतात. त्या व्यक्तीला जीवनदान देता येते. अशा अवयवदानाचा संकल्प सोडून एखादी व्यक्ती जेंव्हा मेंदू मृत्यू झाली असेल तरच फक्त, त्या व्यक्तीच्या अवयवदाना मुळे अनेक व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. अशा अवयवदानाचा संकल्प आपण करू शकतो.

जिवंतपणी अवयवदान :-
आपण जिवंत असताना सुद्धा आपल्या दोन किडन्यांपैकी एक किडनी, यकृताचा काही भाग आणि गर्भाशय हे अवयव, दान करू शकतो. जेणेकरून इतर रुग्णांच्या शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्यांना मृत्यूपासून वाचवता येते.

ही सर्व माहिती अत्यंत त्रोटक आहे. सविस्तर माहिती हवी असल्यास या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे एखादे व्याख्यान आपल्या सोसायटीमध्ये अथवा संस्थेमध्ये आपण ठेवू शकता आणि त्यांचे कडून याबाबत सविस्तर माहिती मिळवून, या बाबत असलेले गैरसमज दूर करून आपण या श्रेष्ठदानाचे संकल्प करू शकता. अनेक मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवून आपण सर्वश्रेष्ठ पुण्य मिळवू शकता.
हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करू शकता.
या पुण्यप्रद व माणुसकीच्या कार्यासाठी आपणाकडून शक्य झाल्यास देणगी रूपाने संस्थेस मदत करू शकता. या संस्थेस मिळणाऱ्या देणग्यांसाठी आयकर खात्याच्या ८० जी कलमांतर्गत आयकराची सूट मिळू शकते.

आपण अधिक माहितीसाठी पुढील कार्यकर्त्यांपैकी कुणाशीही दूरध्वनी द्वारे संपर्क करू शकता अथवा संस्थेच्या खाली दिलेल्या मेल आयडीवरही आपण संपर्क करू शकता.
श्री पुरुषोत्तम पवार (अध्यक्ष) (वसई) +919822049675
श्री सुनील देशपांडे (उपाध्यक्ष) (पुणे) +919657709640
श्री सुधीर बागाईतकर (उपाध्यक्ष) (नवी मुंबई) +919819970706
श्री श्रीकांत कुलकर्णी (सचिव) (पुणे) +918378979052
श्री प्रशांत पागनीस (सहसचिव) (पुणे) +918530085054
श्री नागराजन अय्यर (सहसचिव) (कल्याण) +919223580528
अथवा खालील ई-मेल वर संदेश पाठवावा.
organdonationfed@gmail.com
federation@organdonation.net.in

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on क्षण सुखाचे…
गोविंद पाटील on रेषांमधली भाषा : १०
प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी