Homeसेवा"पुण्या"ची खाणेसुमारी !

“पुण्या”ची खाणेसुमारी !

देशात सध्या जनगणना सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात कोणे एकेकाळी झालेली खाणेसुमारी, आजच्या घडीला नक्कीच मनोरंजक वाटेल….
– संपादक

महाराष्ट्रात जनगणनेसाठी “खाणेसुमारी” हा शब्द प्रचलित होता. पेशवाईच्या काळात महसूल, कर आकारणी आणि प्रशासनासाठी शहरातील घरे, वाडे, दुकाने, देवळे, मठ आणि रहिवाशांची नोंद ठेवली जात असे. या नोंदी आज इतिहास संशोधकांसाठी अमूल्य ठेवा ठरल्या आहेत.

पुण्यातील विविध पेठांची खाणेसुमारी त्यापैकीच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याचे सर्वात रोचक उदाहरण म्हणजे मंगळवार पेठेची इ.स. १८१८ नंतरची खाणेसुमारी. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुण्याचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत ही नोंद तयार करण्यात आली. आज ही कागदपत्रे आपल्याला दोनशे वर्षांपूर्वीच्या पुण्यात प्रत्यक्ष फिरून आल्याचा अनुभव देतात.

या खाणेसुमारीनुसार मंगळवार पेठेत एकूण २६१ घरे आणि ७०५ खण होते. आज एखाद्या मध्यम आकाराच्या गृहनिर्माण संस्थेत जितकी घरे असतात, तितकी संपूर्ण पेठेत नव्हती. त्या घरांपैकी ७४ माडीची, ८३ एकमजली आणि ८५ छपरी घरे होती. म्हणजेच त्या काळातही घरांच्या प्रकारांवरून आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जात होता. विशेष म्हणजे १७ खुल्या जागांची आणि दोन देवळांची स्वतंत्र नोंद करण्यात आली होती. यावरून प्रशासनाची माहिती संकलित करण्याची पद्धत किती तपशीलवार होती याची कल्पना येते.

या पेठेतील सामाजिक रचनाही तितकीच मनोरंजक होती.
४२ ब्राह्मण, ४६ कुणबी-मराठे, २७ वाणी, १२ तेली, ६ मुसलमान, ४ जैन, ३ कुंभार, ३ गोसावी आणि १ सोनार अशी घरे तिथे होती. आज ज्या विविधतेचा अभिमान पुणे बाळगते, तिची मुळे दोनशे वर्षांपूर्वीच्या या नोंदीत स्पष्ट दिसतात.

मंगळवार पेठेतील जीवन केवळ निवासी नव्हते; ते आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्याही महत्त्वाचे होते. येथे चार सरकारी चौक्या कार्यरत होत्या. म्हणजेच त्या काळातही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी संघटित यंत्रणा अस्तित्वात होती. दोन प्रमुख देवळे होती आणि त्यांना करमाफी देण्यात आली होती. गोसाव्यांचे मठ आणि काही इतर संस्थांनाही करसवलती मिळत होत्या. आजच्या करसवलतींच्या संकल्पनेची ही ऐतिहासिक झलक म्हणता येईल.

या नोंदीत त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही उल्लेख आहे. महादेव मायेनकर, सिताराम नाईक चिकटे, बालाजीपंत दामले, भिकाजीपंत सुभेदार, हाणवतराव सितोले यांसारखे सावकार, सरदार आणि मुत्सद्दी या पेठेत राहत होते. त्यामुळे ही खाणेसुमारी केवळ लोकसंख्येची नोंद नसून त्या काळच्या पुण्याच्या सामाजिक आणि आर्थिक अभिजनांचा आराखडाच ठरते.

जनगणना ही केवळ आकडेवारी नसते. तर ती जणू इतिहासाची टाइम मशीन असते. जशी मंगळवार पेठेची १८१८ मधील खाणेसुमारी आपल्याला पेशवाईनंतरच्या पुण्याचे जिवंत चित्र दाखवते, तशीच आजची जनगणना भविष्यातील इतिहासकारांना आपल्या काळातील भारताचे दर्शन घडविणार आहे. दोनशे वर्षांनंतर कदाचित एखादा संशोधक आजच्या नोंदी वाचत असेल आणि आपल्या समाजाची कथा उलगडत असेल. म्हणूनच जनगणना म्हणजे केवळ लोकांची मोजणी नव्हे, तर काळाची नोंद होय. त्यामुळे सर्व जनतेनी यात सहभाग नोंदवावा. आलेल्या प्रगणकाला आपल्या देशाच्या विकासाच्या पायाभरणीचा दूत समजून त्याला सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. याबाबतीत प्रशासनानेही वेळोवेळी सहकार्याचे आवाहन केले आहे.

चला आपण या शतकातल्या सर्वात मोठ्या जनगणनेत सहभाग नोंदवून साक्षीदार होऊ या…!!

— लेखन : युवराज पाटील. जिल्हा माहिती अधिकारी, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments