Homeलेख"अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन" भाग ३  

“अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन” भाग ३  

“वामन अवतार : दिवस १६ ते १८”
पहिले मानव बुटके होते. Homo Habilis (होमो हॅबिलिस). सुमारे चार फूट उंच होते ते. शारीरिक दृष्ट्या छोटे होते पण बुद्धीने मोठे होते. त्यांनी दगडाची साधने बनवली, आग वापरायला शिकले.

वामन अवतारात छोट्या बटु ब्राह्मणाने तीन पावलात संपूर्ण विश्व व्यापलं आणि दाखवून दिलं की छोट्या गोष्टीत मोठी शक्ती असते.

नरसिंह अवस्थेतील युद्ध जिंकल्यावर पुढच्या १६ ते १८ दिवसात समजून येते की, रोजची छोटी सवय – पाच मिनिटे ध्यान, दहा मिनिटे वाचन, पंधरा मिनिटे चालणं वगैरे छोट्या गोष्टी असल्या तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात.

जेम्स क्लियर यांनी, ‘ऍटोमिक हॅबिट्स’ या पुस्तकामध्ये सांगितलं रोज एक टक्के सुधारणा केली तर वर्षभरामध्ये आपल्यात सदतीस पट सुधारणा होते.

परशुराम अवतार – दिवस १९ – २१
उत्क्रांतीच्या या टप्प्यावर मानवाने साधने आणि शस्त्रे वापरायला सुरुवात केली. Homo Erectus (होमो इरेक्टस) ने भाले बनवले, शिकार केली, समूहात राहायला शिकला.
परशुराम हे कुऱ्हाड शस्त्र धारण करणारे योद्धा होते. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी जिंकली. त्यांची शिस्त अतूट होती.

मानसशास्त्रात सांगतात,’Discipline beats Motivation’ कारण प्रेरणा (motivation) हे कायम असेलच असे नाही पण शिस्त असली की कोणत्याही कारणाची गरज नसते.

जेव्हा तुम्ही शिस्तबद्ध असता तेव्हाच खऱ्या अर्थाने मुक्त असता. 19 व्या ते 21 व्या दिवशी कठोर शिस्त लागू करावी लागते. पाऊस असो, थकवा असो पाहुणे आले असो मी चालायला बाहेर पडणारच.

21 दिवस पूर्ण करणे हा पहिला मोठा माइलस्टोन असतो, सवय बदलण्याच्या प्रक्रिये मधला.

राम अवतार  – दिवस २२ ते २५
उत्क्रांतीच्या या काळात मानवाने समाज निर्माण केले नियम बनवले राज्य स्थापन केली.
राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. नियम पाळणारा, कर्तव्य पूर्ण करणारा आदर्श मानव.
तर सवय बदलण्याच्या प्रवासात 22 व्या ते 25 व्या दिवशी सवय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते. मी व्यायाम करते असं नाही, तर मी एक सुदृढ निरोगी व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. व्यक्तिमत्व बदलले की सवय आयुष्यभर टिकते.

जेम्स क्लिअर यांच्या ‘ॲटोमिक हॅबिट्स’ (Atomic Habits) पुस्तकावर आधारित, सवय बदलण्याचे ३ स्तर सोप्या मराठीत खालीलप्रमाणे आहेत :
जर आपल्याला एखादी सवय कायमची बदलायची असेल, तर आपण बाहेरून आतल्या स्तराकडे बदल केला पाहिजे.

१) परिणाम आधारित (outcome based)
इथे लक्ष हे पूर्णपणे तुमचे उद्दिष्ट, ध्येय किंवा प्रगतिवर असते. उदाहरण “मला १० किलो वजन कमी करायचे आहे.”
हा सवय बदलण्याचा सर्वात बाहेरचा थर आहे. जेव्हा तुमचे लक्ष फक्त अंतिम परिणामांवर असते, तेव्हा प्रगती न दिसल्यास तुमचा उत्साह लगेच कमी होतो.

२) प्रक्रिया आधारित (Process-Based)
इथे लक्ष : हे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या कृती, पद्धती आणि नित्यक्रमावर (रुटिनवर) असते. उदाहरण : “मी रोज योगा क्लासला जाईन.”
यामध्ये यशस्वी होण्याची ५०% शक्यता असते. मात्र, तुमचे नियंत्रण बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. समजा क्लासला सुट्टी असेल किंवा पाऊस पडत असेल, तर तुमचा नियम मोडतो आणि तुम्ही ती सवय पूर्णपणे सोडून देऊ शकता.

३) ओळख आधारित (Identity-Based)
हा सर्वात खोल आणि अंतर्गत स्तर आहे. हा तुमच्या विश्वासावर आणि आत्मप्रतिमेवर (स्वतःबद्दलच्या विचारांवर) लक्ष केंद्रित करतो. उदाहरण: “मला एक सुदृढ आणि निरोगी व्यक्ती बनायचे आहे.”

हा स्तर सर्वात मजबूत आहे. हा बदल तुमच्या आतून येतो आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो की तुम्ही एक निरोगी व्यक्ती आहात, तेव्हा तुमच्या कृती आपोआप त्या ओळखीशी जुळतात. क्लास बंद असला तरी तुम्ही घरीच व्यायाम करता, कारण ती तुमची ओळख बनलेली असते. यामुळे सवयी आयुष्यभर टिकतात.

कृष्ण अवतार – दिवस २६ ते २८
यादरम्यान मानवाची बुद्धी विकसित झाली आणि कला निर्माण झाली. संगीत आले तत्त्वज्ञान आले. कृष्ण म्हणजे बासरी वाजवणारा, रासलीला करणारा, गीता सांगणारा. बुद्धी आणि आनंद यांचा संगम.

मानसशास्त्रानुसार  Flow State. जिथे तुम्ही पूर्णपणे हजर असता. वेळ कसा गेला कळत नाही, तुम्ही आनंदी होता.

26 व्या ते 28 व्या  दिवशी आपण सवयीत आनंद घेऊ लागतो. आता करायचंय म्हणून ती गोष्ट आपण करत नाही, तर आता हे मला करायला आवडते आहे याची जाणीव होते आणि आनंद मिळवा लागतो.

बुद्ध अवतार – दिवस २९ ते ३१
या टप्प्यावर मानवाने धर्म तत्त्वज्ञान नैतिकता विकसित केली. बुद्धाने लोभ, राग, मोह यावर विजय मिळवला आणि शांती प्राप्त केली.

29 व्या ते 31व्या दिवशी ही शांती अनुभवता येते. जेव्हा सवय ओळख आधारित (Identity-based) बनते, तेव्हा ती तुमच्या आयुष्याचा असा भाग बनते की,आता कोणतीही ओढाताण (Struggle) करावी लागत नाही.कोणतेही विशेष कष्ट (Effort) घ्यावे लागत नाहीत. ती सवय अगदी नैसर्गिकरित्या (Naturally) तुमच्यात मिसळून जाते.

मानसशास्त्राच्या भाषेत यालाच ‘ऑटोमॅटिसिटी’ (Automaticity – आपोआप घडणारी क्रिया) म्हणतात. आता ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला वेगळा विचार करावा लागत नाही. तिथे इच्छाशक्ती (Will power) किंवा प्रेरणेची (Motivation) मुळीच गरज उरत नाही; ती क्रिया तुमच्याकडून नकळतपणे आणि सहजतेने घडू लागते.
रात्री 10 नंतर मी फोन बघत नाही. हे मी जमवत नाही तर मी अशीच आहे.

कल्की अवतार – दिवस 32 ते 33
कल्की अवतार अजून व्हायचा आहे. तो भविष्यातील परिपूर्ण मानवाचे प्रतीक आहे. जुन्या युगाचा अंत आणि नव्या सत्य युगाची सुरुवात.

32 व्या दिवसानंतर तुम्ही खरोखर एक नवीन व्यक्ती बनतात आणि तुमचं पर्सनल सत्ययुग सुरू होत.

‘द पावर ऑफ हॅबिट’ या पुस्तकात सांगितले आहे की एक मुख्य सवय (Key stone  Habit)  बदलली की एकामागून एक चांगल्या बदलांची साखळी (chain reaction)  सुरू होते. जसं की व्यायाम सुरू केला तर खाणं सुधारते!, झोप सुधारते , काम सुधारतात,नाती सुधारतात.

तर थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले व्हर्जन अपडेट होते.
क्रमश:

— लेखन : ऋचा कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments