कुठे गेले ते लोक
हसण्यातून प्रकाश पेरणारे
डोळ्यांमध्ये स्वप्नं घेऊन
जगण्यात रंगत आणणारे
कशाही परिस्थितीत
सुख शोधणारे
लहानसहान गोष्टींमध्येही
आनंदाचे क्षण जपणारे
झाडाच्या त्या कट्ट्यावर
रंगायची गप्पांची मैफल,
घरी चुलीभोवती बसून
मिळायची ऊब मनाला
आता सर्वत्र अस्वस्थ शांतता,
ना हास्य, ना तो गजर,
मोबाईलच्या पडद्यामागे
हरवलाय सारा संसार.
कुठे गेले ते हात,
एकमेकांना धरून चालणारे?
दुःखाच्या काळोखातही
दिवा बनून उभे राहणारे?
आज माणसं आहेत भरपूर,
पण माणुसकी हरवली,
स्वार्थाच्या सुसाट वाऱ्याने
नाती सगळी उडवली.
उत्तर शोधत बसतो मी
काळाच्या या वळणावर,
नेईल का कुणी मला
पुन्हा त्या जुन्या वाटेवर…

— रचना : उद्धव भयवाळ. छत्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
