“अस्तित्व“
काही गोष्टी मनात ठाण मांडुन बसतात. जरा फुरसत मिळताच आपलं डोकं वर काढतात.मग त्यावर विचार करावाच लागतो.एक छंदच मनाला जडतो व सतत त्यावरच विचार करावासा वाटतो.
मला बागकाम खुप आवडते. कोकणात घरोघरी छान झाडे झुडपं, वेली मुद्दाम लाऊन हा आनंद सहज घेतला जातो.
तिकडे घरी गेल्यावर पहिला फेरफटका झाडात जातो. कोणती जुनी, कोणती नविन कलमं हे अगदी आवडीने बघते. त्यावेळी झाडांवर ऋतुप्रमाणे अबोली ते कोरांटी अशी छान असंख्य फुले फुललेली असतात. काहींचे रंग काहींचे सुगंध, आकार, असं सौंदर्य मोहात पाडतं. प्रेमात पडायला होतं. मग ही फुलं मनात ठाण मांडुन बसतात.
रोज सकाळी ऊठल्यावर प्रथम बागेची चारी बाजूंनी प्रभात फेरी चालू रहाते. प्रत्येक फुल नविन जन्माला आलेल्या तान्हुल्यासारखं ताजं टवटववीत, प्रसन्न दिसतं. स्पर्श सुद्धा रेशमासारखा तलम.
मग वाटत रहातं हाच आनंद मंदिरात गेल्यावर देवाचे मंगल शांत धीर गंभीर दर्शन घेताना होतोच. त्याच्या चरणाचा आणि या ताज्या फुलांचा स्पर्श सुद्धा सारखाच आहे. त्या पवित्र चरणांत देवाचे अस्तित्व असेल तर मग तसाच वाटणारा हा फुलांचा स्पर्श …… इथेही देवाचे अस्तित्व आहे… नाही… असणारच.
मनात एकदा हा विचार ठाण मांडुन बसला की, सतत वेळ असेल तेव्हा तो डोकं वर काढतो. अगदी मानेभोवती वेढाच घालुन बसतो.पांच सहा वेळा मंदिरातील चरणस्पर्श आणि सकाळी ताजे फुललेले हंसरे फुल यांचे स्पर्श चांचपडत रहाते.प्रत्येकवेळी मनाला समाधान, स्वस्थता, पवित्र मंगल प्रसन्न वाटत रहातं.
आता मी निश्चित सिद्धांत … माझा माझ्या मनाशी आणि माझ्यापुरता… मांडलाय …
या झाड झुडपं, वेली, तृणे या सगळ्यात देवाचे अस्तित्व आहे. माणसात जसा आत्मा म्हणजे ब्रम्हांडाचा अल्प अंश आहे अगदी तसाच या पाना फुलात सुद्धा आहे.आपण संत तुकोबांचे अभंग ऐकतो तेव्हा, वृक्ष वल्ली आम्हा…. वनचरी. . हे त्यांनी सांगितलेलेच आहे.
जे जे सुंदर आहे तिथे साक्षात शिव म्हणजे ईश्वर आहे.हे मी माझ्यापुरते पटवुन घेतले आणि अशक्य असणारी अनेक कोडी ऊलगडली. गवतापासुन मोठ्या मोह सुरंगी अशा वृक्षांनाही ऋतुप्रमाणे रोज अनेक फुलं फुलतात.
पहाटे प्राजक्ताचा, बकुळीचा, गुलमोहर, बहावा असे अनेक फुलांचे सडे गालिचासारखे पसरलेले असतात. ती सुखणारी फुलं पण कोमेजतानाही मनाला किती आनंद देतात. काही फूलं ऋतुची चाहुल देतात. बहावा ग्रिष्मातील ऊन्हाच्या तडाखा दाखवतात तर गुलमोहर वर्षाऋतुची चाहुल सुचवतात. रानी वनी असे असंख्य वैशिष्ठ्ये घेऊन फुलं बहरत रहातात.
काहींचा बहराचा सुगंध कोकीळेला वेडं करतो तर केवड्यासारखं काटेरी झुडूप मे महिन्यात सुगंधी केवड्याच्या कणसाला जन्म देते. गावभर या केवड्याचा सुगंध पसरतो.
निळे गुलाबी कॅशिया वसंतात फुलतात. जाई जुई मोगरा, सोनटक्का अनंत तगरी सर्व चांफे वसंतात फुलतात. पांगारा लाल पांढरा दोन्ही रंगात फूलतो. याबरोबरच कुडा रात्रीची चंद्राबरोबर ऊमलणारी पांढरी कमळे हे शुभ्र रंग ऊधळतात. बरोबर सुगंधही. पांगारा देवचाफा पळस काटेसावरी ही लाल रंगात नटतात. चैत्रात झाडांना शिशिरातील पानगळतीनंतरची चैत्रपालवी फुटते. व सृष्टीच्या हिरव्या शालुवर ही रंगित नक्षी बुट्टे फार शोभून दिसतात. अक्षरश: निसर्गाची सृष्टीबरोबर रंगपंचमीच चालू असते. ही रंग गंधाची ऊधळण वर्षा, वसंत व शरदात दिसते.
