Homeलेखसंगती रंग : २६

संगती रंग : २६

प्रतिज्ञा

आज मागे वळून पाहताना मला जाणवते की नोकरीमुळे किती समृद्ध झाले मी ! पैशामुळे येणारी समृद्धी नाही म्हणायची मला. माणसांचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार, त्यांचे मनोव्यापार, त्यांची प्रत्येकाची आयुष्ये, प्रत्येक व्यक्तीची व्यक्त होण्याची विशिष्ट पद्धत हे सगळे मला निरखायला मिळाले. ही श्रीमंती सांगते आहे.

असे लक्षात येते की, गेल्या पंचवीस वर्षात आमच्या बँकेत एक ठळक बदल झाला की, व्यावसायिक वृत्ती वाढली किंवा माणुसकी कमी झाली म्हणूया.
ग्लोबलायझेशनचा परिणाम की कॉम्प्युटरायझेशनचा ? ते तज्ञच सांगू शकतील.

मी बँकेत जॉइन झाले तो काळ असा होता,की माणसे सांभाळली जायची. दारू पिणारे, मनोविकार असणारे किंवा मनोरुग्ण वाटतील अशा टाईपचे एम्प्लॉईसुद्धा माणुसकीने ,चक्क पोसले जात ! सांभाळून घेणे ,पोसले जाणे हे शब्द कॉर्पोरेट जगातून आता अगदी हद्दपार आहेत.

थोडी तिरसट, वेडसर वाटणारी ॲग्नेल अशी ‘ सांभाळली गेली ‘ कॅटेगरीतली. पण पोसली गेली असे कोणी म्हणणार नाही ! कारण तिने फुकट पगार कधीच घेतला नाही. मूळची ती हुशार. त्या काळी म्हणजे साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी कॅशबुक टॅली करणे हे महत्वाचे काम होते. ते करण्यात तिचा हातखंडा !
तिचा लव्हब्रेक झाला होता म्हणे. मुकी वाटेल इतकी अबोल होती. आई हिंदू, वडील ख्रिश्चन. तिचे हिंदू मुलावर प्रेम जडून ते फिस्कटले होते तेव्हापासून तिचे ताळतंत्र बिघडलेले.

मी ब्रँचला जॉईन झाले, तेव्हा तिच्या कुरळ्या केसांचा कसाबसा बांधलेला बुचडा, त्याला लावलेली वाकडी जाड क्लिप, त्यात खोवलले बॉलपेन मनात ठसले. कानात काही नाही. टिकलीशिवाय कपाळ. चेहरा काहीसा तेलकट . पण सिल्कच्या फॅशनेबल टॉप खाली पोटऱ्या झाकतील एवढा लांब मिडी. तिच्या उंचीला, बांध्याला खूप शोभून दिसायचा तो. गबाळी कसं ठरवणार तिला ?
एखादा दिवस जर तिची सटकली तर, टॉयलेटमध्ये जाऊन ती रडत बसायची.

लंचटाईम मध्ये टॉयलेटला रांग म्हणावे अशा मागोमाग उभ्या असायचो आम्ही. एकदा आतमध्ये रडल्यासारखा आवाज आला. मध्येच वेदनेने विव्हळावं तसा. जणू कोणी गळा दाबत आहे. नवीनच होते मी. मला सांगितलं, “ आतमध्ये ॲग्नेल आहे.”
ॲग्नेल बाहेर आली, तर तिच्या चेहऱ्यावर घडल्या प्रकाराचा मागमूस नाही ! अधून मधून हे चालत असे. कधी ती चोर चोर असे ओरडत असे. तिला रडणे आवरता येत नसेल. ज्याच्याशी बिनसले तो प्रियकर चोर वाटत असेल !
तिची कोणी समजूत घातलेली पाहिली नाही. आधी अनेकदा घालून झाली असेल. किंवा तिला असे समजूत घालणे आवडत नसेल. तिच्या डोळ्यांतले तिरसट भाव बघून कोणाची हिंमतही होत नसेल.

तिला फक्त कॅशबुक चांगले जमत असे. बाकी कोणतंही काम तिला करणं अशक्य होतं.

तिची मागून खिल्ली उडवली जायची. कधी चेक किंवा व्हाउचर एकत्र होल्ड करण्यासाठी वापरली जाणारी क्लिप मिळेना झाली की जा त्या ॲग्नेलच्या डोक्याची आणा रे, पेन हरवले की केसात खोचलेले असेल ॲग्नेलच्या ते आणा , अशी टिंगल व्हायची.
पण तोंडावर तिचे हसे कुणीही करत नसत. फजिती करत नसत. बाकी काही नाही, तर कॅशबुक सांभाळते असा विचार ब्रँचहेड करत असे.
आमचा मॅनेजर बदलून त्या जागी अगदी तरुण नवशिक्या मॅनेजर आला. जरा ढूश्या स्वभावाचा. साधारण नवीन आलेल्या प्रत्येकाला उत्साह असतो. अगदी नवीन सून असो, नवीन झालेली सासू असो, नवीन सर्वसाधारण एम्प्लॉई असो की नवीन बॉस ! आपण काहीतरी वेगळे करू ही भावना अनुस्युत असावी.

