“शंभूराज देसाई”
सन १९८३ – ८४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री, लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे नातू तथा विद्यमान गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई हे सन १९८३ – ८४ मध्ये इयत्ता बारावी तुकडी क मध्ये शिकत होते. त्या तुकडीत मी अर्थशास्त्र विषय शिकवत होतो.

तसे पाहिले तर शंभूराज देसाई व माझा परिचय त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच झालेला होता. त्यांचे वडील कै. शिवाजीराव देसाई आणि माझ्या वडिलांचे आतेभाऊ कै. प्रभाकर पांडुरंग जगताप रा. कराड यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. श्री जगताप हे पाणीपुरवठा योजनांचे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील बऱ्याच सहकारी पाणीपुरवठा योजनांचे काम त्यांनी केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन कै. शिवाजीराव देसाई असल्यामुळे श्री जगताप यांचा कॉन्ट्रॅक्टर व्यवसायाच्या माध्यमातून देसाई कुटुंबाशी चांगला संबंध होता. श्री प्रभाकर जगताप यांचे कराडचे घरी माजी व देसाई कुटुंबांची ओळख झाली. तेव्हा मी कॉलेजला शिकत होतो. त्यावेळेस शंभूराज व त्यांचे बंधू रविराज कराडला सुट्टी मध्ये जगताप यांच्या घरी यायचे. मी सुद्धा तेथे असे.
शंभूराज देसाई जेव्हा सातारला धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आले तेव्हाच, माझी याच कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी सुरू झाली. जेव्हा आमची वर्गात भेट झाली, तेव्हा दोघांनाही खूप आनंद झाला. शंभूराज वर्गात नेहमी तासाला बसत. त्यांचा पाच ते सहा मित्रांचा समूह होता. जाईल तिथे हे सर्व असत. मग तो वर्ग असो, ग्रंथालय असो, क्रीडांगण असो, की विद्यार्थी विश्रांती गृह असो.
त्या काळात मी यादो गोपाळ पेठेत राहत होतो. राजवाड्यावरून बसने कॉलेजला यायचं व सायन्स कॉलेज स्टॉप वर उतरून आमच्या डी.जी. कॉलेज कडे पायी चालत यायचं. एक दिवस सायन्स कॉलेजवर बसला खूप गर्दी होती तेव्हा, शंभूराजांनी मला त्यांचे गाडीतून माझे घरी आणून सोडले. तेव्हा बस स्टॉप वरील सर्वच विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या दिवशी मी त्या वर्गात शंभूराज आणि माझा पूर्वीचा कसा परिचय आहे, ते स्पष्ट केले. त्यानंतर मात्र ही ओळख सर्वांच्याच परिचयाची झाली.
माझ्या या आठवणीतील विद्यार्थ्यास अर्थशास्त्र हा विषय खूप आवडायचा. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, सिद्धांत आणि महत्त्वाच्या आर्थिक समस्या हे घटक त्यास खूप आवडत असत. एकदा मी तासाला दारिद्र्य ही संकल्पना शिकवत होतो. ‘सापेक्ष दारिद्र्य’ आणि ‘निरपेक्ष दारिद्र्य‘ या संकल्पना मधील फरक स्पष्ट करत होतो. विद्यार्थ्यांना मी सांगितले की, भारतामधील दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणात निरपेक्ष दारिद्र्य आहे.तर इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, या देशात सापेक्ष दारिद्र्य अधिक आहे. या संदर्भात शंभूराज ने वर्गातच उठून सांगितले की, भारतात शहरांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आहे आणि ग्रामीण भागात निरपेक्ष दारिद्र्य आहे. शंभूराज यांचे ते वाक्य एकूण, मी अवाक् झालो आणि या जुनियर कॉलेज पातळीवरच या विद्यार्थ्यांची समाज निरीक्षणाची किती कुवत आहे, त्याचा ग्रामीण भागातील समस्यांच्या आकलनाचा किती प्रचंड अवाका आहे, याची मला कल्पना आली. जेव्हा स्वाध्यायाचा तास असतो तेव्हा शंभूराज महाविद्यालयात पहिल्या तीन तासानंतर हजर राहत असे. पाचव्या तासाला स्वाध्याय होत असे. मी शंभूराजला असे का ? विचारले तेव्हा त्याने दिलेले उत्तर मला खूप भावले. त्याने सांगितले की स्वाध्यायाला कॉपी करण्याची तयारी वर्गातील काही विद्यार्थ्यांकडून पहिल्या तासापासूनच होते. मला ते आवडत नाही त्यामुळे तासांना लक्ष लागत नाही व त्याचा परिणाम माझ्या पाचव्या तासाच्या स्वाध्याय लिहिण्यावर होतो. तेव्हापासून मी पहिल्या तासालाच त्या वर्गाचा स्वाध्याय घेण्यास सुरुवात केली.

शंभूराज हा अत्यंत शिस्तीचा, स्वावलंबी, सर्वांना सामावून घेणाऱ्या विद्यार्थी होता. वर्गातील कोणतीही समस्या सर्व विद्यार्थी त्याला सांगत. तो ती समस्या संबंधित प्राध्यापकांना किंवा प्राचार्यांना सांगत असे, त्यामुळे नेतृत्व करण्याचे त्यास धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातच बाळकडू मिळाले. असे म्हणायला काहीच हरकत नाही.

१९ नोव्हेंबर हा शंभूराज यांचा वाढदिवस ! हा माझ्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे माझा मुलगा सुजित याचाही वाढदिवस तोच ! मी या दिवशी शंभूराजला घरी जाऊन भेटत असे. आता ते फारसे जमत नाही, कारण शंभूराज सध्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. कधी घरी भेटतात कधी भेट होत नाही. पण त्या दिवशी मला शंभुराजे यांची आठवण होतेच. आज शंभूराजे देसाई हे शिवसेनेचे एक धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या कार्याचा व्याप मोठा आहे. त्यांचे चिरंजीव यशराज हे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तर बंधू रविराज हे मोरणा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत. कधी भेट झालीच तर आदरपूर्वक माझ्या तब्येतीची चौकशी करतात. यापेक्षा एका शिक्षकाची विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ती काय असणारे ?
— लेखन : प्रा. मनोहर यादव. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
