आपल्या गुरू जणांबद्दल खूप जणांनी खूप काही लिहिले आहे आणि लिहितही असतात. अर्थातच ते योग्यच आहे. आपण मात्र “आठवणीतील विद्यार्थी” ही लेखमाला आजपासून दर बुधवारी प्रसिद्ध करणार आहोत.
आजचा पहिला लेख लिहिला आहे, तो सातारा येथील प्रा. मनोहर यादव यांनी. अर्थशास्त्रात एम, ए, डि एच एड, एम फील. इतक्या पदव्या धारण केलेल्या यादव सरांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात सन 1981 ते 2014 पर्यंत ज्युनिअर कॉलेज अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून काम केले आहे. या बरोबरच त्रैमासिक रयत शिक्षण पत्रिकेच्या संपादक मंडळाचे ते 6 वर्ष सदस्य होते. त्यांचे अनेक शोधनिबंध, लेख प्रसिद्ध झाले आहेत. “न्युज स्टोरी टुडे” परिवारात यादव सरांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात जुनियर कॉलेज अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून माझी २१ सप्टेंबर १९८१ या दिवशी नियुक्ती झाली. कॉलेजची वेळ सकाळी साडेसात ते साडेबारा अशी होती.
शिवाजी कॉलेजच्या मालकीच्या असणार्या ग्रीन बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये कॉलेजचे ज्युनिअरचे वर्ग भरत असत. त्या ग्रीन बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर टेरेस हॉल होता. या ठिकाणी बारावी कॉमर्सचा ड तुकडीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा वर्ग भरत असे. मी कॉलेजला सकाळी सात वाजता पोहोचलो. स्टाफरूम मध्ये गेल्यानंतर सर्व प्राध्यापकांनी माझे स्वागत केले. मी सर्वाना माझा परिचय दिला आणि लगेचच वॉर्निंग बेल झाली. १० मिनिटांनी तासाची बेल झाली. मला माझे सहकारी प्राध्यापक व्ही टी जाधव यांनी माझे चार वर्गाचे वेळापत्रक दिले. त्यानंतर माझा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र विषयाचा ड तुकडीवर तास होता. जाधव सरांनी मला वर्ग दाखवण्याकरिता व त्या तुकडीतील विद्यार्थ्यांना माझा परिचय करून देण्याकरिता नेले. मी अर्थशास्त्र विषयाचे इयत्ता १२ करीत बोडनि शिफारस केलेले प्रा डीवेट आणि प्रा वर्मा यांचे इंट्रोडक्शनरी इकोनोनॉमिक्स हे पुस्तक घेऊन खडू व डस्टर सह वर्गाकडे चालू लागलो. चौथ्या मजल्यावर जायचे होते. मुलांची जिन्यात गर्दी होती.
दुसऱ्या मजल्यावर पोचलो तो पर्यंत याच वर्गातील एक गोरापान मुलगा, घारे निळे डोळे आणि उंचीने मध्यम परंतु तब्येतीने चांगला नीटनेटके कपडे म्हणजे सफेद टी-शर्ट आणि फुल पॅन्ट पायात बूट सॉक्स, हातात चार ते पाच नोटबुक्स, असा आम्हा दोघांनाही भेटला. प्राध्यापक जाधव सरांना व मला स्मित हास्य करून गुड मॉर्निंग सर म्हणाला आणि लगेचच त्याने त्याच्या तर्कबुद्धीची चमक दाखवत प्राध्यापक जाधव सरांना विचारले, काय सर, हे आमचे अर्थशास्त्र विषयाचे नवीन सर काय ? जाधव सरांनी हो म्हणताच त्याने मला पुन्हा स्वतंत्र गुड मॉर्निंग म्हणून स्वतःची ओळख करून द्यायला सुरवात केली. सर, मी झाल शाम कूपर, मला वर्गात सर्व झाल म्हणतात. आमचा वर्ग खूप चांगला आहे. सर्व मुले हुशार असून खूप सभ्य आहेत, एवढे बोलून त्याने मला माझे नाव, मूळ गाव, शिक्षण, विद्यापीठ याची चौकशी केली. चौथ्या मजल्यावर येताच वर्गासमोर गेल्यानंतर त्याने प्राध्यापक जाधव सरांना तुम्ही परत जा, मी यादव सरांचा परिचय वर्गात करून देतो असे सांगितले. मलाही आश्चर्य वाटले. प्राध्यापक जाधव सर परत स्टाफरूम कडे गेले.

