Homeयशकथाझेप :17

झेप :17

डॉ विजया वाड

विजया वाड यांची ‘माझी गोष्ट !’

प्रतिभा सराफ : विजयाताई, बालपणापासून आपण साहित्य क्षेत्राकडे वळलात. दिवस मावळायच्या आत कमीत कमी पाच पानं आपण नित्यनियमाने लिहिता. यात सातत्य आहे. तर स्वाभाविकपणे माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही साहित्याकडे कसे वळलात?, तुमचे प्रेरणास्त्रोत काय आहेत ?

डॉ. विजया वाड : माझी मोठी बहीण रजनी लिमये ही माझी आदर्श होती. तिने लोकोत्तर खूप काम केलं. ती आता जगात नाही. माझ्या आईची मोठी बहीण; प्रभूमावशी जी बोलता बोलता सहज कविता करायची. त्यामुळे आईकडून हे सगळं माझ्याकडे आलं. नंतर जसं जसं लिहीत गेले तसं तसं त्या लेखनाला पसंती मिळत गेली. वाचकांचं खूप प्रेम मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्रांमध्ये कॉलम लिहायला कोणालाही आवडत नाही पण ते काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. आजही मला कॉलम लिहायला आवडतं त्यामुळे तुमच्या हातून नियमितपणे लिहिलं जातं. रोज पाच पानं मी लिहितेच ! आज सातत्याने चाळीस वर्ष लिहीत आहे. या लिखाणामुळेच माझी खूप पुस्तकं प्रसिद्ध झाली. त्याची संख्या जवळजवळ एकशे बावन्न झाली आहे. मला खूप आनंद वाटतो. मागे वळून बघितलं की असं वाटतं आपल्या हातून जे लिहिलं गेलं, जी साहित्य शारदेची सेवा झाली, माणसांचं प्रेम मिळवता आलं यामुळे या वयात कृतज्ञ वाटतं आणि हेही सांगायला आवडेल की अजूनही मी लिहीतच आहे !

कोरोनाच्या काळामध्ये विचित्र संकट आलं. वृत्तपत्रांच्या पुरवण्या बंद झाल्या. वृत्तपत्रच येईनाशी झाली. ‘नवशक्ती’, ‘सामना’, ‘पुण्यनगरी’, ‘लोकमत’मध्ये लिहीत होते. ‘नवशक्ती’ या वृत्तपत्रात जवळजवळ चाळीस वर्षे लिहीत आहे. त्याच्यात कधीही खंड पडला नाही. या लिखाणाचा आनंद मला मनमुराद मिळाला आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी मी खाडीत पडले. दीड वर्ष माझ्या पायामध्ये लोखंडी बूट होता. मला गुडघा वाकवता येत नव्हता त्यामुळे खेळायला जाता येत नव्हतं तेव्हा आईने मला मोठ्या मोठ्या टाईपची पुस्तकं आणून दिली. मी त्या वयातच वाचायला शिकले. आधी आई वाचून दाखवायची मग मी वाचू लागले. बाराव्या -तेराव्या वर्षापर्यंत मी सबंध ‘साने गुरुजी’ वाचून संपवले होते. पुढे सतराव्या- अठराव्या वर्षापर्यंत ‘वि. स. खांडेकर’ वाचून संपवले. तरुण वयात ‘ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या’ वाचल्या, ज्यात प्रेम व्यक्त केलेलं असायचं. त्या काळामध्ये आतासारखा मोकळेपणा नव्हता. पुस्तकात काही प्रणयप्रसंग असले की ते मी बाथरूममध्ये जाऊन वाचत असे. आता त्या दिवसांची मला गंमत वाटते. असं वाचता वाचता लिहिता लिहिता वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली, ज्याचे नाव ‘वजाबाकी’ आणि ती कादंबरी पु. वि. बेहरे यांनी प्रकाशित केली. ‘माहेर’, ‘मेनका’ या मासिकांमध्ये मी लिहीत असे. संपादकांनीच म्हटलं की मला तुमच्या कादंबऱ्या छापायला आवडेल, तर त्या वयात किती छान वाटलं. आपलं लिखाण लोकांना आवडतंय, हे पाहूनच माझ्या लिखाणाला खरी सुरुवात झाली.

प्रतिभा : आपल्या सहजीवनाची सुरुवात नेमकी कधी आणि कोणाबरोबर झाली ?

विजया : वयाच्या तेराव्या- चौदाव्या वर्षी मुली आरशात बघतात तसं मीही बघायचे. प्रत्येकीच्या स्वप्नात एक राजकुमार असतो. आमच्या वेळेस तो घोड्यावरून यायचा. तुमच्या वेळेस स्कूटरवरून येत असेल! आताच्या मुलींच्या मनातील राजकुमार हा चार चाकी वाहनातून किंवा विमानातून येत असावा… पण राजकुमार येतोच! मग जो कोणी त्यावेळेस राजा आपल्या आयुष्यात येतो त्याच्यासोबत आपण नेटाने संसार करतो, तसं विसाव्या वर्षी लग्न झालं. तेव्हाच मी ठरवलं की आपण आपल्या पतीपासून काहीही लपवायचं नाही. मी त्यांना म्हटलं की मला एक मुलगा आवडत होता. त्याचा फोटो आहे माझ्याकडे. तर ते म्हणाले की एवढंच ना? आता त्याचा फोटो काढ आणि माझा फोटो ठेव तिथे. असं मोकळं नातं आमच्यात होतं. आम्ही एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही असंच ठरवलेलं होतं.
हे भारतीय सैन्यात होते म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं होतं. आपला नवरा कॅप्टन आहे आणि तो भारत-पाक युद्ध लढला आहे आणि त्याला राष्ट्रपतींचं रक्षा मेडल आहे, याचा मला अभिमान वाटायचा.

प्रतिभा : तुम्ही जवळजवळ छत्तीस वर्ष अध्यापन केलंत. तुमच्या विद्यार्थ्यांचे काही अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील.

विजया : लग्नानंतर प्राजक्ताचा जन्म झाला मग मी म्हटलं की आपल्याला दुसरं आपत्य होऊ दे कारण मला पुढे करिअर करायचं आहे. मला अगदी करिअरचे डोहाळे लागले होते. मला शिक्षण पूर्ण करायचं होतं. करियर करायचं होतं. मी बीएससी झालेले होते पुढे एम. ए., बी. एड., पीएचडी हे सर्व सासूबाईंच्या जीवावर केलं. मग अध्यापनाला सुरुवात झाली. विक्रोळी येथील उदयाचल हायस्कूलच्या ‘गोदरेज’मधल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगते. मुलींना सारखं आरशात बघावसं वाटतं, अशा वयातील माझी एक मुलगी कृष्णा होती. मी निबंधाचा विषय दिला होता- ‘मी हुंडाबळी होणार नाही.’ तर या मुलीने दोनच ओळींचा निबंध लिहिला होता म्हणून माझ्या लक्षात राहिला.

माझं मुळी लग्नच होणार नाही मग हुंडाबळी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चौदाव्या- पंधराव्या वर्षी असं एका मुलीने लिहावं, याचं मला खूप वाईट वाटलं. मी तिला माझ्या ऑफिसमध्ये बोलावलं. तिला विचारलं की असं का वाटतं तुला की तुझं लग्न होणार नाही? सगळी लग्न रंगाशी होत नाहीत, बाळ. काही कर्तुत्वाशीही होतात आणि समजा नाही झालं तुझं लग्न तर लग्न ही का आयुष्याची इतिकर्तव्यता नाहीये. तू कर्तुत्व गाजव. काळ्या रंगाचा उगाच बाऊ करू नकोस. मी तिच्या घरी गेले. तिची आई म्हणाली, काय करणार? कोणी आलं की विचारतात, आई गोरी आहे. वडीलही गोरे मग गोऱ्या आईवडिलांची ही मुलगी कशी काय काळी? मी त्यांना समजावून सांगितले की यात तिचा काय दोष? कोणीतरी आजा, पणजा, आजी, पणजी कोणीतरी असेल ना काळी म्हणून ती काळी झाली. जन्माला येताना आपल्याला रूप, रंग, घर आणि बुद्धीसुद्धा मागून मिळत नाही, मिळेल ते घेऊन यावं लागतं. पण ती बुद्धी आपल्याला वाढवता येते, हे तिच्या आईला समजत नव्हतं. तिची आई लगेच डोळ्यातून टिप्प गाळायला लागली. कुठे गेलं की लोक म्हणतात ही कशी काळी ? मी म्हटलं, लोक काहीही बोलतील, तुम्ही का लक्ष देता ? तुम्ही आपल्या मुलीला समजावून सांगा की तू जशी आहेस तशीच मला प्यारी आहेस ! तिच्याबद्दल बोलणारे हे लोक तिला खायला घालतात? तुम्ही तिच्याबद्दल चर्चा केलेली मला आवडणार नाही, असे ठाम सांगा तर त्या म्हणाल्या, अगं बाई हे माझ्या लक्षातच आलं नाही की आपणही हे बोलू शकतो! म्हणजे त्या आपल्याच दुःखात चूर होत्या. माझी ही कृष्णा असलेली मुलगी पुढे व्ही. जे. टी. आय.ला गेली आणि इंजिनीयर झाली. एका सुंदर गोऱ्यापान मुलाशी तिचं लग्न झालं. आपल्याला जे रूप मिळालंय, जो रंग मिळालाय, जे गुण मिळालेत ते घेऊन आनंदाने पुढे चला, हे प्रत्येक मुलामुलीला माझं सांगणं असतं.

