“विवाह”
माझ्या आयुष्यातला १९६८ ते १९७४ हा काळ हा अत्यंत संमिश्र भावनांचा होता. रसायन शास्त्रातील पदवी प्राप्त झाल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय मी स्वतंत्रपणे घेतला आणि बँक ऑफ इंडियाच्या नोकरीत मी हळूहळू स्थिरावतही गेले. माझ्या शैक्षणिक अनुभवाचा इथे कसलाही संबंध नसला तरी मी याही क्षेत्रात रमू लागले होते. शाळा कॉलेजच्या वातावरणापेक्षा संपूर्ण वेगळ्या भवतालाशी माझे सूर जुळू लागले होते. आमचा सहकर्मचाऱ्यांचा एक छान गृपही जमला होता.
पुन्हा इथे बालपणीच्या, शालेय, महाविद्यालयीन मैत्रीच्या ही व्याख्या बदललेल्या जाणवत असल्या तरीही अशा प्रकारचे स्नेह संबंधही समाधानकारक होते. नोकरीमुळे मिळालेले आर्थिक स्वातंत्र्य आणि मनासारखे पैसे खर्च करण्याचेही एक सुख अनुभवता येत होते.
खरं म्हणजे छानच होता तो काळ! मुक्त, आनंदाचा, काहीसा स्वैरही, पण “पुढे काय ?” हा प्रश्न मात्र आयुष्यात कधीच मिटत नसावा. वयाच्या या विशिष्ट टप्प्यावर “विवाह” हा एक मोठा विषय असतो. मी स्वतः कुणाशी लग्न जमवलेले नाही याची खात्री झाल्यावर आई- पप्पा आणि जीजी यांनी माझे लग्न जुळवण्याचा ध्यास आणि धसका दोन्हीही घेतले होते. माझ्या जवळजवळ सगळ्याच मैत्रिणींची लग्न जुळली आणि झालीही होती. हळूहळू मलाही आयुष्य काहीसं एकसूरी आणि एकटेपणाचं वाटू लागलं होतं.
शिवाय पार्श्वभूमीवर चिंताजनक भाष्ये असायची. “सारं काही वेळेतच व्हावं. जास्त उशीर नको.”
“चापू चापू, दगड लापू” असे नको घडायला.”
“घोडनवरीचा नाहीतर प्रौढ कुमारिकेचा शिक्का नको बसायला.” वगैरे वगैरे..
जोडीदाराचे अगदी काव्यमय स्वप्न वगैरे मी पहात नव्हते पण विवाह करावा या विचारापर्यंत येऊन ठेपले होते.
मात्र “वधू पाहिजे” या सदरातल्या काही ओळींनी माझं मन कधी कधी उसळून जायचं.
“गोरी, सुस्वरूप, सुशिक्षित, उच्च वर्णीय, नोकरी करणारी, शालीन, गृहकृत्यदक्ष वधू पाहिजे” अशी जाहिरात वाचल्यावर मला प्रचंड हसू यायचं. यातला फक्त एकच मुद्दा आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळतो. “नोकरी करणारी.”
शिवाय पत्रिकेत सातव्या स्थानात मंगळाचे आरामशीर वास्तव्य होतेच. त्यामुळे एकूण मामला कठीणच संभवत होता. एखादा होकार आला तर माझ्याकडून घोर निराशाच असायची. पप्पा मात्र फारसे त्यांच्या तत्त्वानुसार विचलित झालेले नसायचे. निदान ते तसं दाखवायचे तरी नाहीत. एके दिवशी त्यांनी मला विचारले, ”तुझ्या जोडीदाराबद्दल काय कल्पना आहेत ? नक्की कसा असायला हवा तो ?”
मी त्यांना पटकन सांगितलं,
”ताटात स्वच्छ, व्यवस्थित जेवणारा, जेवताना आवाज न करणारा, भुरके न मारणारा असा तो असावा.”
यावर आम्ही दोघंही मनसोक्त हसलो होतो. असो…
पण १९७४ साली माझं, पुण्यात शिकणार्या आणि गावात राहणार्या एका संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी विवाह जमला. होकार देताना त्या व्यक्तीचं नाव, गाव, शिक्षण काहीही मला माहीत नव्हते.
जीजी एव्हढंच म्हणाली,
“आमच्यावर विश्वास ठेव. मुलगा आणि त्याचे कुटुंब, घराणे अतिशय चांगले आहे. आता तू नाही म्हणू नकोस.”
पुढे जाऊन थोड्या रागाने ती म्हणाली, “यानंतर आम्ही तुझ्यासाठी स्थळं पाहणार नाही.”
अगदी पहाटे पहाटेच तीन व्यक्ती कुठल्याशा गावावरून आमच्याकडे आल्या होत्या. मीच त्यांना दार उघडले होते.
”या! बसा.” म्हटले होते आणि आईला सांगून माझ्या रूम मध्ये पसार झाले होते. ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. विचित्रपणे माझ्या धाकट्या बहिणी माझ्याभोवती घुटमळत होत्या.
“आज जाऊ नकोस ना!
सुट्टी घे. सगळ्यांनी मिळून नाटकाला जायचं ठरलंय.”
पाहुण्यांबरोबर जेवणं वगैरे झाली पण वेगळं असं काही जाणवलंच नाही कारण आमच्याकडे अशी अनेक माणसं नेहमीच येत असत. बहुतेक पप्पांच्या वर्तुळातली असत.
पण जेव्हा जीजीने दुपारी माझ्याशी संवाद साधला त्यावरून समजले की, हे माझ्यासाठी आलेले स्थळ होते ! मागचा पुढचा कसलाही विचार न करता, जीजीकडे पाहूनच मीही “हो” म्हटले.
“लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात” हे नक्की खरे असावे. थोडक्यात “विलास भांडारकर” नावाच्या एका सुशील, सुसंस्कारी, सभ्य, देखण्या, सुद्धृढ, शांत, मितभाषी, वास्तुविशारदाशी माझे लग्न जमले.
“तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला.” अशी विवाह जमण्यापूर्वीची कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर केवळ काहीतरी संवाद घडावा म्हणून मीच प्रथम विचारले,”खरोखरच तुम्हाला हे लग्न पसंत आहे का ?”
तेव्हा त्यांचं उत्तर..
“मी माझ्या आई-वडिलांना आधीच सांगून ठेवलं होतं..
मी सतरा मुली बघणार नाही. जी पहिली पाहीन तिला संमत असेल तर तिच्याशीच लग्न करेन. तुम्ही “हो” म्हणालात विषय संपला.”
म्हणजे “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला”
किंवा “प्रथम तुज पाहता” वगैरे कसलंही काव्य या विवाह ठरण्यामागे अजिबात नव्हते. पण का कोण जाणे त्यांच्या या उत्तराने मी काहीशी प्रभावित नक्कीच झाले.”हा युवक मला फसवणार तर नक्कीच नाही अशी कुठेतरी खात्री वाटली.”
दरम्यान माझ्या आजोबांनी माझ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा ठेवला. ”हे बघ, हा उत्तर महाराष्ट्र. यातला हा जळगाव जिल्हा आणि हे अमळनेर. कृषीप्रधान लोकांचं, शेतकर्यांचं गाव. या गावाला स्वातंत्र्यलढ्याचाही मोठा इतिहास आहे. स्वर्गीय साने गुरुजींची ही कर्मभूमी. बोरी नदीच्या काठावर वसलेलं हे एक प्रति पंढरपूरच मानलं जातं. इथे सखाराम महाराजांचं प्रस्थ आणि महात्म्य आहे. प्रताप शेठ सारख्या समाजभूषणाने या गावाला प्रतिष्ठा आणि शान मिळवून दिली आहे. अमळनेर येथील या समाजकार्यात मोलाचा वाटा असणारे हे “भांडारकर कुटुंब”. असं म्हणतात की अमळनेर शहरात कुठेही खडा टाकला तरी तो भांडारकरांच्या जमिनीवरच पडणार.”
जेव्हा माझं पहिलं पाऊल या गावात पडलं तेव्हा जाणवला तो शेणामुताचा, ओल्या गवताचा, गाईगुरांचा वास. चुलीवरच्या खरपूस भाकर्यांचा सुगंध आणि घराघरात भरलेली धान्याची समृद्धी..
तीन मजली वाडा सदृश इमारतीच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून “नातिचरामी” शपथ घेऊन मी विलासच्या आश्वासक हातात हात घालून जेव्हा गृहप्रवेश केला तेव्हा माझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात घडणारं परिवर्तनच मी अनुभवत होते. मी भाषाप्रेमी. त्यामुळे सुरुवातीलाच जाणवला तो इथला कवयित्री बहिणाबाईच्या अहिराणी भाषेचा लहेजा. दुहेरी क्रियापदांची काहीशी संगीतमय भाषा, त्यातला गोडवा आणि आतिथ्यशीलता. घरात जुन्या नव्या संस्कृतीची झालेली सुरेख सरमिसळ. परसदारीचा पाणी तापवायचा तांब्याचा सुरेख, घाटदार बंब. तळघरातली विहीर. ओसरीवरचं उखळ आणि दगडी जातं. मधल्या मोकळ्या जागेतील बंगळी. पाहिलंत ना ? तेव्हा नवा अपरिचित वाटलेला झोपाळ्यासाठीचा “बंगळी” हा शब्द किती मनात बसलाय माझ्या ! असे अनेक शब्द. तगारी, भगुणं, चाटू, सराटा, झोट, करजो, घेजो, जमीजा. या बोलीभाषेतील शब्दांशी आता मला ओळख आणि मैत्री करायची होती.
अमळनेरमधलं प्रतिष्ठित भांडारकरांचं मोठं एकत्र कुटुंब, कितीतरी स्वभावांची, वयांची लहानथोर माणसं.
गोऱ्यापान, सडसडीत, उंच, ताठ बांधा, चापूनचोपून नेसलेलं काठपदरांचं काष्ट्याचं नउवारी लुगडं, गोंदण असलेल्या कपाळावरचं कुंकू, अंगभर घातलेले रोजचेच सुवर्णालंकार, करारीपणा आणि माधुर्याचं सुंदर मिश्रण म्हणजे माझ्या सासुबाई. त्यांनी माझा हात प्रेमाने धरला, “म्हणाल्या ही सारी आपली माणसं ! ये आत ये”
“ये कहाँ आ गये हम ?” असे वाटत असतानाच मनाच्या आतल्या गाभाऱ्यात जाणवले- माझ्या आयुष्यातला जडणघडणीचा एक नवा टप्पा सुरू झालाय. बिंबा ढगे ही व्यक्ती राधिका भांडारकर या नावात आता सामावत जाणार. कसा असेल हा प्रवास ?
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान ओघावतं शब्दांकन
छान. साध्या सरळ भाषेत. पण उत्सुकता वाढवणारे वर्णन. वाचकांच्या मनात काही प्रश्न नक्कीच येतील पण आत्मचरित्र म्हणजे इंटरव्ह्यू नव्हे ? असो. लिहिते राहा. शुभेच्छा.