प्रातःकाल रमणीय
किलबिल घरट्यात
विहंगती पक्षीगण
टिपतसे परड्यात
किरणांची रेलचेल
सुंदरशा अवनीत
घुसळून काढीतसे
चवदार नवनीत
तेजोमय तेजःपुंज
अवखळ वादळात
सौदामिनी तेजाळते
इंद्रधनू वर्दळात
पावसाच्या प्रेमसरी
हर्षमय उल्हासात
फिरायला चरचर
हिंडतसे जल्लोषात
मोगऱ्याच्या वेलींवर
सुगंधित रानजाई
मधाळतो गुंजारव
मधुकर नवलाई
हरितात दवबिंदू
मोतियाच्या राशींवर
चमकती वाऱ्यावर
दुर्वांकुरे सरोवर
रत्नाकरी सरितेला
मिलनाची निःस्वार्थता
लवणाच्या क्षारतेत
गोडव्याची कृतार्थता
कालचक्र घडतसे
ऋतूतील ब्रिदावली
अनुपम्य सोहळ्यात
शितलता आसावली
जलधारा बरसण्या
निसर्गाचे आयोजन
वृक्षवल्ली प्रसवती
धरित्रीचे प्रयोजन
सुकुमारी वल्लरीचे
आगमन पावसात
फोफावते वृक्षावरी
सुमनांच्या प्रवासात
कोंबड्याचे आरवणे
ललनेची धावपळ
स्वयंपाक भोजनाची
अखंडित तळमळ

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
