आज भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने काही कविता सादर करीत आहे.
भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
१. “भगवान गौतम बुद्ध”
राजकुमार सिद्धार्थ विख्यात बुद्ध भगवान
बौद्ध धर्म संस्थापक सर्वा देई ज्ञान IIधृII
जन्मले शाक्य कुळी प्रतिष्ठित घराण्यांत
माता लाभली माया राजकन्या कोलियन
पिताश्री शाक्य वंश प्रमुख शुद्धोधन II1II
वाढले विलासी राज ऐश्वर्य जीवनांत
कपिलवस्तु रस्त्यावर पाहिले दुर्दम्य जीवन
तपस्वी चे जीवन पाहून त्यजिले राज जीवन II2II
सिद्धार्थ संन्यासी होऊन निघून गेले वनांत
रामपुत्र गुरूंनी दाविले कसे करावे ध्यान
आकारा कलामांनी दाविले कसे जावे सूक्ष्मात II3II
संन्यासिनी नैरांजना नदी तीरी केले ध्यान
गयेला बोध वृक्षाखाली मिळाले अगाध ज्ञान
सात दिवसांनी झाले निष्काम सिद्ध बुद्ध II4II
बुद्ध फिरले धर्मप्रचारार्थ देत ज्ञान
भिक्षा मागत ध्यान साधना करीत शिक्षित
आज्ञापत्रे प्रतिभामोक्ष ग्रंथ केला विकसित II5II
भविष्य घडते सुविचार भावनांतून
जगाकडे पहावे भेदातीत दृष्टिकोनानं
वृत्ती प्रसन्न व्हावी षड्रिपू मुक्त बुद्ध शिकवण II6II
शुद्ध ज्ञान संकल्प वार्तालाप कर्म आचरण
प्रयत्न समृति समाधी केली अष्टांग प्रदान
बुद्धांचे अहिंसा तत्त्वज्ञान विश्वाला वरदान II7II
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
२. शांतीदूत
जगतामधले दुःख पाहुनी,
हृदय जयांचे द्रवले होते !
राजसुखाचा त्याग करोनि,
भगवी कफनी ल्याले होते !
बोधी वृक्षाखाली बसुनि,
केली होती घोर साधना !
सत्य अहिंसा शिकविणाऱ्या,
नवधर्माची केली स्थापना!
मानवतेचा महापुजारी,
पंचशिलाची दिधली शिकवण !
धम्म शरणं गच्छामिच्या
मंत्रघोषी रमविले भक्तजण !
गौतम नामे बुध्द तथागत,
तत्वज्ञाना म्हणती बुध्दिझम !
अनुयायीही बौध्द अन् भिकखू !
धर्म अनोखा आणि अलौकिक !’
— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800