मात्र सोनचाफा, गुलाब, अनेक लिली ही फुले फक्त श्रावणच रंगवतात. वर्षभर फुलून शिशिरात मात्र जूने ते टाकून नव्याची तयारी ही झाडे करतात. कोणताही शोक न करता हळू हळू पाने सुकतात. गळतात. वार्याबरोबर गिरक्या घेत जमिनीवर पडतात.हीच पाने शिशिरात असंख्य जीवांचे ऊदरभरण व थंडीत रक्षण करतात.हेच काम ग्रिष्मातले फुलांचे सडे पर्जन्य काळात करतात. काही भाग पाण्यात वहात जातो. कुजतो व पुन्हा झाडाचरणी वापरला जातो.
झुपकेदार फुलांचे सौंदर्य बघतच रहावे असे असते. एकेक कळी रोज फुलत जाते व झुडपाची शोभा वाढवते.
किती प्रकारची फुले .. किती आकारात.. किती रंगात.. कशी कशी फुलतात. रंग गंध यातुन मन प्रसन्न करतात.डोळे मिटून घेतले तरी हाताला फुल त्याचा सुवास सहज समजतो.
काही फुलांना स्पर्शही करू नये असं वाटतं इतकी नाजुक अळुमाळू असतात. कोमलतेची परिसीमाच असते. जणू तान्ही अबोध बालिका.! काहींना रंगच ठसठशीत दिलेत गोकर्णाचा घननीळ रंग, इलुशा गुलबक्षीचे रंग, इतकंच काय पण रस्त्याच्या कडेला असणार्या घाणेरीचे रंग मन खेचून घेतात.
रातराणी इतकीशी पण रात्रभर सुगंध वाटताना थकत म्हणुन नाही. रंगहीन बकूळ! पण सुकली तरी सुवास कायमच.भरगच्च झेंडूचे सौंदर्य दारावरच्या तोरणात किती शुभ मंगल वाटते.?शेवंती अबोली कण्हेरी हारात गजर्यात अधिक शोभतात.
जंगलात अजुनही अनोळखी फुलं फुलत रानाच़ं सौंदर्य वाढवतात.
किती प्रकारची ही फुलं रोज फुलतात. आपल्या असण्याची हंसुन जाणिव देतात. संध्याकाळी कोमेजत झाडावरून गळुन पडतात.
आवाज नाही… दु:ख नाही.. शोक, वेदना नाहीत.. तिथेच ऊद्या परत फुलायचा हट्ट नाही. रोज नव्या ऊत्साहात झुडपे फुलतात व तितक्याच शांतपणे फुले ओघळतात.
असेल निरोप देताना .. घेताना दोघांनाही.. पण ईश्वरच तो साक्षात तिथे असेल तर !
हंसुन ऊमलायचं… दुसर्यांना हंसवायचं… आपणहुन विसर्जित व्हायचं हा त्याचाच निसर्ग नियम सर्वच सजीवांना लागू होतो. मोह लोभ, आसक्ती बिलकूल नाही.
मी या सर्व फुलांशी मायेने पावित्र्यासह स्पर्श करते. माझ्याठाई तेव्हा मी मंदिरात देवाच्या चरणाशी नतमस्तक असते. लीन होते. मी फुलांशी माझे मन मोकळे करते. सुखदु:ख सांगते. माझ्या भावनांशी ती फूले समरस होतात हे जाणवते. मला सोबत करतात. धीर देतात. मार्ग दाखवतात. मनात खुप ऊत्कटता दाटून येते.
खरंच देवाने अनेक ठिकाणी असे स्वत:चे अस्तित्व दाखवुन दिले आहे.विज्ञान प्रगती त्यात कोणतीच ढवळाढवळ करू शकत नाही.फक्त गुलाबाला गुलाबाचेच फुल का येते हे विज्ञान सिद्ध करेल पण म्हणुन झाडावर गुलाब नाही फुलवू शकणार. तिथे ईश्वराचाच अंश हवा असणार. प्रत्येक फुलात देवाचे अस्तित्व असेल तर त्याची नजाकत, पावित्र्य, सौंदर्य तितक्याच मंगलतेने अनुभवलं पाहिजे नाही का ?
ही माझी श्रद्धा आहे. शेवटी फुलही आपल्याला वैराग्यच शिकवते. ऊमलायचं… बहरायच़, इतरांना आनंद देत आपलं अगदी अल्प असं आयुष्य मजेत जगायचं आणि कोणताही मोह लोभ आसक्ती न ठेवता गळुन पडायचं. शेवटी वैराग्यच .वैराग्य म्हणजेच शिवाचा साक्षात्कार.
— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
फुलांचा राजा गुलाब म्हणतात . या राजाची सर्व प्रजा ताईंनी खूप सुंदर रीतीने लेखन रेखाटली आहे.
गोविंद पाटील सर जळगाव.