आला रे आला ..नंदीबैलवाला
गावात सा-या कालवा झाला
बुगू बुगू..बुगू बुगू ढोलक बोले
घुंगर घंटांचा गजर चाले
आळिआळीतून गर्जत गेला,
आला रे आला..नंदीबैलवाला
नंदीबैलवाल्याच्या बैलाचा थाट
लेकिसुना हरकल्या डोईवरी माठ
वितवीत शिंगामागे हातभर बाशींग
झूल झुले अंगा माथ्यावर बाशींग
गेले रे गेला गाव दणाणून गेला,
आला रे आला.. नंदीबैलवाला
ताईमाई, अक्काबाई
‘वाडा भरल’ म्हणतो
सगनराव, मगनराव
‘बर्कत व्हईल’ म्हणतो
बोल बोल बळीराजा
पाऊस पडल काय ?
बुगू बुगू मान हले
नाही म्हणत नाय
काळा दुक्काळाचा बरा कहारात आला,
आला रे आला.. नंदीबैलवाला.
तालेवार बैल असा
नेता जसा मातलेला
भाग्यवान असा मानेवर
जू नाही घातलेला
घरोघरी आज कसे
नंदीबैल माजलेले
माणसांची झाली सोंगं
व्हयबाचे राज्य आले
बोल बोल बैला,
‘माझा माणूस कठे गेला’ ?
आला रे आला ..नंदीबैलवाला
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नंदीबैलवाला कविता जशी वाचनीय तशीच अर्थपूर्ण.
आज नंदीबैल ही दुर्मीळ बाब झाली आहे.अशा परिस्थितीत माणूस कुठे गेला? हे नंदीबैलाचे वाक्य आज हरवल्या गेलेल्या माणूसकीचे सुरेख वर्णन करणारे.