बाप्पा आणि बाम…
आज सकाळपासून घराशेजारीच असणाऱ्या गणेश मंडळातील गणेश भक्तांची गणपती बाप्पांना आणण्याची तयारी अगदी जोरात सुरू होती. अखेर ढोल ताशांच्या आवाजात वाजतगाजत नाचत गणपती बाप्पा आले.
ढोलताशांच्या आवाजापेक्षा डिजेवरील फेमस गाणे घरातील खिडक्या दारे पलंग सुध्दा हादरतील एवढ्या मोठ्या आवाजात कानावर पडत होते म्हणण्यापेक्षा आदळत होते. आमच्या घरातील गणपतीबाप्पांना पोटभर गोडधोड खाऊ घालून घरातील हॉलमध्ये आले.
थोडा पेपर बघावा म्हटले तर सततच्या डिजेवरील गाण्याच्या आवाजाने डोके जाम दुखू लागले. मी बामची बाटली काढली आणि डोक्याला लावू लागले. तेवढ्यात… ‘टिंगटॉंग’ दारावरची बेल वाजली. एवढ्या दुपारचे कोण आले म्हणून दार उघडले. ‘कोण आहे ?’ म्हणून उघडलेले तोंड उघडेच राहिले ! कारण घराशेजारील गणेश मंडळातील साक्षात गणपतीबाप्पा दारात उभे होते.
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ! त्यांची ती त्रासलेली मुद्रा, एका हाताने डोके दाबून धरलेले बाप्पा पाहून मी भानावर आले आणि पटकन विचारले,
“बाप्पा ! तुम्ही आणि माझ्या घरी ?” तर म्हणतात कसे, “आमच्या स्वर्गात बामचे कधी कामच पडत नाही. कारण कसे स्वच्छ, शांत, हलक्या सूरातील संगीत आम्ही ऐकतो. त्यामुळे डोके दुखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ढोलताशांचा आवाज एकवेळ परवडला पण या डिजेवरील विचित्र गाण्यांच्या आवाजाने माझ्या मोठ्या मोठ्या कानांचे पडदे तर ठणकत आहेतच पण या डोक्याचा पार भुगा झाला आहे. दहा दिवस कसे निघतील देव जाणे. मात्र तुला बाम लावतांना पाहून वाटले की या डोकेदुखीवरचा उपाय बामच असणार. ते घेण्यासाठीच तुझ्या घरी आलो. एक बामची बाटली दे आणि हवा तो वर मागून घे. पण ही डोकेदुखी थांबली पाहिजे. पृथ्वीवर दहा दिवस. बापरे बाप !”
हे सारे ऐकून बाप्पाची मला फारच कीव आली आणि अतोनात दु:ख झाले. पण या डिजे लावणाऱ्यांना कोण समजावणार ? शिवाय होणारे ध्वनीप्रदूषण आहेच. या डिजेच्या जीवावरच तर ही तरुण मंडळी उत्सव साजरे करतात आणि वाटेल तसे नाचतात. पण त्यांना काय ठाऊक स्वर्गातील हळुवार आवाजातील सुरेल गाणे ऐकणाऱ्या बाप्पाला हा कानठळ्या बसवणारा डिजेचा आवाज कसा सहन होणार ? मी बामची बाटली बाप्पाच्या हातात ठेवली आणि त्यांना आराम वाटावा म्हणून अद्रक घातलेला चहा करण्यासाठी स्वयंपाक घराकडे निघणार…..
तेवढ्यात कानावर आमच्या ह्यांचे शब्द पडले “उठ, दुपारचे चार वाजलेत. चहा करतेस ना ?” मी खडबडून जागे झाले. पण माझ्या डोळ्यासमोरून आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांचा त्रासिक चेहरा काही केल्या जात नव्हता. मी भरपूर अद्रक टाकलेला छान चहा केला. कुणी काहीही म्हणो आपण दाखविलेला नैवेद्य देवाला पोहोचतोच ना. मग माझा चहा व बामची बाटली यांचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पांना नाही का पोहोचणार ?
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800