“ऑस्ट्रेलियातील गंमतीदार किस्सा”
मी सध्या पुण्याहून ऑस्ट्रेलियातील मुलाकडे आले आहे. सिडनी येथील एका बारा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरील डॉक्टरला भेटून मी आणि माझा मुलगा बाहेर पडून लिफ्टमध्ये शिरलो. तिसऱ्या मजल्यावर एक बरीच वयस्कर, अंदाजे ८०च्या पुढे असेल एक बाई लिफ्ट मध्ये चढली. टिप टॉप, छान कपडे, मॅचिंग गुलाबी स्वेटर घातला होता. हातात सुंदर पर्स होती. लिफ्ट मध्ये चढताच तिने हातातली कारची किल्ली माझ्या मुलासमोर धरली आणि म्हणाली, “ही माझ्या कारची किल्ली आहे. पण कार कुठे पार्क केली आहे मला आठवत नाही.” माझा दयाळू मुलगा लगेच म्हणाला, “मी तुम्हाला कार शोधायला मदत करतो, चला.” मीही इथे नवखी. मुलाने लिफ्ट थांबवून मला तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट समोरच बसून राहायला सांगितले. (हो ! नाहीतर मीच हरवायची !)

कल्पना करा. हॉस्पिटलची इमारत बारा मजली, कार पार्किंग बारा मजली. प्रत्येक मजल्यावर निदान शंभर तरी, जास्तच पण कमी नाही गाड्या पार्क केलेल्या. त्यातून बाईंना आपल्या गाडीचा मेक, मॉडेल, रंग काहीच आठवत नव्हते. हातात फक्त किल्ली. तेव्हढ्या आधारावर गाडी शोधायची म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखेच ! देवा, मला तर कार शोधायची ह्याची कल्पनाही करता येईना.
मुलगा दोन, तीन वेळा सांगून गेला, “आई इथेच बसून रहा. आम्हाला वेळ लागेल”.
तरी तेव्हढ्यात मी लिफ्ट बंद होण्याच्या आत पटकन विचारले, “कसे शोधणार ?”
प्रत्येक मजल्याच्या पार्किंग मध्ये जावे लागणार. “निदान१२०० गाड्यांमधून शोधायची आहे.
बाराव्या मजल्यापासून सुरू करून शोधत, शोधत, उतरत, उतरत तिसऱ्या मजल्यावर आले. मी जागेवर आहे ह्याची मुलाने खात्री करून घेतली. सुमारे अर्धा, पाऊण तास शोध चालू होता.
“आई आता तीनच मजले राहिलेत.”
आणि खरी गंमत झाली ! गाडी सापडली. कुठे काय ? तिसऱ्या मजल्यावरच !
तिने गाडी पार्क केली आणि लिफ्ट जवळ येईपर्यंत विसरली. ड्रायव्हिंग ती स्वतः करत होती.

आता आणखी पुढची गंमत ! तिने मुलाचे खूप आभार मानले आणि म्हणाली, “l dont remember where l left my husband !”
आम्हाला दुसरीकडे अपॉइंटमेंट असल्यामुळे तिचा नवरा शोधून द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे तिची माफी मागून आम्ही हॉस्पिटल सोडले.
मुलाला बाईची खूप काळजी वाटत होती. आता ही नवऱ्याला कशी शोधणार ? कारण पार्किंग ला प्रत्येक मजल्यावर बाहेर पडून पुढच्या मजल्याला पुन्हा एंट्री. मग लाईन. कल्पनातीत अडचणी.
मी बसून प्रार्थना करत होते देवा तिचा नवरा कंटाळून गाडीतच झोपलेला सापडू दे.
वयोमर्यादा वाढत चालली आहे, एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे, अल्झायमर, dimensia केसेस वाढत आहेत. वृध्दांना स्वतः ड्रायव्हिंग करणे भाग आहे. दर सहा महिन्यांनी डोळे तपासून लायसन्स renew करावे लागते.
आपला भारत चांगला. जिथे नातवंडे आजी आजोबांची गाडी चालवतात. नाही का ?

— लेखिका : सुलभा गुप्ते. ह. मु.सिडनी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