तर, तो नवीन बॉस आला. ॲग्नेलच्या डोळ्यातले विचित्र भाव त्याला जाणवले असावेत. दोन दिवसाचं कॅशबुक टॅली नव्हते. तो चिडला. मुळात त्याला काही काही गोष्टी त्याला खटकत होत्या. अॅडिंग मशीन अगदी दारात नको म्हणाला. फोनचा वापर फक्त कामा पुरता हवा. फोनला लॉकच लावले त्याने. कॅश टॅली नसेल तर कोणी घरी जायचे नाही. तो सारखे एकेक फतवे काढत होता .
माझ्या शेजारी श्री. केदारे बसायचे. मला म्हणाले, ”शाळेत अख्खं पान भर होत्या की नाही, लॉर्ड कर्झन वायलीच्या सुधारणा ! काय ,इतिहास आठवतो का ? “
मॅनेजरचे टोपणनाव लॉर्ड कर्झन ठरूनच गेले मग.

मी इतकी बावचळून जात असे. कधी कधी सगळेच जण मला इतके विचित्र वाटायचे. जणू काही मीच परक्या ग्रहावरून दाखल झाले आहे.
ॲग्नेलचे कळल्यापासून तर कुणाचीच खात्री वाटायची नाही ! ब्रँचमध्ये एक पारसी बाबा होता. ‘बावाजी‘ म्हणत त्याला. अविवाहित होता तो. हेड कॅशियर होता. कॅशच्या पिंजऱ्यात सतत उभा दिसायचा. नेहमी गप्प असायचा. कुणाच्या अध्यात ना मध्यात. ब्रँचमध्ये मुलांचे रिझल्ट लागले किंवा काही प्रमोशन वगैरे गुड न्यूज असेल तर पेढे वाटले जात. कोणी कारण विचारले की बावाजी को लडका हुआ. किंवा बावाजी की शादी हुई. पेढे वाटणारा प्युनसुद्धा सहज ही मस्करी करत होते. मागून उडवलेली खिल्ली मला खूप त्रासदायक होत असेच. पाठीमागे मला काय म्हणत असतील ह्या विचारानेही मी हैराण होत असे.

आज मागे वळून पाहताना वाटते, नालस्ती करत असत. पण सांभाळून घेणे हेही होत होते. ॲग्नेल असो की बावाजी असो किंवा दारुड्या भिवा असो कोणाचीही नोकरी गेली नाही. काही ना काही काम करवून घेतले जात असे. त्यांची नोकरी जपली जात असे. आता अशी खिल्ली उडवत नाहीत. पण मनात हेवा दावा असतो. राजकारण असतेच. माणूसकीखातर असे सांभाळून घेणे अशक्य नाही. पण शर्यत आहे ना मग लंगडत असाल तर धावू नका, असे काहीसे झाले आहे.

बावाजी चक्क उभं राहून (!) डुलकी काढत असे. त्याला कधीही मेमो मिळाला नाही. उलट त्याला हळूच जागे करत. एकदा हजार ऐवजी दहा हजार पेमेंट दिले त्याने. ते कलिगनी धावपळ करत मिळवले देखील. (विचार करा त्या काळचे नऊ हजार, वसूल करताना किती त्रास झाला असेल. त्यात सी. सी. टीव्ही वगैरे तेव्हा काही नाही)

तर काय सांगत होते, नवीन मॅनेजर आल्यावर त्याने सुधारणा करण्याचा पवित्रा घेतला होता. लॉर्ड कर्झन वायलीच्या सुधारणा असा चॅप्टर केदारे लिहीत होते !
त्याने ॲग्नेलला फायरिंग दिले, दोन दिवसाचे कॅशबुक टॅली नाही म्हणजे काय ?
मॅनेजरचे काहीच चूक नव्हते. मुद्दा योग्यच होता.
ॲग्नेलसाठी मात्र हे अनपेक्षित होते.
“व्हॉट टॅली टॅली !!” ती किंचाळली. केसांची जाड पिन तिनं एका हाताने टक्क करून काढली. सत्य साईबाबासारखे तिचे कुरळे केस फिसकारले !
“जो पर्यन्त कॅशबुक टॅली होत नाही,तोपर्यन्त मी केस बांधणार नाही !”

“आर्य चाणक्य आठवतो का ? नंद राजाचा नाश होत नाही तोपर्यन्त शेंडीची गाठ बांधणार नाही मी !“ केदारे पुटपुटले. इतिहास हा त्यांचा आवडता विषयच असावा !
तिचा अवतार बघून लॉर्ड कर्झन असा निमूट बसला ! काय सांगू !

शेवटी ॲग्नेलने दोन दिवसांचे कॅशबुक टॅली केले. लॉर्ड कर्झन वरमला थोडा.

त्यानंतर केस न बांधता बसणे हा नियमच झाला ॲग्नेलचा. तिचे केस क्लिपमध्ये एकत्र झाले, की कॅशबुक टॅली झाले असे समजायचे ! त्यामुळे ॲग्नेलला नाव मिळाले ‘आर्या ‘ चाणक्य !

(आणि लॉर्ड कर्झनला स्टाफ हँडल करण्याचा धडा मिळाला बहुदा !)
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…