मला खरं तर सगळ्यांना सांगावसं वाटतंय की आपली मुलं काळी असो, नकटी असो, जाडी असो, बुटकी असो… त्याना कधीही अशा तऱ्हेने दुखवू नका. तुम्ही जर त्यांना विश्वास दिलात तर ती अधिक आत्मविश्वासाने जगतील. आईनेच मुलांना विश्वास दिला पाहिजे. ज्या विषयात गती असेल तिथे त्यांना प्रगती करू द्यायला हवी. ते जर चांगले खेळाडू असतील, चांगला स्वयंपाक करू शकत असतील तर त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी मुलामुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत. Your Face is not your Fortune! सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि तो कर्तुत्वापाशी थबकतो. तर मी तिला सांगितले की सगळ्या लोकांना जरी आपण आवडलो नाही तरी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवे. अवगुणांपेक्षा गुणांचा गुणाकार करायला शिका आणि आयुष्यातील दुःखाचा भागाकार करायला शिका. शेवटी आपलं आयुष्य आपल्याला जगायचं असतं म्हणून मी माझ्या लिखाणात नेहमी सकारात्मकता ठेवते. मुलांना खूप आत्मविश्वास देते. काम करतानासुद्धा तेच करते.

एक मुलगा होता त्याला एस. एस. सी.ला कमी मार्क्स होते. त्याला एकाही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नाही, मला याबद्दल अतिशय वाईट वाटलं. तो रडत रडत माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला म्हटलं की तू शाळेच्या कॅम्पला आला होतास तेव्हा तू खिचडी खूप छान केली होतीस तर तू हॉटेल व्यवसायाकडे वळ. तर तो म्हणाला ‘हॉटेल मॅनेजमेंट’ला जाण्यासाठीसुद्धा मार्कांची गरज असते. मग मी त्याला म्हटलं की तू हॉटेलमध्ये कूक म्हणून जा. त्याला पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तो कूक झाला. त्यानंतर मी एकदा दुबईला एका हॉटेलमधे गेले होते. माझ्या पुढ्यात खिचडी आली. मी विचार केला, हा भारतीय पदार्थ कसा काय माझ्यासमोर आला? मान वर करून पाहिलं तर काय, एक एप्रन घालून तरुण माझ्यासमोर उभा होता. तो म्हणाला की मी आता ताज हॉटेल सोडून दुबईला आलोय आणि हे माझं हॉटेल आहे. मी स्वतःच इथला मास्टर शेफ आहे आणि तुम्ही दिसल्यामुळे मी ही खिचडी आणली. मला त्याचं इतकं कौतुक वाटलं. पुढची गंमत म्हणजे तो म्हणाला की माझ्या बायकोला तुम्ही माहीत आहात. मी तुमच्याबद्दल तिला सांगितले आहे. तो मला त्याच्या घरी अतिशय आग्रहाने घेऊन गेला. त्याच्या घरी गेल्यावर, “तू नेहमी कौतुक करतोस त्या वाडबाईंना मी कसं ओळखणार नाही ?” अशी त्याची बायको सहज म्हणाली. दुबईला शाहरुख खानच्या बंगल्याशेजारी त्याचा बंगला आहे. मला त्याचं खूप कौतुक वाटतं.
त्यामुळे मला पालकांना सांगायला आवडेल की जर तुमच्या मुलांना एखादी गोष्ट अतिउत्तमरित्या येत असेल तर त्यावर विश्वास ठेवा. त्याला त्या क्षेत्रामध्ये कर्तुत्व गाजवू द्या. कोणतीही गोष्ट कमी प्रतीची असत नाही. अशा तऱ्हेने उत्तम शेफ असलेला माझा एक विद्यार्थी, आज हॉटेलचा मालक झाला आहे.

अजून एका मुलीची गोष्ट सांगते. आपण प्रार्थनासभेत काही गोष्टी सांगत असतो तसं मी बापूजींच्या आश्रमात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिच्या हातून एक टाचणी हरवली, तर ते म्हणाले की आपला देश इतका गरीब आहे, इतका गरीब आहे की आपल्याला ते परवडणार नाही. ती म्हणाली की बापू, मी यापुढे कधी काही देशाचं नुकसान होऊ देणार नाही.
ही गोष्ट सांगून झाल्यावर मी मुलांना म्हटले की आपला देश इतकी वर्ष झाली तरी अजून गरीबच आहे. तुम्ही देशाचं नुकसान होईल असं कधी काही करू नका. समोर अत्यंत ग्रहनशील अशी पाचवी ते सातवी इयत्तेची मुलं होती. त्यांनी ते मनावर घेतलं.

उदयाचल हायस्कूलमध्ये दोन ते दोन वीस, चहासाठी सुट्टी असते. मुलं खूप गोंधळ घालतात म्हणून त्या चहाच्या सुट्टीमध्ये मी राऊंड घेत असे. मी राऊंड मारून दोन वीसला माझ्या खोलीत आले. तेव्हा आमच्या चहावाल्या बाई एका पाचवीतल्या चिमुकल्या मुलीचा हात धरून उभ्या होत्या. मी म्हटलं काय झालं? तर ती मुलगी म्हणाली की ज्यांनी माझा दंड धरलाय ना, त्यांनाच विचारा. मी त्यांना विचारलं, बाई काय झालं? त्या म्हणाल्या की ही मुलगी तुमचा चहा प्यायली. मी म्हटलं काय गं, तू माझा चहा प्यायलीस? ती म्हणाली की हो, देशाचं नुकसान व्हायला नको म्हणून मी चहा प्यायले. मी वर्गाची मॉनिटर आहे. मधल्या सुट्टीनंतर भूगोलाचा तास असल्यामुळे मी इथं मॅप घ्यायला आले होते. तेवढ्यात या आल्या. त्यांनी टेबलावर चहा ठेवला त्या म्हणाल्या की बाई दर दिवशी चहा प्यायच्या येळेला जातात. चहा थंड व्हतो. मग तो नेशनल वेस्ट.
‘नॅशनल वेस्ट’ म्हणजे देशाचं नुकसान ना…! असं त्या तुमच्याबद्दल म्हणाल्या तर ते मला नाही आवडलं. म्हणून मी पिऊन टाकला. तर त्यात काय चुकलं ?
ते ऐकून मी तिला म्हटलं की, “तुझं नाही बाळ, माझंच चुकलं. उद्यापासून रोज मी चहा पिऊनच राऊंडला जाईन.”
तर अशी मुलं इतकी संवेदनक्षम असतात की तुम्ही जे सांगाल ते त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं.

