ठाणे येथील श्री हेमंत साने आणि मेघना साने हे दाम्पत्य सतत काही ना काही साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये निस्पृहपणे सहभागी असतात. एक छान योगायोग म्हणजे, त्यांच्या साहित्य कृतीला नुकतेच एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात मेघना साने यांच्या “ऍडजेस्टमेंट” या कथासंग्रहाला विशेष पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक डिंपल प्रकाशन ने प्रकाशित केले असून या पुस्तकाला नमिता कीर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. याच महिन्यात वंदना प्रकाशन तर्फे जाहीर झालेला आशीर्वाद पुरस्कार तसेच नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार देखील या पुस्तकाला मिळाले आहेत.

हेमंत साने यांच्या “मूलद्रव्याच्या जादुई दुनियेत” या पुस्तकालाही दोन पुरस्कार मिळाले आहेत. एक मराठी विज्ञान परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे नुकताच जाहीर झालेला श्रीस्थानक पुरस्कार होय.
“मूलद्रव्यांचे जादुई दुनियेत” हे पुस्तक 118 मूलद्रव्यांची माहिती देणारे मराठीतले पहिले पुस्तक असून, मराठी माध्यमातील मुलांना सोप्या भाषेत, अत्यंत उपयुक्त अशी विज्ञानाची माहिती यातून मिळत आहे.

या पुस्तकाची पाठराखण पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केली असून प्रस्तावना डॉक्टर मानसी राज्याध्यक्ष यांनी लिहिली आहे.
यात अनेक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सुस्पष्ट केल्या आहेत. हे पुस्तक आठवी पासून ते पीएच.डी. व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांना एक उत्तम संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असे आहे.
‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारातर्फे साने दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