मी वर्गात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी उठून उभे राहिले सर्वांनी आमचे गुड मॉर्निंग म्हणून स्वागत केले. मी विद्यार्थ्यांना बसण्यास सांगितले. झालने माझा वर्गास परिचय करून दिला. तो म्हणाला, मित्र हो आपल्याला आज पासून प्राध्यापक मनोहर शामराव यादव सर हे अर्थशास्त्र विषय शिकवणार आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम ए अर्थशास्त्र व डीएचएड पदव्या संपादित केल्या आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या, खाली बसले व माझा तास सुरू झाला. स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या संकल्पनांची ओळख करून देऊन मी तास संपवला.
माझे कॉलेजचे अध्यापन काम व्यवस्थित सुरू झाले. अन्य तिन्ही वर्गात म्हणजे इयत्ता अकरावी क आणि ड तसेच अकरावी क या वर्गामध्ये अध्यापन सुरू झाले त्यापैकी ड तुकडी ही इंग्रजी माध्यमाची होती .मला फरक जाणवला तो हा की इंग्रजी माध्यमाची बहुदा सर्वच मुले इंग्रजी मधूनच आपापसात बोलत .मराठी माध्यमातून आलेल्या मुलांना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. परंतु इयत्ता बारावी तुकडी ड मधील झाल हा विद्यार्थी मराठी व इंग्रजीही चांगले बोलायचा. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना तो दुभाषि म्हणुन मदत करायचा माझ्याबाबत कित्येक वेळा असे व्हायचे आणि झाल मला मदत करायचा. वर्गात शिकण्याकरता बहुदा मी संमिश्र अध्यापन पद्धतीचा उपयोग करायचो.कधी प्रश्नोत्तर पद्धती, कधी व्याख्यान पद्धती, कधी प्रकल्प पद्धती, कधी उजळणी या प्रत्येक प्रक्रियेत झालचा प्रतिसाद चांगला असायचा .अशा प्रकारे झाल व माझी चांगली ओळख झाली. त्याने जेव्हा त्याची कौटुंबिक माहिती सांगितली तेव्हा तर मी आवाकच झालो. कारण हा झाल म्हणजे साताऱ्यातील प्रसिद्ध उद्योजक श्याम कुपर यांचा मुलगा होता. फारुख कुपर यांचा पुतण्या होता. त्याने त्याच्या कुटुंबातील सर्व शिस्त, सामाजिक बांधिलकी, उद्योजकता या सर्व विचारांची माहिती दिली. मग माझ्या लक्षात आले की झाल हा मूळचाच कुटुंबातीलच हुशार, शिस्तप्रिय आणि उद्योजकतेचे सातत्याने चिंतन करणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर अवांतर गप्पांमध्ये तो व्यवसाय, उद्योग, भारतातील उद्योजकता आणि परराष्ट्रातील उद्योजकता याची चर्चा करायचा.
सध्या सातारा येथील कुपर कॉर्पोरेशन प्रा लि या प्रसिद्ध उद्योगाचा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडील हे गुण वर्धित होण्यास माझाही अध्यापनातून हातभार लागला याची त्याला आणि मला जाणीव आहे आणि त्या गोष्टीचा मला रास्त अभिमान वाटतो.

— लेखन : प्रा मनोहर यादव. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