अजून एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे. आम्ही शाळेच्या मुलांना घेऊन येऊरला गेलो होतो. डोंगरावरून खाली उतरताना मुलं धावत उतरत होती तेव्हा एक मुलगा गडगडत खाली पडला. त्यात त्याचा हात मोडला. मग मी त्याला म्हटलं, कशाला रे इतकं धावायचं? तुझा हात मोडला बघ. माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण विद्यार्थी आपली मुलंच असतात. याने खरं सांगितलं नाही. पण त्याच्या मागच्या येणाऱ्या मुलाला इतकं अपराधी वाटलं की त्यानं खरं सांगितलं की त्यानेच ढकललं म्हणून. तर हा म्हटला, “नाही बाई, मीच दगडाला अडकून पडलो.” म्हणजे इतकं प्रेम, हात मोडला त्या मुलाचा आणि तो कायमचा अधू झाला पण मित्राला दोष दिला नाही इतकं ते मित्र प्रेम होतं. नंतर एक अशी घटना झाली की हा विद्यार्थी हुशार होता पण गरीब होता. नंतर जेव्हा कामावर लागायची वेळ आली त्यावेळेला बाकी सगळ्यांचे इंटरव्यू झाले पण याचं सिलेक्शन झालं. कारण सिलेक्शन करण्यासाठी हाच मित्र म्हणजे ज्याने याला ढकललं तोच समोरच्या खुर्चीवर बसलेला होता. त्यानं आपल्या मित्राला लक्षात ठेवलं. ती नोकरी दिली. म्हणजे कुठेतरी माणूस ऋण फेडतो तो या जन्मातच, तशी ती मैत्री अभंग राहिली त्या मैत्रीच्या, हुशारीच्या, सच्चाईच्या बळावर! तर अशा काही गोष्टी कायम आपल्या हृदयात राहतात.

एका विमान प्रवासाची आठवण सांगते. माझा अजून एक विद्यार्थी पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये आला. तो पायलट होता. तो माझ्यापाशी आला. मला हस्तांदोलन केलं आणि विमानात चढल्यावर सहप्रवाशांना म्हणाला, “She was my teacher. She taught me Chemistry and she was my best teacher !”, असं म्हणून त्यानं मला एक कडक सॅल्यूट केला तेव्हा मला अगदी लाजल्यासारखं झाल. सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. विमान उडू लागलं आणि नंतर दोन मुलं आली. मला वाटलं, हेपण आपले विद्यार्थी आहेत की काय? पण ते माझे विद्यार्थी नव्हते. ते म्हणाले, सरांनी तुम्हाला बिझनेस क्लासमध्ये प्रमोट केलंय. पायलट साहेबांची तशी इच्छा आहे. अशाप्रकारे मी बिझनेस क्लासमध्ये गेले. माझं साधं ऑर्डनरी क्लासचे तिकीट होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा वळून बघितलं तर माझ्याशेजारी करीना कपूर बसलेली होती. करीना कपूरच्या शेजारी बसण्याचा योग जुळून आला. ती गोव्याची ट्रिप मी कधीच विसरणार नाही. विद्यार्थी आपल्याला वरदान असतात. जगात जिथे जावं तिथे आपल्याला भेटतात. अगदी लहानपणीसारखंच वाकून नमस्कार करतात. शाळेतले विद्यार्थी फार प्रेम करतात.

माझ्या ऐशी वर्षाच्या इंग्रजी शिकवणाऱ्या कटककर बाई मला एकदा रस्त्यात भेटल्या होत्या तेव्हा मी त्यांना तसाच वाकून नमस्कार केला होता. मॉडर्न हायस्कूल, पुणे येथे शिकवणाऱ्या या बाईंच्या केसात नेहमी गुलाबाचे फुल माळलेलं असायचं. जी उत्तम वाचन करेल तिला ते फूल मिळायचं. ते गुलाबाचे फूल आपण पटवायचं अशीच सगळ्यांची अहमहमिका असायची. त्या मला नेहमी म्हणायच्या, “सारखं तूच वाचणार का? आणि सारखं तुलाच गुलाबाचं फुल द्यायचं का? दुसऱ्यांना पण वाचू दे.” अशी वेडी स्पर्धा असे.

प्रतिभा : तुम्ही एका विद्यार्थिनीला घरी घेऊन आला होतात, ती गोष्ट सांगाल का ?

विजया : त्या मुलीचं नाव शुभांगी ठाणेकर.
माझं लग्न झालेलं होतं तेव्हाची गोष्ट. सैन्यात असलेले माझे पती तेरा दिवसांनी कामावर रुजू झाले. त्यामुळे मला अजिबात करमेना. मी ‘श्रद्धानंद महिलाश्रमा’मध्ये जात असे. तिथे मी मुलींना शिकवत असे. माझं अक्षर चांगलं होतं, गणित आणि मराठीही चांगलं होतं त्यामुळे तिथे मी शिकवण्यासाठी जायचे. तिथली एक मुलगी मला खूप आवडायची. तिचं नाव शुभांगी. ती म्हणायची, सगळ्यांना नाव आहे पण मला आडनावसुद्धा आहे. शुभांगी ठाणेकर. मला माझी आई कुठे आहे, हे बघायचं आहे. तर ते मी रजिस्टरमध्ये शोधलं. ती ठाण्याला सापडली होती म्हणून तिचं आडनाव ठाणेकर असं होतं. मला खूप वाईट वाटलं. मी तिला म्हटलं, सांग मी तुझ्यासाठी काय करू, शुभांगी? तर ती म्हणाली, एक दिवस मला तुमच्या घरी घेऊन जाल का? मी लगेच ‘होय’ म्हटलं. मी माझ्या सासूबाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, घेऊन ये की तिला! मग त्यांनी स्वतःच छान
स्वयंपाक केला खीरपुरी. ती जेवली आणि म्हणाली, खीरपुरी छान झाली आहे. सासूबाई म्हणाल्या, तुझ्या बाईंना स्वयंपाक काही येत नाही म्हणून मीच केला आहे तर ती म्हणाली, छान झाली आहे आणि असं चार वाजेपर्यंत सगळं छान छान झालं. आता माझे डोळे सारखे घड्याळाकडे जाऊ लागले कारण सहा वाजता तिला अनाथाश्रमात पोचवायचं होतं. कल्याणहून जायचं म्हणजे निदान साडेचारला तरी निघायला हवं होतं. तिला नवा फ्रॉक दिला होता, आमच्याकडे आल्यावर. ती तो काढायला लागली. मी म्हटलं, अगं तो तुलाच दिलाय. आजोबांनी तुझ्यासाठीच आणलाय. मग आजोबांनी तिला विचारलं, तुला काही आठवतंय का? तर ती म्हणाली, मला काहीच आठवत नाही. एका महानगरपालिकेच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात निबंध लिहिला तर त्याला पहिलं बक्षीस मिळालं म्हणून मला बाई इथं घेऊन आल्या. बक्षीस म्हणून कुठला निबंध लिहिला होता, असं तिला विचारताच म्हणाली, ‘माझी आजी.’ माझ्या आजीवर कसा निबंध लिहिलास तू? असं आजोबांनी विचारल्यावर ती म्हणाली, आश्रमामधल्या बाई कशा दिसतात त्यांना बघून लिहिला. त्यांचं साडी नेसणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा स्वभाव. पण आजोबा, निबंधाच्या शेवटी खरं लिहून टाकलं. मला आईच नाही तर आजी कुठून येणार? माझं घरच मुळी देवाकडून येताना हरवून गेलंय, असं ती चिमुकली म्हणाली. हे सांगतानासुद्धा आता मला हळवं व्हायला होतंय. आजोबा तिला म्हणाले की अगं, एवढा वेगळा निबंधाचा शेवट कोणाचाच नसणार, अख्ख्या मुंबईत बरं का त्यामुळे तुला पहिलं बक्षीस मिळालं तर ती म्हणाली, माहीत आहे. आश्रमात आम्हाला सहा वाजायच्या आत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही निघालो. मी तिला पोहचवून घरी आले. त्यानंतर तिने कधी हट्ट केला नाही की मला घरी घेऊन जा वगैरे.

ठाण्याला ‘तलावपाळी’ म्हणून तलाव आहे. माझ्या मुली सात-आठ वर्षांच्या होत्या. मी त्यांना बोटिंग करायला तलावपाळीवर घेऊन गेले होते तर काठावरती एकदम कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर एक मुलगी म्हणाली, “ओळखलंत का बाई ? मी कसं ओळखणार ? बराच काळ लोटला होता. ती म्हणाली, “मी शुभांगी ठाणेकर.” ही तीच मुलगी होती पण आता ती चांगली मोठी झाली होती. तिच्यासोबत अडीच वर्षांची मुलगी होती. मी तिला म्हटलं, लग्न केलस का गं ? तर ती म्हणाली, नाही. या मुलीला आश्रमातून दत्तक घेतली. मला ठाण्याला भगवानराव पटवर्धनांनी नोकरी दिली. मग मी स्वयंसिद्ध झाल्यावर एक खोली घेतली आणि या मुलीला दत्तक घेतली. तिला तिचं घर, आईवडील काही कळायच्या आतच मी तिला दत्तक घेतली कारण आश्रमात प्रत्येक मुलीला कॉमन छप्पर नको असतं. तिला स्वतःचं घर हवं असतं. मला पण लहानपणी किती वेळा तुला विचारावसं वाटलं की आई, मी इथे राहू का गं ? पण कधी धीर झाला नाही.
तू ‘नाही’ म्हटली असतीस तर…? तिचे हे बोल ऐकून मला इतकं भरून आलं. म्हटलं, माझ्यापेक्षा ही मुलगी खूप मोठी आहे कारण कर्तुत्व वयावर अवलंबून नसतं. कर्तुत्व तुमच्या कार्यावर अवलंबून असतं. तशी ही मुलगी… माझ्यापेक्षा खूप मोठी होती. शुभांगी ठाणेकरला शंभर पैकी एकशे दहा मार्क देते माणुसकीमध्ये कारण ती मला म्हणाली असती की आई, मी इथेच राहते तर ते शक्य झालं असतं का, माहीत नाही या सासुरवाशीनीला पन्नास- बावन्न वर्षांपूर्वी. तर अशी ती ‘शुभांगी ठाणेकर’ची गोष्ट.

प्रतिभा : अगदी हृदयस्पर्शी गोष्ट आहे शुभांगी ठाणेकरची. आता तुम्ही तुमच्या मुलींच्या गोष्टी सांगा.

विजया : लग्नानंतर निशिगंधा आणि प्राजक्ता या दोन मुली झाल्या. माझे यजमान एकुलते एक आहेत तरीही माझ्या सासूबाईंनी कधीही आग्रह केला नाही की अजून एक चान्स घे म्हणजे मुलगा होईल म्हणून!, हे खूप विशेष आहे कारण पन्नास- बावन्न वर्षांपूर्वी असा कोणी विचार केला तर तो खूप कौतुकास्पदच होता. त्यानंतर त्यांनी मला शिकू दिलं, हे खूप महत्त्वाचं आहे. मला बी.एड. करायचं होतं तेव्हा माझ्या दोन्ही मुली दोन-तीन वर्षाच्या होत्या. इतक्या लहान आणि किरकिऱ्या मुली कोण सांभाळणार? माझे सासरे म्हणाले की अजिबात बी.एड. शिकण्याची गरज नाही. मी म्हटलं, आता नाही शिकायचं तर केव्हा शिकायचं ? पंचविशीनंतर नोकरी लागणार नाही. ते म्हणाले की मी तुझ्या फी साठी पैसे देणार नाही. ते त्यांच्या हातात होतं. मी काही मिळवती नव्हती. तेव्हा माझ्या नवऱ्याची प्राज्ञा नव्हती, वडिलांसमोर काही बोलण्याची की मी ती भरेन म्हणून, ते सैन्यात कॅप्टन होते तरीही! माझ्या सासूबाई म्हणाल्या की तुझ्या आईनं लग्नात दिलेली चांदीची भांडी आहेत ना, ती मोड आणि भर तुझी फी. त्याच्यावर सासर्‍यांचा हक्क नाहीये. त्या पुढे म्हणाल्या की मला शिकता आलं नाही पण तू शिक. ज्या दिवशी मला अ‍ॅडमिशन घेण्यासाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं त्या दिवशी सासूबाईंना ताप होता तर त्या म्हणाल्या की आजच्या दिवशी तू मुलींना घेऊन जा. मग मी दोन आणि तीन वर्षांच्या मुलींना घेऊन कल्याणपासून व्हिटीच्या एस.टी. कॉलेजमध्ये गेले गेले. इंटरव्ह्यूला तेव्हा प्राध्यापक व्ही. व्ही. चिपळूणकर होते. शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं आणि महत्त्वाचं नाव. आज सर हयात नाहीत. सरांनी जेव्हा मला आत बोलवलं तेव्हा मी
माझ्या दोन्ही मुलींना बाहेरच्या बाकावर बसवलं आणि त्यांना म्हटलं की इथंच देवासारखं बसायचं. आईचा इंटरव्ह्यू झाला की आई बाहेर येईल. इंटरव्ह्यू फार वेळ चालत नाही मला माहीत होतं. झुलता दरवाजा होता. मी आत गेले तर सर माझ्याकडे बघून हसत होते. माझा इंटरव्ह्यू काय हास्यास्पद होतोय का, मला काही कळेना. तर मी बाजूला वळून बघितलं तर माझ्या दोन्ही मुली माझ्या शेजारी राम- लक्ष्मणासारख्या उभ्या होत्या. ते म्हणाले, “यांना घेऊन कॉलेजात येता येणार नाही.” माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी रडत होते. मी त्यांना म्हटलं की यांना माझ्या सासूबाई सांभाळणार आहेत पण आज अशी परिस्थिती आहे की सासूबाईंना फणफणून ताप भरलेला आहे आणि यांना सांभाळणायला घरी आणखी कोणी नाही. मला तुम्ही घ्या. मी पहिली येऊन दाखवील. असं तिरमिरीत मी म्हटलं तर सर म्हणाले, दिली तुला ऍडमिशन! आणि मी पहिली आले. मला ‘मोस्ट पॉप्युलर टीचर्स’ अवॉर्ड मिळालं. मला चांगल्या शाळेमध्ये नोकरी मिळाली. जेव्हा एखादी स्त्री एखादी गोष्ट मनाशी पक्की करते तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
आपल्या सुनेमध्ये कर्तुत्व असेल तर सासूबाईंनी ते बहरण्यासाठी प्रयत्न करावा, असं मला इथं नमूद करायचं आहे. माझ्या सासूबाईंमुळे मी खूप काही कमावलं आहे. आयुष्यामध्ये लग्नानंतर नऊ वर्ष मी शिकत होते. माझ्या मुलींना त्यांनी विनातक्रार सांभाळलं. त्यांचे शतशः उपकार आहेत माझ्यावर. आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच आहे.

मला दोन मुली आहेत. प्राजक्ता आणि निशिगंधा. प्राजक्ता डॉक्टर आहे. तिनं भारतात जी. एम. एस. केलंय आणि नंतर यु. एस.ला जाऊन एम.डी. केलंय. तिनं तिचा राजपुत्र स्वतःच शोधला डाॅ. अभिजीत देशपांडे. दोघेही अतिशय सुखाने संसार करत आहेत. ती ‘निद्राविकार तज्ञ’ म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे आणि त्यांना दोन राजपुत्रही झाले आहेत. दोघेही मेडिकलला आहेत. त्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे.

दुसरी निशिगंधा. तिच्या अभिनयामुळे, तिच्या लेखणीमुळे, व्याख्यानांमुळे महाराष्ट्रातल्या पुष्कळ लोकांना ती माहीत आहे. ताईचं लग्न झाल्यावर निशिगंधाने लग्नाचा निर्णय घेतला. दीपकचं निशिगंधावर खूप प्रेम होतं. व्हिल साबणाची जाहिरात दोघांनी एकत्र केली होती. निशिगंधाचे शिक्षण होईपर्यंत तो तिच्यासाठी थांबला. प्राजक्ताचे लग्न झाल्यावर त्याच्या पुढच्या महिन्यात निशिगंधाने लग्न केलं. निशिगंधा म्हणाली की ताईचं लग्न खूप थाटात केलंय तर तुझा खूप खर्च झालाय तर मी मंगेशीच्या मंदिरात लग्न करेन. मग तिनं मंगेशीच्या मंदिरातच पंचवीस आप्तेष्टांच्या समोर लग्न केलं. निशिगंधाची मुलगी ईश्वरी. तिचं आणि माझं खूप घट्ट नातं आहे. आठवड्यातून एकदा तरी आम्ही एकमेकींना भेटतो. We share best of secrets with each other. मुलीपेक्षा नात जवळची होते तशी ती आहे. तिच्यापाशी मी सगळी सुखदुःख शेअर केलेली आहेत त्याप्रमाणे तिनंही माझ्याशी शेअर केलेली आहेत. उत्तर आयुष्यात एकटेपणा जाणवतो तसा जाणवत नाही कारण निशिगंधा आणि ईश्वरी इथे आहेत. प्राजक्ताशीही या नव्या जगामुळे, व्हिडिओ कॉलवर बोलता येतं त्यामुळे नातवंडांनाही सहज पाहता येतं. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळे खूप बरं वाटतं. आता आयुष्यात ‘काही राम राहिला नाही.’ असं उगाचच काही वाटत नाही. एकटेपण जाणवत नाही.

प्रतिभा : खरंतर लग्न झाल्यावर, मुलीच्या कमाईवर माहेरचा अधिकार नसतो. पण कधीकधी सासरची परिस्थिती खूप चांगली असते आणि माहेरची आर्थिक परिस्थिती गरिबीची तरी त्या कमवत्या मुलीला आपल्या माहेरी कोणतीही आर्थिक मदत देता येत नाही. याविषयी तुमच्या मुलींचे विचार जाणून घ्यायला आवडतील.

विजया : प्रतिभा, तू इतका छान प्रश्न विचारला आहेस की त्याचे उत्तर द्यायला मनापासून मला आवडेल. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की माझ्या दोन्ही मुली मला पेन्शन देतात. आमची परिस्थिती खूप चांगली आहे आणि खरंतर मुलींकडून कोणतीही अपेक्षा नाही. तरीही त्या देतात. त्या म्हणतात की आमच्या हाताला सवय असू दे. जसे आमचे सासू-सासरे तसे आमचे आईवडील. शिवाय आमच्या नवऱ्यानांही हे माहीत असू दे की जशी त्यांची जबाबदारी तशी यांचीही जबाबदारी. म्हणूनच आम्ही तुला जे देतो ते तू आमच्याकडून घे. मोकळ्या मनाने खर्च कर. तुला ज्या कोणाचे लाड करावेसे वाटत असतील त्यांचे तू कर. महाराष्ट्रात अशा अनेक मुली आहेत ज्या मला ‘आई’ म्हणतात. प्रतिभा, तू सुद्धा माझी मुलगी आहेस. प्रत्येक मुलीला तिच्या माहेरच्यांसाठी खर्च करायचा अधिकार मिळाला पाहिजे यामुळे नवराबायकोचं नातंसुद्धा घट्ट होतं. त्यांनाही छान वाटतं की तो फक्त स्वतःच्या आईवडिलांवर प्रेम करत नाही तर माझ्या आईवडिलांवरही प्रेम करतो. कितीतरी घरांमध्ये सुनेच्या आईवडिलांचं घरात स्वागत केलं जात नाही. तसं घडता कामा नये.ते कधीतरीच आपल्या मुलीकडे येतात. ते मुलीचं सुख बघायला येतात. ते काही कायमस्वरूपी तुमच्याकडे राहायला आलेले नसतात त्यामुळे ते आल्यावर त्यांचे स्वागत करा. ज्या घरातल्या जावई आपल्या सासू-सासऱ्यांचा आदर करतो, त्यांच्या भावना जपतो, त्या घरातील सून त्या आपल्या जावयाशी चांगली वागते. जर तुम्ही तिच्या आईवडिलांचा अपमान केलात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत, तुझ्या आईवडिलांकडे मी येणार नाहीत, असं म्हणालात तर तिला आपल्या नवऱ्याबद्दल कसं प्रेम वाटेल ? कारण तीही माणूस आहे.

प्रतिभा : अगदी बरोबर! कोणालाही पटण्यासारखं आहे. ज्यांचं मुलांवर प्रेम आहे त्यांनी शिक्षक व्हावं, असं तुमचं म्हणणं आहे याविषयी विस्तृतपणे सांगा.

विजया : मध्यंतरी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की एका विद्यार्थिनीच्या पोटरीवर शिक्षकाने पन्नास पट्ट्या मारल्या. You are not dealing with files but dealing with life ! एखाद्या रूक्ष फाईलसारखं मुलांना समजायचं नसतं. मुलांचं मन दुखावेल असं काही करायचं नसतं. मुलांनाही मन आहे. छोटसं मन आहे, ते जपलं पाहिजे, मग तेही आपल्याला भरभरून प्रेम देतात.मी काही दिसायला चांगली नाही परंतु माझ्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थी वर्गाच्या दारावर फुगे लावायचे. त्यातून चमचम माझ्या डोक्यावर पडायची. अशा निर्व्याज प्रेमाला उपमा देता येत नाही. ती मुलं तुम्हाला अपरंपार प्रेम देतात. तुम्ही जितकं दिलं होतं त्याच्या दसपटीने प्रेम देतात. कोणत्याही मुलाचा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अपमान करता तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं.

Never Ridicule a child in front of the class.4 मी एकदा मुलांना केमिस्ट्री शिकवत होते. Allotropy हा विषय शिकवला. त्याची उदाहरणे दिली. चित्र दाखवली. मला वाटलं की, माझा विषय व्यवस्थित शिकवून झाला आहे. त्यानंतर घटक चाचणीसाठी मी मुलांना प्रश्न विचारला, What is allotropy? तर एका मुलानं उत्तर लिहिलं की ऍलोट्रॉपी नावाचा शास्त्रज्ञ होता. तो जर्मनीत राहत होता. त्यांनी खूप सारे संशोधन केलं मग त्याला डॉक्टरेट मिळाली आणि मग त्याला नोबल प्राइस मिळालं. माझ्या मनात प्रश्न आला आपण काय शिकवलं आणि यांनी हे काय लिहिलं आहे? मी पंचवीस -सव्वीस वर्षाचे होते. मी वर्गात गेले आणि त्याचा पेपर वाचून दाखवला. डॉक्टर एलोट्रॉपी…
संध्याकाळी शाळा सुटली की आम्ही ज्या रस्त्यावरून चालत जायचो तिथे सुंदर अशी पिवळी फुलं पडलेली असायची. तिथे तो मुलगा उभा होता. तो मला म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही वर्गातून बाहेर पडलात आणि सगळी मुलं मला चिडवत राहिली- डॉक्टर एलोट्रॉपी… डॉक्टर एलोट्रॉपी…; तुम्ही हा विषय शिकवताना माझं लक्ष नव्हतं. माझा व्यवस्थित अभ्यास झाला नाही त्यामुळे माझं चुकलं. परंतु तुम्ही मला हे वर्गाबाहेर बोलावून सांगितलं असतं, थोबाडीत दिली असती तरी चाललं असतं पण वर्गासमोर तुम्ही हे बोललात. सगळ्यांना माझ्यावर हसण्याची संधी मिळाली, असं म्हणत तो रडू लागला. त्याचं रडणं पाहून मलाही रडू आलं. मला वाईट वाटलं की एक कोवळं मन मी दुखावलं. काय करायचं? वर्गात फार तर मी ‘सॉरी’ म्हणू शकेन असं मनात आलं आणि त्याच्यापुढे हात केला. ‘Let’s be friends…!’ त्यांनेही हात पुढे केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही फ्रेंड आहोत. त्याने अप्रत्यक्षपणे मला धडा दिला की वर्गासमोर कोणत्याही मुलाला दुखवायचं नाही. You learn through mistakes. मुलांवर प्रेम करा. ते आपल्यावर प्रेम करतात याचा अनुभव अनेकांनी घेतलाही असेल !

प्राजक्ता आणि निशिगंधा या माझ्याच शाळेत शिकायला होत्या. प्राजक्ता मला शाळेत असताना ‘बाई’ संबोधायची परंतु निशिगंधा काही बाई म्हणायला तयार नसायची त्यामुळे निशिगंधाचा पूर्ण वर्गच मला तिच्यासारखा ‘आई’ म्हणायचा. दोघी माझ्या शाळेतच दहावीपर्यंत शिकल्या. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी रूपारेलमध्ये गेल्या.

प्रतिभा : विजयाताई, याला जोडूनच मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की निशिगंधा केवळ अभिनेत्री नाही तर तिनंही डॉक्टरेट मिळवली आहे. तुमची जी शिकायची जिद्द, धडपड, तळमळ तीच तिच्यातही उतरली असावी. दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलचा ‘प्रेरणा पुरस्कार’ तुम्हाला निशिगंधाच्या हातून मिळाला तर तो निश्चितपणे वेगळा आनंद असेल! तर त्या आनंदाविषयी सांगा.

विजया : निशिगंधाने दोन पीएचडी केल्या, एक वुमन एम्पॉवरमेंट आणि दुसरी नाट्यशास्त्रात. ती सहावीत असताना तिला नाट्यशास्त्राची स्कॉलरशिप मिळाली होती, राष्ट्रीय शिष्यवृत्ती. ती तिने दरवर्षी परीक्षा देऊन वीस वर्षापर्यंत टिकवली. तिच्या गुरु सुलभा देशपांडे होत्या. त्यामुळे तिला चांगल्या नाटकांमध्ये, चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
विश्वकोशाच्या अठराव्या खंडाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मी कोल्हापूरला गेले होते. तेव्हा महाराज मला म्हणाले की विजया वाड या विश्वकोशाच्या अध्यक्ष असतील परंतु मला माहीत आहे त्या रुपेरी पडद्यावरील सालंकृत अभिनेत्रीची आई म्हणून! हे अवचित मिळालेले सर्टिफिकेट, खूपच आनंद देऊन गेलं.

दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलचा ‘प्रेरणा पुरस्कार’ निशिगंधाच्या हातून मिळाला त्यामुळे ‘आई’ म्हणून मी कृतकृत्य झाले.

प्रतिभा : आज तुम्ही अनेकांचे मार्गदर्शक आहात परंतु तुम्हाला आजपर्यंत कोणाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे ? रूपारेलचे संचालक मा. दादासाहेब रेगे हे एका शिक्षकाशी कसे वागले हा प्रसंग मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे.

विजया : दादासाहेब रेगे हे बालमोहनचे संचालक होते आणि मी बी.एड. करताना तिथे काही पाठ घेतलेले होते. माझा पाठ झाला की मी नमस्कार करण्यासाठी त्यांच्याकडे जायचे. जगामध्ये नमस्कार करण्यासाठी पायही थोडेच होते. मी पाया पडायला गेले असताना तिथे एक शिक्षक आले आणि ते म्हणाले की मी एक पाप केले आहे. त्यांनी विचारले, काय झालं? तर ते म्हणाले की घटक चाचणीमध्ये मी एका मुलाला पंधरा मार्क होते पण सतरा मार्कांना पासिंग आहे म्हणून मी त्याचे दोन मार्क वाढवून दिले. मग दादासाहेबांनी विचारलं की का वाढवलेस ? तर ते म्हणाले की तो मुलगा रडायला लागला आणि म्हणाला बाबांनी मला एक सावत्र आई आणली आहे. ती बाबांना सांगेल आणि मला बाबा ओरडतील तर तुम्ही या वेळेस मला पास करा. यापुढे मी गणितात कधीच नापास होणार नाही. शिवाय तो पाय पकडून रडायला लागला. मग मला खूप वाईट वाटलं. मी मुलांना दुःखी पाहू शकत नाही म्हणून मी दोन मार्क वाढवून दिले. माझ्यासाठी काही शिक्षा असेल तर मला सांगा.

हा प्रसंग समोर घडत असताना मनात आले की आता दादासाहेब काय निर्णय घेणार? तर ते शांतपणे त्या शिक्षकाला म्हणाले की ज्या गणितांमुळे तो मुलगा नापास झाला ती गणिते तू पाच वेळा मुलाकडून सोडवून घे. तर ते शिक्षक म्हणाले की होय, ते मी केलं आहे. दादासाहेबांनी त्याच्याकडून त्या मुलाचे नाव विचारून घेतलं आणि त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. ‘या मुलाला सावत्रपणाचा त्रास त्याला झाला तर मला चालणार नाही’ हे त्यांना ठणकावून सांगितलं. त्या मुलाचे वडील हे बालमोहनचेच विद्यार्थी होते त्यामुळे ‘अजूनही तुझा कान पकडायचा अधिकार मला आहे’, असेही ते म्हणाले. घरातील वातावरण आनंदी असेल तरच ते मूल सुखी राहतं हे लक्षात घे, हे सांगितल्यावर त्या बाईच्या लक्षात आलं शिवाय दादासाहेबांचा धाक, दराराही तिच्या लक्षात आला आणि ती म्हणाली की काही माझ्या हातून चूक झाली असेल तर मला माफ करा.
माझ्या डोळ्यातदेखत ही घटना घडल्यामुळे पुढे प्राचार्यपदी गेल्यावर एक घर सुखी कसं करावं, हा वस्तूपाठ तिथे मिळाला. एखादा शिक्षक कसा परिपूर्ण होतो याचा धडा मला तरुण वयातच मिळाला. असे उत्तम संस्कार माझ्यावर घडत गेले.

१९७३ साली मी बी.एड.ला शिकत असताना आमचे प्राचार्य वा. ना. दांडेकर होते. तेव्हा अशी स्कीम आली की तुम्ही तुमचा पेपर मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी इ. कोणत्याही भाषेत लिहू शकता. नंतर ती स्कीम रूढ झाली. प्राचार्यांनी मला सांगितले की तू तुझे पेपर मराठीत लिहावेस, अशी माझी इच्छा आहे. कंपल्शन नाही. तुझं मराठी चांगलं आहे. ‘मुख्याध्यापक कसाt असावा ?’, ‘शाळेचं मैदान कसं असावं ?’, ‘आदर्श शाळा कशी असावी?’ यासाठी पंचवीस मार्कांचे जे प्रश्न असतात त्याची उत्तरे निबंधात्मक लिहायची असतात. तर अश्या प्रश्नांची उत्तरं तू मराठीत चांगली लिहू शकशील. मी त्यांची आज्ञा मानली आणि पहिली आले. विद्यापीठाचं मानांकन मिळालं. अशा गुरूंनी मला दिशा दाखवली. माझे वृत्तपत्रात कुठे लेख छापून आले की ते खूप कौतुक करायचे. ‘नोकरी साठाव्या वर्षी सोडावी लागते परंतु लेखनकलेला वय नसतं. ही लेखनकला तुला समृद्ध आयुष्य देईल!’ त्यांचं हे वक्तव्य खरं ठरलं. वृत्तपत्र लेखन सोडू नकोस, हा कानमंत्र दिला. यानिमित्ताने आपण माणसांशी कनेक्टेड राहतो. वृत्तपत्रातील लेखन चालू राहिलं. कधीही पुण्याला गेले की नमस्कारसाठी वा.ना. दांडेकर यांच्याकडे आवर्जून जात असे. आता सर जगात नाहीत पण त्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत.

न. रा. पारसनीस यांच्याकडे मी बीएड केलं. शाळा सुटल्यावर मी त्यांच्याकडे जात असे कारण नोकरी करून मी पी.एच.डी. केलं होतं. त्यांच्याबरोबर माझी साधारण आठ वाजता अपॉइंटमेंट असायची आणि ती संपल्याशिवाय ते जेवत नसत. एकदा मी घरातून निघत असताना सासूबाई म्हणाल्या की मला जेवायला वाढ आणि वाढल्यावर म्हणाल्या की जेवण संपेपर्यंत थांब. ते सगळं झाल्यावर मी निघाले तर उशीर झाला होता. मला रडू येत होतं. सरांविषयी मला माहीत होतं. त्यामुळे तिथे गेल्या गेल्या मी माझ्या घरात जे घडलं ते सांगितलं तर ते म्हणाले, ‘घर महत्त्वाचं. तू योग्य केलंस.’ त्यांचं मार्गदर्शन मला कायम मिळत राहिलं. या पी. एच. डीच्या गुरूंचे संबंध जीवनभर टिकले.

मी बारा वर्षे शिक्षक होते आणि त्यानंतर मला मराठी विभागाची प्रमुख म्हणून बढती मिळाली. मी बी.एस.सी. होते तसेच मी मराठीत एम.ए. केलेलं होतं आणि विद्यापीठात मला मानांकनही मिळालं होतं कारण एम.ए.ला मी दुसरी आले होते. माझे पी.एच.डी.ही झालेले होते त्यामुळे मी या पोस्टसाठी अर्ज केला आणि मला हे पद मिळालं. त्यावेळेस गोदरेज सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता आणि ते मला म्हणाले की बाळ, तुझी निवड करत आहे परंतु या पदासाठी अर्ज केलेले आणखी दोन जण आहेत. हे पद तुला मिळाल्यावर, त्या दोघांचा कधीही अपमान करू नकोस आणि त्यांना नेहमी आदराने वागव. एका मोठ्या उद्योगपतीने दिलेलं हे शहाणपण मी आयुष्यामध्ये कायम पाळलं. मला मिळाल्यामुळे ते पद त्या दोघांना कधीच मिळणार नव्हतं. मला केवळ माझ्या भाग्याने मिळालं होतं. ‘दुसऱ्यांचा आदर करणे’, हा त्यांच्याकडून मी मोठा धडा घेतला.

नंतर मी ‘पोद्दार’मध्ये आले. तिथे दीक्षित बाई या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. पालकांना संबोधन करण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. माझं संबोधन पोद्दार सरांना इतकं आवडलं की त्यांनी फोन करून मला पोद्दार शाळा आणि ज्युनिअर कॉलेजची प्राचार्य म्हणून बोलावले. तुला सध्या जो काही पगार मिळतो त्यापेक्षा तीन हजार रूपये मी अधिक पगार देईन, असेही कळवले. गाडी- ड्रायव्हर, वातानुकूलित स्वतंत्र केबिन हेसुद्धा देईन. पोद्दारसारख्या ठिकाणी माझी कारकीर्द इतकी सहज सुरू झाली. आधीच्या शाळेत माझा निकाल शंभर टक्के लागायचा. खरं तर त्यासाठीच त्यांनी इथं मला घेतलं होतं. इथे तो शंभर टक्के लागू शकला नाही त्यामुळे मी पर्समध्ये राजीनामा घेऊनच त्यांना भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले की तुला आणखी एक संधी देतो. त्यापुढच्या वर्षीचा निकाल उत्तम लागला. हा माणूस खरोखरी रत्नपारखी होता. त्यानंतर तर मा. पवन पोद्दार यांनी मला President Human Capital ही पदवी दिली आणि एकतीस शाळांची इन्चार्ज बनवले. परभणी, बंगलोर इत्यादी अनेक ठिकाणी मी फिरतीवर जाऊ लागले. मी अनुभव श्रीमंत झाले. जेव्हा भाग्य तुमचं दार ठोठावतं तेव्हा तुम्ही ‘नाही’ म्हणू नका. शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी मी सतत बाहेर असायची त्यामुळे कदाचित माझ्या नवऱ्याला एकटेपणही वाटलाटी असेल परंतु त्यांनी मला समजून घेतलं. तू मैदान गाठ मी घर सांभाळेन, म्हणत ते पाठीशी उभे राहिले.

प्रतिभा : पौगंडावस्थेतील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही चौदा देशांमध्ये गेलात त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे आहे तसेच पौगंडावस्थेतील मुलांची संवाद साधताना त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत का, ज्या खरोखरी विचार करण्यासारख्या आहेत ?

विजया : मी अमेरिकेतील मुलांसमोर बोलत होते. आपले इंग्लिश, ब्रिटिशr इंग्लिश आहे. अमेरिकन माणसांचे थोडेसे उच्चार वेगळे असतात त्यामुळे मी मधूनमधून त्यांना विचारत होते, Are you getting me ? तर एक मुलगा म्हणाला की आम्हाला तुम्ही बोललेलं सर्व समजत आहे कारण तुम्ही आमच्या हृदयाची भाषा बोलत आहात. तर इथेच मला माझं सर्टिफिकेट मिळालं.

आपल्या शिक्षणपद्धतीपेक्षा त्यांच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत. तिकडे एका वर्गात फक्त चौदा ते पंधरा मुलं असतात तर आपल्याकडे कमीत कमी पन्नासचा पट असतो. हे त्यांना कळल्यावर ते म्हणाले की तुमची कमाल वाटते की इतक्या जास्त विद्यार्थ्याच्या पटसंखेला कसं शिकवता? तर मी म्हटलं की आमच्या सर्वच्या सर्व पन्नास विद्यार्थ्यांना, अगदी शेवटच्या बाकावर बसणाऱ्यालासुद्धा शिकवलेले व्यवस्थित कळते. शिक्षक म्हणून नाही आम्ही विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो.

गरीब आईवडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी किती काय करतात हे जेव्हा मी माझ्या भाषणातून सांगितले तेव्हा ते ऐकून त्यांना संतोष वाटला.
एक नववीत शिकणारा मुलगा म्हणाला की Our every fifth home is a broken home. आई तरी घरात नाही नाहीतर बाबा तरी घरात नाहीत. इंडियन मुलांचं खूप भाग्य आहे की ते त्यांच्या आईवडीलांसोबत राहतात यासाठी त्यांचा हेवा वाटतो.
या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की भांडत का होईना भारतातील आईवडील एकत्र राहतात त्यामुळे मुलांचं भविष्य सुखी आणि आनंदी आहे. नवऱ्याची नोकरी गेली किंवा त्याला कोणतेतरी आजारपण आले तर भारतीय बायका त्याला टाकत नाहीत तर त्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. धुणीभांडी करून घर चालवून त्याच्यासोबत राहतात. अशा आपल्या नारीशक्तीचा मी परदेशात जयजयकार करून आले.

प्रतिभा : मराठीचा प्रचार आणि प्रसार आपण आपल्या साहित्यातून करतच आहात परंतु मातृभाषेतून शिक्षण याविषयी आपण अधिकारवाणीने भाष्य करावं.

विजया : प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी प्राथमिक शाळेत मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे. अनेक शाळांमध्ये पाचवीपासून इंग्रजी शिक्षण दिले जात आहे. आपण कमीत कमी घरात तरी आपल्या मुलांशी मराठीतूनच बोललं पाहिजे.
Language can be acquired !
माझेही शिक्षण जरी मराठीतून झाले तरी सुद्धा मी चौंदा देशांमध्ये जाऊन इंग्रजीतून भाषणं दिलीच ना. शेवटी जेव्हा आपण हृदयाची भाषा बोलतो तेव्हा भाषेत थोड्याफार चुका झाल्या तरी चालू शकते. आता आपण कमीत कमी तिथे जाऊन इंग्रजीतून भाषण देतो पण अमेरिकन आणि ब्रिटिशांना इथे येऊन मराठीतून भाषणं देता येणार आहेत का ? त्यामुळे भाषेसंबंधी न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाही. दोन मराठी माणसं भेटल्यावर, ‘How are you ?’ कशाला ?
माझी मराठी मराठी, माझी काशी नि पंढरी
तिच्यासाठी जागा आहे माझ्या घरी, माझ्या उरी !

प्रतिभा : आत्तापर्यंत आपण अनेक विषयांवर बोललो. अगदी मुलांच्या पौगांडावस्तेतील समस्येपासून ते मातृभाषेतील शिक्षणापर्यंत. परंतु तुम्ही ‘खाऊकोश’ ची निर्मिती करून मुलांच्या शारीरिक सुदृढ वाढीचाही विचार केलात, त्याविषयी ऐकायला आवडेल. या खाऊकोशात ‘पाॅम्पपाॅम्प ज्यूस’, ‘नुरजहा’ अशी पदार्थांची नावं वाचून मुलांना खायची इच्छा उत्पन्न होत असेलच! तर यामागची तुमची भूमिका स्पष्ट करा.

विजया : पौष्टिक पदार्थांना वेगवेगळी नाव दिली की मुलांनाही गंमत वाटते.
आपले नेहमीचेच घरगुती पौष्टिक पदार्थ मुलांना खाऊ घालायचे पण त्या पदार्थांना मजेशीर नाव द्यायची त्यामुळे मुलं ते आनंदाने खातात. हे पदार्थ बनवून आणि त्यांना खाऊ घालणं हे बाईच्या हातात असतं. ‘आई कुठे काय करते ?’ असं म्हटलं जातं पण आईचं सगळं करते. आईमुळेच घराचा डोलारा असतो. She is homemaker. त्यामुळे प्रत्येक घरातील बाईला, आईला उचित सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येकाला स्पेस मिळणे आवश्यक आहे म्हणजे मुलालासुद्धा फक्त धाक नको. कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती नको. त्यांच्या आकांक्षांचे पंख कापू नका. माझा एक विद्यार्थी सुतार आहे. तो इतक्या उत्कृष्ट दर्जाचा सुतार आहे की एखाद्या इंजिनिअरपेक्षा तो जास्त कमावतो त्यामुळे घरातली मुलं उमलली पाहिजे, फुलली पाहिजे. ती त्याच्या क्षमतांनी वाढत असतील तर जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही. We are part of the world !

