अशी व्याकुळती सांज
येई नदीला भरती
पाणावले डोळे तिचे
मूक उदासल्या राती .
ती वाहते अबोल
सुख दुःखाच्या पल्याड
तिच्या मनात गुपित
तिला सागराचे वेड.
तिच्या देहाच्या पल्याड
काही वेदनेच्या धारा
तिची काहाणी सांगतो
दूर देशीचा हा वारा
अबलख सागराचा
धावे वारू बेलगाम
श्वास नदीचा मागतो
फक्त सागराचे नाम
नदी भेटे ना किनारी
अंतरात दाटे खूण
शुभ्र पाण्याचा आरसा
मन गेले हे वाहून.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
