आज महाराष्ट्र आणि कामगार दिन आहे. या निमित्ताने काही कविता सादर करीत आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा.
— संपादक
1) महा रूप ..
महाराष्ट्राची आकृती
जलासमान रंग रूप
सामावून घेई परक्या
जमवी सर्वां एकरूप
अभ्यासावे असे धडे
सुलेख प्रगती प्रारूप
तिजोरी भरू देशाची
देतो मुक्त हस्ते खूप
भारावेअख्ख्या जगा
संस्कृती ही सुस्वरूप
अमोल ठेव इतिहास
वर्तन तसेचं अनुरूप
आपले म्हणून यायचे
रहावे येथे सुखरूप
शिवरायांचे स्वराज्य
रंध्रा रंध्रात येई हुरुप
महाराष्ट्राच्या या दारी
कुणी न जाई विन्मुख
परत जातां आठवणी
मनी सदैव रूख रूख
प्रगति पाही महाराष्ट्री
अन्यराज्यास अपरुप
अभ्यासे आलेख सारे
कुठलेअसणारं प्रारुप
बिघडू नका घडी मात्र
वागू नका कधी विद्रूप
रामदासी लाठी हाती
दाऊ शंकरी रूद्र रूप
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
2) महाराष्ट्राची शान
मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाणा
महाराष्ट्राचा मानबिंदू तो शिवछत्रपती राणा
स्वातंत्र्य मिळविण्या, रक्षण करण्या कितीक रणी झुंजले
ताना, येसा, प्रताप, बाजी पावन हो झाले
लोकमान्य टिळकांनी लढुनी गाजविले मंडाले
क्रांतीसूर्य ते सावरकरही अंदमानी झिजले
समाजसुधारक आगरकर नि महर्षि कर्वे,फुले
स्त्री शिक्षण हे ध्येय साधण्या ज्योतीबा धावले
पहिली कन्या भारतीय,परदेशी जाऊन शिकली
महाराष्ट्राची जोशी कुळातील कन्या डाॅक्टर झाली
महाराष्ट्रातील सुविद्य नेते संसदभुवनी गेले
आंबेडकरांचे नांव भारतीय घटनेत लिहिले गेले
महाराष्ट्राने भारतमातेस कितीक वीर दिधले
क्रीडा, क्षेत्रातील शिक्षण, संस्कार, संस्कृती यांचे फुलले मळे
ज्ञानदेव, नाथ, तुका नि नामा, समर्थ रामदास
अभंग, ओवी, दासबोधातून सांगती जीवनमूल्यार्थ खास
घेऊन स्फूर्ती, होऊन प्रेरीत राखू महाराष्ट्राचा मान
जात, पात, तंटा, विवाद त्यागून वाढवू महाराष्ट्राची शान
— रचना : स्वाती दामले. बदलापुर
3) बाल कामगार ..
बाल कामगार प्रश्न
सांगा सुटणारं कधी
शेकडोवर्षाची जुनी
जाताजाईना व्याधी
दोष न लहानग्यांचा
थोर मोठे अपराधी
साखळ्यांत बांधले
नावापुरती आझादी
कोवळे वस्त्र रेशमी
करून टाकी चिंधी
अधिकार ना आम्हां
घालवाया तया संधी
स्वस्तातले कामगार
वाढत चालली यादी
आमीष गोड पैशांचे
फुलांना लावी नादी
नासवे पुढची पिढी
गहाण टाकून बुध्दी
सुंदर कागद असता
सांभाळत राही रद्दी
कायदा हतबल बने
शांतते पाहतेय वर्दी
सुटले गुन्हेगारआधी
मिळूनि वेळेत वरदी
महत्त्वाची ना कधी
चिमण्यां पेक्षा गादी
बदल हवा घडाया
पापांची वाढे यादी
–– रचना : हेमंत मुसरीफ. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती: ☎️98694 84800