विजयाताईंचे व्यक्तिमत्व किती समृद्ध आहे. त्या प्रतिभावान साहित्यिक आहेतच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांना कोणाचा राग नाही. कोणाकडूनही चांगले शिकून घेण्याची त्यांना कला अवगत झालेली आहे. तर त्या जे शिकतात ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्या करतात. त्या उत्तम कथाकथन करतात. त्या व्यासपीठावर असताना मुलांना व्यासपीठावरच बोलवून त्यांच्याशी संवाद साधतात. विजयाताई सामाजिक बांधिलकी जपतात. विजयाताईंचे विद्यार्थी हेही त्यांच्याच प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. त्यांनी आत्तापर्यंत एकशे बावन्न पुस्तके लिहिली असली तरी नव्वद पुस्तकं ही बालसाहित्यातली आहेत.

कविता- कथा- कादंबरी स्वरूपातील. त्यांच्या कादंबऱ्यांना शासनाचे पुरस्कारही लाभलेले आहेत. गरीब- अपंग -अंध- आदिवासी विद्यार्थी यांच्यापर्यंत त्या साहित्य पोहोचवत नाहीत तर त्या साहित्यातून त्यांना साहित्यात कशी रुची कशी निर्माण होईल, याकडेही लक्ष पुरवतात! दिल्लीच्या एका संस्थेच्या मदतीने हे काम पाहतात. त्यांच्यातील सकारात्मकता ते आपल्यापर्यंत सहज पोहोचवतात. त्यांना अनेकांच्या कविता पाठ आहेत परंतु मला आवडलेल्या संवेदनशील मनाच्या, सकारात्मकतेने जगाकडे पाहणाऱ्या विजयाताईंच्या कवितेच्या ओळीं इथे उद्धृत करते.-
जिथे स्वच्छता तिथे देवता
हेच आमुचे ब्रीद.
जीवन निर्मळ, परिसर निर्मळ
हीच आमुची जिद्द.

डॉ. विजया वाड यांचा अल्प परिचय :-
विजयाताईंची सकारात्मक लेखणी आयुष्यभर मुलींचे आत्मभान जागृत व्हावे म्हणून वापरली गेली आहे. दर वर्षी एक हजार आदिवासी मुलींना दत्तक पालक मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. सांतााक्रुझ (प), मुंबई येथील राजा रामदेव पोद्दार शाळा व ज्युनियर कॉलेजच्या त्या प्राचार्या होत्या. तत्पूर्वी उदयाचल हायस्कूल गोदरेज येथे त्या मराठी माध्यमाच्या प्रमुख म्हणून काम करीत होत्या आणि तेथेच ‘स्वच्छ सुंदर हिरवे विक्रोळी स्टेशन’ हा पर्यावरण प्रकल्प त्यांनी केला. चारशे विद्यार्थी आणि बारा शिक्षक त्यात सहभागी झाले. या प्रकल्पाने पन्नास हजार रुपयांचे पहिले ‘कॅन्थेपेसिफिक एनव्हायर्नमेंट अवॉर्ड’ १९९५ या वर्षात उदयाचला मिळवून दिले व दोन विद्यार्थी ‘लापलाला’ येथे जाऊ शकले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. त्यांची एकूण १५२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘टिंकू टिंकल’ आणि ‘बंदू बॉक्सर’ या दोन बालकादंबऱ्यांना राज्य पुरस्कार तर ‘अवेळ’ या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘देवऋषी’ या कवितेस पर्यावरण पुरस्कार मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महानगर टेलिफोन निगमतर्फे त्यांचा पहिल्या ‘ममता’ पुरस्काराने गौरव केला गेला आहे. शिक्षण क्षेत्रातील मानाचा ‘जिजामाता पुरस्कार’ही त्यांना मिळाला आहे. वेगवेगळ्या पंच्यान्नव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले असून त्या ‘टाटा मेमोरियल शिष्यवृत्तीच्या केले मानकरी’ आहेत. त्यांचे शिक्षण बी.एस्सी., बी.एड., एम.ए., पीएच.डी. इतके झाले असून बी.एड. व एम.ए.ला त्यांना विद्यापीठात मानांकन होते. मुंबई दूरदर्शनच्या ‘शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमात टीव्ही टीचर म्हणून त्यांनी अकरा वर्ष सातत्याने (१९७४ ते ८५) काम केले असून ‘परागण’ हा मुंबई दूरदर्शनचा पहिला पाठ घेण्याचा मान त्यांना मिळाला. वैशिष्टय़पूर्ण कामगिरीबद्दल त्यांना २००८ मध्ये कोलंबो विद्यापीठाने डी.लिट. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. के.जे. सोमय्या कॉलेज आणि एस. टी. कॉलेज, मुंबई येथे शिकत असताना त्यांनी सर्वोत्तम विद्यार्थिनीचा किताब पटकावला होता. तर बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजने पीएच.डी.चे दिले होते.

आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विश्वकोशाचे खंड १७, १८ आणि १९, २० पूर्वार्ध व उत्तरार्ध या पांच ग्रंथांचे व दोन कुमार विश्वकोशांचे संपादन केले. तर तर्कतीर्थांनी सुरू केलेल्या साहित्य खंडाची परिपूर्ती २४ जून २०१५ ला मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली. शिवाय २०,१७८ पानांची सीडी करून विश्वकोशाचे सारे एक ते सतरा खंड एकत्रित स्वरूपात जनतेस अर्पण केले. मराठी विश्वकोश १ ते २० खंड MarathiVishwalkosh.in वर सीडीच्या मदतीने टाकून त्यांनी मराठी विश्वकोश जगास खुला केला. विश्वकोशाच्या या वेबसाइटला महाराष्ट्र शासनाचा ई-गव्हर्नन्स प्लॅटिनम पुरस्कार मिळाला, ज्याला १०५ देश व १५ लक्ष वाचक मिळाले.

विजयाताईची संकल्पना असलेल्या विश्वकोशाची ‘महाराष्ट्रकन्या’ ही महाराष्ट्रातील २७५ तेजस्विनींची चरित्रे सांगणारी २२ तासांची ध्वनिफीत महाराष्ट्रात भारत सरकारने दुर्गम भागापर्यंत पोचवली आहे. विजयाताईंनी अंधांसाठी बोलका विश्वकोश तयार केला. ह. स. २००७ते २००९ या काळात त्यांनी अ. भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या काळात ‘पारावल्या बालगप्पा’ जोडाक्षर विरहित सात पुस्तकांचे संपादन, ११ अध्यक्षीय भाषणे या ग्रंथाचे संपादन, संस्थेची वेबसाइट आणि जमाराशीत वाढ अशी भरीव कामगिरी त्यांनी केली. माता मेळावे, बालकपालक समुपदेशन, यशाचे रहस्य या विषयांवर भारतासह अन्य १४ देशांत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. संपूर्ण रंगीत, ३६५ दिवस पुरतील अशी ३६५ कथा आणि ३६५ बालकविता असे बालकथांचे ३ व कवितांचे २ खंड त्यांनी महाराष्ट्रातील १०० लेखकांच्या सहकार्याने २०१५ मध्ये तयार केले व ते हातोहात संपले. ‘सावित्रीच्या लेकी’ ही १०० ओजस्वी स्त्रियांची लघुचरित्रे त्यांनी २०१६ मध्ये संपादित केली आहेत. तीन वर्षांत १२ केलेल्या बालकोश हा त्यांचा नवा संकल्प पूर्ण झाला आहे.

प्रतिभा सराफ

— लेखन : प्रतिभा सराफ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सगळे लेख आवडले. प्रतिभा सराफ यांचा विजया वाड यांच्यावरील लेख आवडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments