Homeलेखसंगती रंग : २१

संगती रंग : २१

“इस बात पें चाय हो जाय”

चहा नुसतं म्हटलं तरी, ज्यांना तरतरी येते ते चहाप्रेमी ! कुणाकडे अचानक गेलं की चहा घेणार की कॉफी असं विचारायची पद्धत होती. पाहुण्यांनी चहा म्हटलं की आपल्या पार्टीत आल्यासारखं वाटायचं मला. माझ्या लहानपणी पाहुण्यांनी चहा म्हटलं की आई बऱ्याचदा मला ‘ जा कर चार कप चहा ‘ असे सांगून स्वयंपाकघरात पिटाळत असे.
समोरच्या इंदिराकाकू कौतुकाने सांगायच्या, ’आमच्याकडे चहाचं आधण सारखं उकळत असतं मुळी.‘ म्हणजे त्यांचा सांगायचा उद्देश हा की, त्यांच्याकडे आला गेला, पै पाहुणा खूप ! एकूण काय पाहुण्यांचा राबता असणे, पाहुण्यांना घोटभर तरी चहा देऊन खातिरदारी करणे हे उत्तम गृहस्थी करण्याचे व्यवच्छेदक लक्षण मानले जात असे.

आमच्याकडे शकुंतलाकाकू आल्या की दुपारभर बसत असत. पापड कोणाकडे आणि कधी करायचे ह्याचे श्येड्यूल बनवायचे असायचे. मंगळागौरीच्या तारखा ठरवायच्या असायच्या. नवरात्रात महालक्ष्मी बसवायची असे, कधी त्यासाठी मीटिंग असायची. अगदीच काही नाही तर ‘नंदूची बायको वेगळं बिऱ्हाड करणार आहे,’ ‘ कालिंदी पुन्हा गरोदर आहे ,मुलगा हवाच बाई. आधीच्या तिन्ही मुलीच आहेत.’ अशा गप्पा असायच्या. ‘साधा चहा सुद्धा विचारत नाही. किती आळशी आणि माणूसघाणी सून मिळाली बघा, सुमनताईंना !’ अशी क्वचित तक्रार असायची.
हे ‘डिपार्टमेंट‘ सहसा आजीचे असायचे. पण चहा करणे हे काम माझ्याच खात्यावर होते. शकुंतलाकाकू आल्या की इतका वेळ बसत की दोन वेळा चहा होत असे.
बापटकाका आले की, ‘फक्त अर्धा कप हवा हं, वहिनी !’ असं अजिजीने सांगत. अर्धा कप चहा घेणारे आदरातिथ्य करण्याचे समाधान हिरावून घेतात असे आईचे मत होते. चहाचे पातेले, कप-बशा , गाळणे वगैरे पसारा आणि कृती सगळे सारखे असते की. पण पुण्य अर्ध्याच कपाचे जमा !

आमच्या घरी सगळेच जाम चहा पिणारे. चहाबाज ! स्वतःला चहाबाज हे विशेषण अभिमानाने लावून घेत. आजोबा, बाबा आणि काका तर अतिरेक ! वेळ अवेळ काही हिशोबच नाही.

‘दुपारचे बारा वाजलेत. ही काय चहाची वेळ आहे ? नुसतं पाकीट तर पोचवायला आला होता. बळजबरीने त्याच्या घशात चहा ओतायची काय गरज होती ? तुम्हा लोकांना ढोसायचा असतो चहा, म्हणून त्याला पाजायचा.’
काकू जहाल निषेध व्यक्त करत असे.
‘चहाबाज कसली जहांबाज आहेत ही मंडळी !’ आईचा त्यावर चौकार !
अशी चहावरून खूपदा छोटीमोठी चकमक उडत असे. तह झाला की, ‘इस बात पें चाय हो जाय’ करून ती मिटत असे.

असे अचानक आता कोणी येत जात नाही. पाकीट पोचवणाऱ्याला तर कोणी चहा विचारत पण नाही ! अनाहूत पाहुणे ही गोष्ट आता हद्दपार झालेली आहे. सगळे काही ठरवून. फोन करून किंवा मेसेज करूनच. त्यामुळे चहा घेणार की कॉफी हा प्रश्न नसतो. आदरातिथ्य कसे करायचे हे सुद्धा ठरलेले असते. वेळी अवेळी चहा कोणी घेतही नाही. हली ‘ग्रीन टी‘ खूप जणं ‘प्रिफर‘ करतात. कोणी ‘विक टी‘ (म्हणजे पाणचट !) हवा असं सांगतात. यात सगळी उस्फूर्तता निघूनच जाते. स्वयंपाकघराचे किचनमध्ये रूपांतर झाल्यापासून चहासाठी आधण उकळणे हे उत्तम गृहस्थी करण्याचे व्यवच्छेदक लक्षण आता उरले नाही. व्यवच्छेदक लक्षण हा शब्द समजावून सांगावा तर लागेलच, गृहस्थी म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल.

माझी मैत्रीण रेखा अजूनही हे लक्षण जपून आहे. आम्ही सगळे जमलो, की ती हमखास ट्रे घेऊन येणार. कोणाला कमी दुधाचा, कोणाला बिन साखरेचा, कोणाला थोडी साखर चालेल, कोणाला अर्धा कपच लागतो असे प्रकार लक्षात ठेवून ट्रे भरलेला असतो. तिचं हे लक्षात ठेवणं म्हणजे नक्कीच उत्तम गृहस्थी करण्याचे लक्षण आहेच, शिवाय जिव्हाळ्याचं लक्षणदेखील आहे.
सर्वांत आधी मला चहा देईल ,कारण मला सणसणीत गरम चहा लागतो.
‘तू घे बाई आधी, पुढच्या वेळी तुझ्या घशातच गाळते बघ.‘ असं देताना लटक्या रागाने म्हणेल.

माझ्यासाठी अशी ‘खास‘ वागणूक मला खूपदा मिळाली आहे. जास्त दूध,जास्त चहा पावडर आणि साखर अगदी कमी असा बनवलेला गरम गरम चहा आईने खास माझ्यासाठी कायम बनवला. चहाचा तो बदामी, गुलाबी रंग मला आईमुळेच आवडीचा झाला. ’रंगावरून चहा कळतो.‘ आई म्हणत असे. आजोबांना ‘निरश्या‘ दुधाचा चहा खूप आवडायचा. त्यातला मला घोटभर मिळत असे. ‘चहाची दर्दी आहेस, उत्तम चहाची भोक्ती.’ असं वर आजीने दिलेलं सर्टिफिकेट !

माझी बँकेची नोकरी. म्हणजे बदली अटळ असते. प्रत्येक ठिकाणी चहाची व्यवस्था वेगळी असते. काही ठिकाणी सुसज्ज कॅन्टीन ,तर काही ठिकाणी बाजूच्या टपरीवरून चहा पिऊन यायची सोय. काही ठिकाणी ‘भट ‘ असायचा. (ह्या भट म्हणून ओळख देणाऱ्या माणसांमुळे ‘उकाळा‘ ह्या पेयाची ओळख झाली. बँकेत नोकरी लागण्याआधी पूजा सांगतात ते भटजी एवढेच माहीत होते !)

भुलेश्वर ब्रँचला भट असायचा. सारखे बदलत असत चहा बनवणारे. कोणीही आले तरी, त्याला हाक ‘भट‘ अशीच. नाट्यअभिनेता उदय पौडवाल आमचा सहकारी होता. ‘भट, कडक मीठी दे देना !‘ अशी आरोळी देत असे. आमच्याकडे डोळे मिचकावून ‘मीठी चाय म्हणतोय मी’, हा रोजचा शेरा. चहा स्त्रीलिंगी बरं का.

मांडवी ब्रँचला गोविंद होता. दोन प्रकारची चाय बनवत असे. सीधी आणि स्पेशल. अर्थात मी स्पेशल ! ‘आपको चाय पसंद आयी, तो बहोत बढिया लगता है,‘ हे मला वरती स्पेशल !

फोर्ट ब्रँचला कॅन्टीनचे पदार्थ छान होते. पण चहा म्हणजे गरम पाणी ! एकदोन दिवस मी थर्मास भरून चहा नेला ,पण ते सोयीचे नव्हते. चहा तर चांगला हवाच, पण गरमच हवा ! खाली उतरलं तर टपरीवर चांगला चहा मिळायचा. फोर्टला असतानाच एकदा पाटकरसर माझ्यासाठी टपरीवरचा चहा घेऊन आले. ग्लासमध्ये ग्लास ठेवून वर झाकण म्हणून ग्लास ! त्या ग्लासच्या संख्येप्रमाणे पैसे देण्याची शक्कल लढवून त्यांनी माझ्यासाठी गरम चहा आणला होता.
‘लवकर घ्या, गार होईल.’
मी इतकी ओशाळून गेले. पाटकर माझे वरिष्ठ.
‘आहे ना रंग बदामी, गुलाबी ह्यांच्या अधला मधला ? तुम्ही वर्णन करता तो हाच रंग. म्हणून घेऊन आलो.’ वर हे !
पुन्हा असा आणलात तर घेणार नाही, मी बजावले मात्र. (पाटकरसर वाचत असतील हे, तर बरे वाटेल मला.)

माझ्या चहाच्या अटी मी बोलता बोलता सांगून जाते हे खरं, पण इतकं आपुलकीने का वागतात हे सगळे ? असा मला प्रश्न पडतो.

आत्ता मला आठवण येतेय ती सुवर्णाची. सुवर्णा आडनावाचा प्यून आमच्या ऑफीसमध्ये होता. ऋणानुबंध असतात असे त्याच्याकडे बघून मला नेहमी वाटायचे. कल्याण ब्रँचला असतानाची गोष्ट आहे ही. टपरीवरून प्लास्टिकच्या पिशवीतून (!) चहा चायवाला आणत असे. आणि भराभर बारकुड्या ग्लासमध्ये तो वाटून देत असे. माझ्या अटीमध्ये हे काय बसणार ?
‘आप नही लेती चाय ?’ सुवर्णाने चौकशी केली.
मी कारणे सांगितल्यावर सुवर्णा चहा घेऊन आला, मला हवा तसा.
‘अलग है ये चायवाला.’ तो म्हणाला. माझी छान सोय झाली. एक दिवस सुवर्णा आला नाही. मी दुसऱ्या प्यूनला चहा आणायला सांगितले. चहा चांगला होता पण गार ढोण.
‘मॅडम किती लांब आहे ती टपरी ! झेरॉक्स होत्या माझ्या हातात, मी कसा धावणार ? सुवर्णा वेगळी खेप घालतो तुमच्यासाठी. धावत येतो तो. चहा गरम रहावा म्हणून ग्लास आणतो वर ठेवायला. त्या ग्लासचे पैसे आकारू नयेत म्हणून हुज्जत घालतो की चहा तर मीच सर्व्ह करतो ना ते पैसे वळते कर !’ त्याने सांगितले.
‘अरे देवा ! सुवर्णा का करतो रे एव्हढं, मला बोललासुद्धा नाही.’
मी खरोखर कपाळाला हात लावला.
आज मी मुद्दामच त्याचा खास उल्लेख करत आहे, माझी कृतज्ञ भावना त्याला ह्या लेखातून पोचवायची आहे. सर्व्हिस पूर्ण न करता तो हुरहूर लावून अकाली गेला. पण माझ्या स्मरणात आहे. घरी गरम चहा घेतानासुद्धा कितीतरी वेळा त्याची आठवण येते.

बदामी गुलाबी ह्यांच्या अधला मधला चहाचा रंग मला आठवण करून देतो माझ्यावर माया करणाऱ्यांची, अकारण लोभ जडवणाऱ्या माणसांची !
पावसाळी हवा असेल तर चहा आठवतोच आठवतो, भजी आठवतात, तसेच डोळे ओलसर करणारे काहीतरी नक्कीच आठवते. सर्वांनाच होते ना असे ?

अशी खास वैयक्तिक बाब सर्वांचीच असली की मनात रिमझिम रिमझिम वाटायला लागते ना ? फिर चलो, इस बात पें चाय हो जाय !
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments